डॉ. यश वेलणकर yashwel@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माणसाच्या मेंदूतील ‘प्री-फ्रण्टल कॉर्टेक्स’ हा भाग अन्य प्राण्यांच्या तुलनेत अधिक विकसित असतो. त्यामुळेच तो अमूर्त चिंतन करू शकतो आणि स्वत:च्या मनातील विचारांकडे साक्षीभाव ठेवून पाहू शकतो. मनात एखादा विचार किंवा भावना आली तरी, लगेच त्यानुसार कृती करायची नाही असे म्हणून स्वत:ला थांबवू शकतो.

आपण रस्त्यावर येतो व तो रस्ता ओलांडायचा आहे असा विचार मनात आला तरी, लगेच तो कृतीत आणत नाही. आपण थांबतो; गाडय़ा येत नाहीत ना हे पाहतो आणि नंतरच रस्ता ओलांडतो. मनात आलेला विचार लगेच कृतीत न आणणे, हे ‘प्री-फ्रण्टल कॉर्टेक्स’मुळेच शक्य होते. हा मेंदूतील भाग वयाच्या सातव्या वर्षी थोडे थोडे काम करू लागतो.

लहान मुलांच्या शाळेजवळील रस्त्यावर ‘वाहने सावकाश चालवा’ अशी पाटी असते. कारण ती मुले बेभानपणे रस्त्यावर धावत येऊ  शकतात. त्यांचा ‘प्री-फ्रण्टल कॉर्टेक्स’ अविकसित असल्याने असे होते. त्यामुळे भावनेच्या भरात कृती करणे; उदाहरणार्थ राग आल्यानंतर खेळणी फेकून देणे, हे पाच-सहा वर्षांच्या मुलांसाठी नैसर्गिक आहे. त्यामध्ये फारसे काळजी करण्यासारखे काहीही नाही. मात्र त्यानंतर त्यांची ही सवय हळूहळू बदलायला हवी. मनात राग आला तरी, लगेच आततायी प्रतिक्रिया करायची नाही याचे प्रशिक्षण मुलांना दिले जायला हवे.

मेंदूचे हे संशोधन, एरिक बर्न ‘ट्रान्झ्ॉक्शनल अ‍ॅनालिसिस’ ही थेरपी सांगत असताना झालेले नव्हते. पण लहानपणी बालक अर्थात ‘चाइल्ड इगो’ प्राधान्याने असला, तरी त्यांच्यातदेखील प्रौढ (अ‍ॅडल्ट) आणि पालक (पेरेन्ट) हे इगो हळूहळू विकसित करायला हवेत, असे त्यांनी सूचित केले आहे.

आज मुलांची धृति: विकसित करणारे संस्कार त्यांच्यावर होत नाहीत. घरोघरी एकुलती एक लाडावलेली बालके असल्याने ही समस्या अधिकच वाढते आहे. त्याचमुळे पौगंडावस्थेत त्यांचे सैराट वागणे वाढले आहे. ते टाळायचे असेल, तर सातव्या वर्षांपासून त्यांना नकाराची आणि स्वत:ला थांबवण्याची सवय लावायला हवी. त्यांना विचार करायला प्रवृत्त केल्याने त्यांच्यातील प्रौढ इगो विकसित होतो आणि दुसऱ्याची काळजी घेण्याचे संस्कार, आई-वडिलांना कामात मदत करणे आदींमुळे पालक हा इगो विकसित होऊ  लागतो.