भारतामध्ये ओढकामाच्या जनावरांची संख्या ८३ लाख असून ग्रामीण भागात वापरली जाणारी २६ टक्के शक्ती आणि ३५ टक्के ऊर्जा त्यांच्यापासून मिळते. भारतातील ९० टक्के शेती अति लहान शेतकऱ्यांकडे आहे. त्यांपकी ५० टक्के शेती कसण्यायोग्य आहे. ती कसण्यासाठी ओढकामाचे बल ही एकच शक्ती उपलब्ध आहे. भारतामध्ये १०० लाख शेतकरी असे आहेत की त्यांची जमीन दोन हेक्टरपेक्षा कमी आहे. अशा ठिकाणी ट्रॅक्टर वापरणे आíथकदृष्टय़ा योग्य नाही. भारतातील ५० टक्के खेडय़ांना मोटार वाहतूक करण्यायोग्य रस्ते नाहीत. अशा ठिकाणी थोडा शेतमाल जवळच्या अंतरावर नेण्यासाठी बलगाडी उपयुक्त व परवडणारी असते. म्हणूनच ग्रामीण भागातील दोनतृतीयांश वाहतूक बलगाडीने केली जाते.
खिलार बल हे मुख्यत्वे करून शेतातील विविध मशागतीची व वाहतुकीची कामे करण्यासाठी वापरतात. या कामांमध्ये ताकद व चपळता आवश्यक असते. खिलार जातीची जनावरे ताकदवान व चपळ असून कमी व वाळलेल्या चाऱ्यावर तग धरू शकतात. खिलारच्या गाई वासरापुरतेच दूध देतात. खिलारची चांगल्या दर्जाची जनावरे पुसेगाव, खरसुंडी, करगमी, सोलापूर, पंढरपूर, अकलूज, महूद, आटपाडी, जत, औंध इत्यादी ठिकाणच्या यात्रेमध्ये पाहाण्यास मिळतात. या यात्रांमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश येथील शेतकरी आपली जनावरे विक्रीसाठी आणतात.
शेतीकामासाठी सर्वसाधारणपणे खिलार (आटपाडी, म्हसवड व तापी हे खिलारचे प्रकार आहेत), डांगी, नेमाडी (निमाडू), शिरी, माळवी (महादेवपुरी), अमृतमहल व कांगायम (कांगू) या जाती प्राधान्याने वापरतात. अमृतमहल या जातीचे मूळस्थान कर्नाटकात आहे. या बलांचे शरीर मोठे, चेहरा आखूड, कपाळ फुगलेले, खांदा मोठा, मानेखालची पोळी मोठी, त्वचा घट्ट, शिंग मोठे, रंग करडा, शेपटीचा गोंडा काळा असतो. माळवी बलांचे मूळस्थान मध्यप्रदेश व राजस्थानमधील जलावर जिल्ह्य़ात आहे. शरीर बांधीव, कान लहान, शिंगे वाकडी, मान लहान, मानेखालची पोळी पातळ, पाय मजबूत, रंग करडा, पाठीवर व डोक्यावर काळे ठिपके ही यांची वैशिष्टय़े आहेत. हे बल सर्व प्रकारच्या हवामानात तग धरून राहातात.
जे देखे रवी.. – पशुपक्ष्यांची ज्ञानेश्वरी ३
युद्धभूमीचे वर्णन करताना अर्जुनाच्या रथाला ज्ञानेश्वर अधोरेखित करतात. गीतेत हा मतलब नाही. त्या रथाच्या घोडय़ांना गरुडाची बरोबरी करणारे असे वर्णन आले आहे. ग्रीकांच्या पुराणात मोठे पंख असलेल्या घोडय़ांची चित्रे आढळतात इथे गरुडा चिये जवळयिचे। कांतले चाऱ्ही।। एवढेच वर्णन तेच ग्रीक चित्र माझ्या मनासमोर उभे करते. (कांतले म्हणजे घोडे) शिवाय त्या रथावर मारुती त्याची ध्वजा फडकवत आरूढ आहे. हा वाऱ्याचा वानर मुलगा तेव्हा तो किती शीघ्र असेल आणि त्याचा परिणाम त्या रथावर काय होईल ही प्रतिमा आपोआप तयार होते. गीतेत कपिध्वजाचा उल्लेख नाही. पण मोठय़ा मोठय़ा शंखनादाचा उल्लेख आहे त्यामुळे पृथ्वी थरथरते, नक्षत्रांचा सडा पडतो आणि पृथ्वीला पेलणारा सर्प (शेष) आणि कासव (कूर्म) काळजीत पडतात अशा ओव्या आहेत. मग परत भुंगा एल्ल३१८ घेतो. अर्जुन नातेवाईकांना बघून ढेपाळला आहे. एवढा शूरवीर, नि:स्पृह, बाणेदार पण मोहापोटी खचतो. सगळ्यांचे असेच होते. मोठय़ा मोठय़ा अधिकारावर असलेले तगडे पुरुष बायका पोरांसाठी, पुतण्या भाच्यांसाठी नियम वाकवतात, मोडतात. हा परत आलेला भुंगा गिरमिट वापरावे तसे लाकूड कोरू शकतो पण फुलांच्या पाकळ्या भेदू शकत नाही असे वर्णन आहे. इथे जैविकता आड येते. भुंगा मधाचा मोह सोडू शकत नाही. पराग वाहण्याचे काम अलगद नकळत होणारे असते. ओवी म्हणते,
‘जैसा भ्रमर भेदी कोडे। भलतैसे काष्ट कोरडे।
परि कळिकेमाजी सापडे। कोवलिये॥’
प्राण गेला तरी बेहत्तर पण हा स्नेह सुटत नाही. तरीसुद्धा श्रीकृष्ण त्याला युद्धाबद्दल आग्रह करतो तेव्हा कोकिळेचे आगमन होते. कोकिळा लबाड असते. ती आपली अंडी कावळिणींकडून उबवते आणि अशा स्वभावाची ती त्रयस्थ असते. थोडेफार काही झाले तर पोबारा करू शकते. अर्जुन कृष्णाला कोकीळ म्हणतो. मी जर या भानगडीत पडून पापी होऊन पस्तावलो तर तू कोकिळेसारखा उडून जाशील असा आरोप कृष्णावर केला जातो.
ओवी म्हणते , ‘जैसा उद्याना माजी अनळु। संचारला देखोनि प्रबळु।
मग क्षण कोकिळु। स्थिर नोहे।।
अनळु म्हणजे वणवा. मग परत चकोर हजेरी लावतो. अर्जुन म्हणतो
सकर्दम सरोवरू। अवलोकूनि चकोरू।
न सेविति। अव्हेरू करूनी निघे।।
हाच तो चकोर चंद्रकिरण खाणारा सरोवरात चिखल माजल्यावर तो ते सारे सोडून निघून जातो असा अर्थ. चिखल म्हणजे हे युद्ध. कृष्णा ‘‘तू मग चकोरासारखा पळून जाशील’’ असा टोमणा खुद्द भगवंताला मारला जातो. राणी जिजामाता उद्यान, ताडोबा, कर्नाळ्याचे अभयारण्य उलगडत राहते.
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com
वॉर अँड पीस – स्किझोफ्रेनिया : एक मानसिक आजार – भाग २
या विकाराच्या रुग्णांना सामान्य माणसे ‘तो वेडा आहे’ असा शिक्का मारून मोकळी होतात. जवळपासच्या डॉक्टर, वैद्य किंवा मानसोपचार तज्ज्ञांकडे जाऊनही पेशंट सुधारला नाही तर त्याला बांधून, डांबून ठेवतात. क्वचित मारहाण करून घराचा तुरुंग बनवतात. खूप वृद्ध माणसे असली तर आपण हतबल झालेले असतो. लहान मुलांच्या या रोगाच्या प्राथमिक अवस्थेत उपचार होऊ शकतो. मात्र त्याकरिता पालक, आईवडील, जवळची नातेवाईक मंडळी, शेजारीपाजारी यांनी समजूतदारपणा दाखवायला लागतो. ‘हा मुलगा आदळआपट करतो, लहान मुलांना मारतो, शिवीगाळ करतो, घरात तोडफोड करतो,’ अशा तक्रारी दिवसभर करण्यापेक्षा पूर्णपणे संयम पाळून क्रमाक्रमाने या विकारातील लक्षणांचा सामना केला तर काही प्रमाणात आयुर्वेदीय उपचारांमुळे यश निश्चित मिळते असे अनुभवपूर्ण आश्वासन मी देवू इच्छितो. अष्टांगहृदय उत्तरस्थान अ/५ सूत्र ३० ते ३३ या श्लोकात सांगितलेली लक्षणे बरीचशी स्किझोफ्रेनियाशी मिळतीजुळती आहेत. विज्ञान खूप पुढे गेलेले आहे. मेंदूचे विविध प्रकारचे रिपोर्ट्स काढता येतात. मेंदू सुकला आहे का? किंवा मेंदूला रक्तपुरवठा होत नाही का? याचा मागोवा घेता येतो. अंधश्रद्धेला पूर्णपणे मूठमाती देऊन हा जीवशास्त्रीय आजार आहे, असे पालकांनी समजून घ्यावे. रुग्णाच्या लक्षणांवर लक्ष केंद्रित करावे. लक्षणाबरहुकुम उपचार करावे. योगासने, दीर्घश्वसन, प्राणायाम, मनाला निखळ आनंद देणारे संगीत यांची मदत घ्यावी. संबंधित रुग्णाला कदापि एकटे ठेवू नये. चारजणात मिसळू द्यावे. घरामध्ये साधेसोपे कामात गुंतवून ठेवावे. भाज्या निवडायला द्याव्या. घरातील फरशी पुसणे, पाणी भरणे अशी कामे त्या रुग्णाच्या कलाकलाने करून घ्यावी. आधुनिक वैद्यकांप्रमाणे स्किझोफ्रेनियाचे पाच प्रकार आहेत. या प्रकारांत वेगवेगळी लक्षणे असली तरी बहुतेक रुग्णांमध्ये विविध लक्षणांची सरमिसळ दिसून येते. या सरमिसळ लक्षणांनुरूप आयुर्वेदीय उपचार नेटाने करून रुग्णांचा दुवा जरूर मिळवावा.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले
आजचे महाराष्ट्रसारस्वत – २६ जुलै
१८७० > ज्योर्तिगणितज्ञ गोविंद सदाशिव आपटे यांचा जन्म. त्यांच्या ‘पंचांग- चिंतामणी’ या सूक्ष्म-सारणी ग्रंथामुळे, पुढील अनेक वर्षांचे पंचांग तयार करता येते. ‘सर्वानंद लाघव’ हाही त्यांचाच गणित-ग्रंथ.
१८९४> अभिनयाला वाव देणारी ‘शिशुगीते’ हा प्रकार मराठीत रुळवणारे वासुदेव गोविंद मायदेव यांचा जन्म. जुन्या अंकलिप्यांतील अनेक कविता त्यांच्या असत. किलबिल, छंदगीत, क्रीडागीत, हे शिशुगीतसंग्रह, भावनिर्झर, भावतरंग, भावविहार हे भावकवितांचे संग्रह, विधवांच्या दुखाला वाचा फोडणारे ‘गरिबांची गोष्ट’ हे खंडकाव्य, ‘सॉक्रेटिस’ हे नाटक व ‘हिंदुधर्म परिचय’ हा निबंध अशी त्यांची ग्रंथसंपदा होय.
१९८६ > तत्त्वचिंतक, कादंबरीकार पुरुषोत्तम यशवंत देशपांडे यांचे निधन. विधि महाविद्यालयात प्राध्यापक असणाऱ्या पु.यं.नी पाच कादंबऱ्या लिहिल्या. मात्र ‘सोविएत रशिया आणि हिंदुस्थान’ तसेच ‘गांधीजीच का?’ या वैचारिक लिखाणामुळे ते प्रकाशात आले. ‘नवी मूल्ये’ या निबंधसंग्रहातून त्यांची संस्कृतिविषयक नवी जाणीव स्पष्ट होते. याशिवाय ‘अनामिकाची चिंतनिका’ हा तात्त्विक ग्रंथ आणि तीन खंडांचे ‘अनुभवामृत – रसरहस्य’ ही त्यांच्या विद्वत्तेची साक्ष देणारी पुस्तके होत.
– संजय वझरेकर