पृथ्वीवर प्रशांत महासागर, अटलांटिक महासागर, हिंदी महासागर, दक्षिणी महासागर (अंटाक्र्टिक) आणि आक्र्टिक असे एकूण पाच महासागर आहेत. प्रत्येक महासागर हा समुद्र, उपसमुद्र, आखात इत्यादींमध्ये विभागलेला आहे. सोळाव्या शतकात युरोपीय संशोधकांनी शोधून काढलेला प्रशांत महासागर हा सर्वात मोठा महासागर. त्याच्या उत्तरेला आक्र्टिक महासागर, दक्षिणेला दक्षिण महासागर, पश्चिमेला आशिया व ऑस्ट्रेलिया तर पूर्वेला अमेरिका खंड आहेत. या महासागराने पृथ्वीच्या पृष्ठभागाचा ३२ टक्के भाग व्यापला असून त्याचे क्षेत्रफळ १६९.२ कोटी चौरस किलोमीटर आहे. भूतलावरील एकूण पाण्याच्या ४६ टक्के पाणी प्रशांत महासागरात आहे. त्याची खोली ११ हजार २२ मीटर आहे. न्यू गिनी हे प्रशांत महासागरातील सर्वात मोठे बेट आहे.
भूतलावरील जवळजवळ एकपंचमांश भाग व्यापणाऱ्या अटलांटिक महासागराचे एकूण क्षेत्रफळ १०६.४ दशलक्ष चौरस किलोमीटर असून हा जगातील दुसरा मोठा महासागर आहे. इंग्रजी ‘एस’ आकाराच्या अटलांटिकच्या पश्चिमेला अमेरिका आणि पूर्वेला युरोप व आफ्रिका खंड आहेत. हा महासागर उत्तरेला आक्र्टिक महासागराला मिळतो. नैर्ऋत्येला प्रशांत, आग्नेयेला हिंदी तर दक्षिणेला दक्षिणी महासागर यांना मिळतो. विषुववृत्तामुळे त्याचे दक्षिण व उत्तर अटलांटिक महासागर या दोन भागांमध्ये विभाजन होते.
भारताच्या दक्षिणेकडे असणारा हिंदी किंवा भारतीय महासागर हा जगातील तिसरा मोठा महासागर असून त्यात सुमारे २० टक्के पाणी आहे. त्याच्या पश्चिमेला पूर्व आफ्रिका, पूर्वेससुद्धा बेटे आणि ऑस्ट्रेलिया आहे, तर दक्षिणेस दक्षिण ध्रुव महासागर आहे. देशाच्या नावावरून नामाभिधान मिळणारा ‘इंडियन ओशन’ हा जगातील एकमेव महासागर आहे. अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, लाल समुद्र, चिनी समुद्र व पर्शियन आखात हे या महासागराचे भाग आहेत. या समुद्रात मादागास्कर, मालदीव, मॉरिशस, श्रीलंका आणि इंडोनेशियाचे द्वीप समूह तसेच अंदमान-निकोबार, लक्षद्वीप बेटे आहेत.
दक्षिणी महासागर किंवा दक्षिण ध्रुवीय महासागर म्हणजेच अंटाक्र्टिका खंडाला चारही बाजूने पूर्णपणे वेढलेला अंटाक्र्टिक महासागर होय. आक्र्टिक महासागर हा उत्तर ध्रुवाभोवतालचा सुमारे १४ कोटी २४ लाख ४९३६ चौरस किलोमीटरचा महासागर! त्याच्याभोवती रशिया, अलास्का, कॅनडा, ग्रीनलँड, आइसलँड, नॉर्वे, स्वीडन व फिनलँड हे देश आहेत. अति थंडीमुळे या महासागराचा बराचसा भाग कायमस्वरूपी बर्फाच्या स्वरूपात असतो. उरलेल्या भागात वर्षांचे काही महिने पाणी असते. या पाण्याखालील भूभागात खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचे साठे आहेत.
– प्राचार्य डॉ. किशोर पवार
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : www.mavipa.org