संपूर्ण जगाच्या हवामानावर आणि पर्जन्यमानावर एल निनोचा थेट परिणाम होतो. एल निनो या स्पॅनिश शब्दाचा अर्थ बालयेशू किंवा छोटा मुलगा तर ‘ला निना’ म्हणजेच लहान मुलगी असा होतो.
१६ व्या शतकात दक्षिण अमेरिकी मासेमारांना प्रशांत महासागराचे पाणी अचानक नेहमीपेक्षा उबदार होत असल्याचे आढळले. सहसा नाताळाच्या सुमारास हा बदल दिसल्याने त्यांनी ‘एल निनो’ असे नाव दिले. सामान्यत: पश्चिम-प्रशांत महासागरातील पाणी उबदार असल्यामुळे आग्नेय आशियाच्या किनाऱ्यालगत हवेचा दाब कमी असतो. याविरुद्ध पूर्व-प्रशांत महासागरात दक्षिण अमेरिकेलगत पाण्यावर हवेचा उच्च दाब असतो. हवेच्या दाबातील फरकाने वारे आणि त्यासोबत बाष्प पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते त्यामुळे आग्नेय आशियासह भारतीय उपखंडात पाऊस पडतो. एका वर्षीच्या उन्हाळय़ामध्ये सुरू झालेली ही प्रक्रिया पुढील १२-१८ महिने टिकू शकते. त्याची तीव्रता तापमानावर ठरते. ४ ते ५ अंश फॅरेनहाईट तापमानवाढ झाल्यास सौम्य, पण १४ ते १८ अंश फॅरेनहाईटने तापमानवाढ झाल्यास सर्वदूर परिणाम दिसतात.
दर दोन ते सात वर्षांनी ‘एल निनो’ परिणाम घडतो. पूर्वप्रशांत महासागरातील पेरू, इक्वाडोरच्या किनाऱ्यालगत नेहमीपेक्षा प्रबळ उष्ण प्रवाह तयार झाल्यामुळे हवेचा दाब कमी होतो. या उलट पश्चिमेला इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि हिंदी महासागरावर उच्चदाब निर्माण होतो. त्यामुळे हिंदी महासागराकडून बाष्पभारित वारे पूर्वेकडे वाहतात. याचा परिणाम म्हणून दक्षिण अमेरिकेत अतिवृष्टी, तर आग्नेय आशियामध्ये अवर्षणाची स्थिती निर्माण होते. एल निनो सक्रिय झाल्यास व्यापारी वारे कमजोर होतात. सागरी प्रवाह व समुद्रपातळीत बदल घडतात. एल निनो प्रबळ असलेल्या वर्षी अटलांटिक महासागरातील चक्रीवादळे कमी होतात. परंतु भारतीय उपखंडातील बऱ्याच देशांमध्ये दुष्काळ पडतो. भारतात गेल्या ५० वर्षांत पडलेले १३ पैकी १० दुष्काळ एल निनोशी निगडित आहेत.
‘ला निनाचा’ प्रभाव याच्या उलट असतो. उष्णकटिबंधातील पश्चिम-प्रशांत महासागराचे पाणी नेहमीपेक्षा थंड झाल्यावर ला-निना प्रभावी होतो. ‘ला निना’ वर्षांत दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलमध्ये भरपूर पाऊस पडतो. तसेच तीव्र व्यापारी वारे व सागरी प्रवाहांमुळे थंड व पोषक पाणी पृष्ठभागावर येऊन प्लवक व माशांची पैदास वाढते. एल निनो व ला निना या दोन प्रभावांचा संपूर्ण जगाचे जल-वायुमान ठरवण्यामध्ये महत्त्वाचा वाटा असतो.
– अदिती जोगळेकर
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org