समुद्री साप पाण्यातील जीवनाला अनुकूलित झालेले असून ते मांसाहारी असतात. ते खाडय़ा, नद्यांतही येतात. जमिनीवर आले तर सुस्तपणे सरपटतात. जमिनीवरील सापाच्या तुलनेत समुद्री सापाची शेपटी चपटी असून ती पोहण्यासाठी वल्ह्याप्रमाणे उपयोगी पडते. पोहताना श्वास घेण्यासाठी नाकपुडय़ा पाण्याच्या पृष्ठभागावर असतात. नाकपुडय़ा एकमेकांजवळ चेहऱ्याच्या टोकावर असल्याने त्यांना नाक थोडेसेच बाहेर काढूनही श्वास घेता येतो. नाकपुडय़ांच्या झडपा बंद करून शरीरात पाणी शिरणेही टाळता येते. भक्ष्यासाठी समुद्रतळाशी जाणे आणि हवेसाठी पाण्यावर येणे यात सुवर्णमध्य साधत समुद्रातील साप ३०० फुटांपर्यंत खोल समुद्रात राहतात.
हेही वाचा >>> कुतूहल: व्हेलमधील संवाद
सर्व सापांना एकच, पडवळासारखे लांब उजवे फुप्फुस असते. ते शेपटीपर्यंत पसरलेले असते. सामान्यत: डावे फुप्फुस खुरटलेले असते. फुप्फुसाच्या नाकाकडील भागात हवेची अधिक प्रमाणात देवाणघेवाण होते. शेपटीकडील भागातील हवा शरीर पाण्यात तरंगते ठेवण्यास उपयोगी पडते. समुद्रातील बहुतेक जातींचे मादी साप फलित अंडी शरीरात साठवून कालांतराने पिलांना जन्म देतात. सागरी मण्यारी मात्र कवचधारी अंडी घालतात.
समुद्रातील सर्व सापांच्या जाती विषारी असतात; पण जमिनीवरच्या विषारी सापांप्रमाणे ते आक्रमक नसतात. जमिनीवरच्या घोणसाचे विषदंत फार लांब, दोन इंचांपर्यंत असतात. समुद्रातील सापांचे विषदंत लहान आकाराचे असतात. समुद्रातील साप चावलाच, तर मात्र ताबडतोब वैद्यकीय मदत घ्यावी. ‘समुद्रसर्प-विष’ भरपूर टोचले गेले असेल तर ते भिनते तसे हळूहळू श्वासपटल आणि स्नायूही काम करेनासे होतात. हृदय-स्नायूंचे कार्यही मंद होऊन हृदय बंद पडू शकते. समुद्री सापाचे विष खेकडय़ावर अधिक परिणामकारक असते. खेकडे हे त्यांचे खाद्य असल्याने ते मिळवणे त्यांना सोपे जाते.
हेही वाचा >>> कुतूहल: नाविक अधिकाऱ्यांची प्रशिक्षण संस्था
भारताच्या समुद्रकिनाऱ्यांवर सर्रास आढळणारा साप म्हणजे चोचवाला सागरी साप किंवा हूक नोज्ड साप (एन्हायड्रिना शिस्टोसा). समुद्रातील साप चावल्यामुळे जे मृत्यू घडतात त्यातील निम्मे या हूक नोज्ड सागरी सापांमुळे घडतात. मासेमारीच्या जाळय़ात अधूनमधून साप सापडतात. ते काळजीपूर्वक फेकून दिले जातात. बहुधा समुद्री साप चावण्याची शक्यता फार कमी असते. पूर्वेकडच्या देशांत समुद्री साप आवडीने खाल्ले जातात. सागरी साप प्रकाशाकडे आकृष्ट होतात. त्यांच्या या सवयीचा वापर करून त्यांना पकडले जाते.
– नारायण वाडदेकर
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org