डॉ. श्रुती पानसे contact@shrutipanse.com
ही बुद्धिमत्ता फार लहानपणी कळून येईल, असं नाही. पण हळूहळू जसं मूल मोठं होईल तसा मुलांमधल्या या बुद्धिमत्तेचा शोध लागू शकतो. स्वत:चा शोध घेतल्यावर आपल्यात ही बुद्धिमत्ता आहे का हे नक्की समजू शकेल. त्या आधी आपल्या मेंदूत निरंतर चालत असलेल्या एका प्रक्रियेविषयी जाणून घेऊ. आपल्याशी गप्पा मारणारं इतर कोणी असो किंवा नसो, आपला आपल्याशी संवाद नेहमीच चाललेला असतो. एखादा निर्णय घेताना त्याच्या दोन्ही बाजू आपल्या मनात वाजत असतात. आपण स्वत:च दोन्ही, तिन्ही बाजूंविषयी बोलत असतो. त्यातून केव्हा तरी एका निर्णयावर येतो. याशिवाय मनात अस्वस्थता असते तेव्हाही हेच घडतं. कोणाशी मतभेद झाले आणि बोलता आलं नाही तर बाकीचं सगळं मनातल्या मनात चालू असतं.आपल्या हातून एखादी चूक झाली तर स्वत:ला शब्दांचे फटकारे देणं, गुन्हेगार ठरवणं हेही आपल्याच मनात चालू असतं.
थोडक्यात प्रत्येकाच्या मनात सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत मनात अखंड संवाद चालू असतो. मात्र या आधीच्या लेखात म्हटल्याप्रमाणे व्यक्तीअंतर्गत बुद्धिमत्तेची माणसं इतरांपेक्षा वेगळी ठरतात. या माणसांच्या मनातही अशी स्वगतं चालूच असतात. पण ते या सर्व घटनांचा सखोल विचार करतात. माणसांचा नाही, तर घटनांचा विचार करतात. अशा घटना का घडल्या, याच्या मुळाशी काय असेल याचा शोध घेतात. घटनांचा भविष्यकालीन वेध घेतात. विश्लेषण करतात. त्यातून काही सूत्र सापडतं का ते बघतात. या सूत्रांचंच तत्त्वज्ञान होऊ शकतं.
मनात चाललेल्या या संघर्षांतून कधी एखादा महत्त्वाचा शोध लागतो. कधी एखादा सिद्धांत जन्माला येतो. कधी एखादं पुस्तक, एखादी जबरदस्त कविता, महाकाव्य यांची निर्मिती होते. महत्त्वाचा सिद्धांत मांडलेले लेखक, गुरुत्वाकर्षणासारखा शोध लावलेले शास्त्रज्ञ, शून्याचा शोध लावणारे गणिती, नवीन राग शोधून काढणारे शास्त्रीय गायक, स्वत:च्या वर्तनाचा अभ्यास करणारे, विविध प्रयोग करणारे, तत्त्वज्ञानाचा अभ्यास करणारे विचारवंत हे या बुद्धिमत्तेचे असतात.