संस्थानांची बखर : जोधपूर राज्य प्रशासन
रावश्री जोधाजी याने आपल्या मारवाड राज्याच्या राजधानीसाठी नवीन शहर वसवून त्याचे नाव जोधपूर असे केले. राज्यक्षेत्र वाढल्यावर कारभार नीट चालावा म्हणून जोधाने राज्याचे भाग पाडून त्यांचे प्रशासन आपल्या भावांवर सोपविले. आपल्या राजधानीच्या ठिकाणी जोधाजीने प्रसिद्ध किल्ला मेहरानगढ १४५९ मध्ये बांधला. ब्रिटिश लोक मेहरानगढला मॅजेस्टिक फोर्ट म्हणत. बादशाह अकबराने हा किल्ला घेण्यासाठी त्याला १७ दिवस वेढा घातला होता. जोधपूरचा राजा चंद्रसेनाने वेढा फोडण्याचे बरेच प्रयत्न केले, परंतु अखेरीस १५६५ साली किल्ला घेण्यात अकबर यशस्वी झाला. चंद्रसेन पळून बिकानेरच्या आश्रयाला गेला. १५८३ साली मोगलांनी जोधपूर राजघराण्यातला उदयसिंहजी याला १०००ची मनसबदारी देऊन गादीवर बसविले.अकबराच्या काळापासून पुढे बहुतेक सर्व मोगल बादशहांशी जोधपूर राजांचे संबंध सलोख्याचे झाले. उदयसिंहापासून पुढच्या सर्व राजांनी मोगलांची १००० पासून ५०००ची मनसबदारी आणि अनेकांनी मोगलांशी नातेसंबंधही जोडले. रावश्री बख्तसिंहजीने प्रथम मोगलांकडे मनसबदारी केली, परंतु पुढे भावाकडून गादी घेण्यासाठी त्याने मराठय़ांचे साह्य़ घेऊन त्याचा मोबदला म्हणून अजमेर मराठय़ांना दिले. बख्तसिंहानंतर रावश्री मानसिंहाने १८१८ साली ब्रिटिशांशी संरक्षण करार करून जोधपूर ब्रिटिश-अंकित संस्थान बनले.जोधपूर संस्थानाच्या कारभारात लक्ष घालून चोख प्रशासन देणारा रावश्री जसवंतसिंह द्वितीय याची कारकीर्द इ.स. १८७३ ते १८९५ अशी झाली. त्याने राज्यात रेल्वे, तारघर सुरू करून कालवे पाटबंधारे बांधून पाणीपुरवठय़ात सुधारणा केली. रावश्री सुमेरसिंहाने ब्रिटिश सन्यात पहिल्या महायुद्धात फ्रान्समध्ये महत्त्वाची कामगिरी बजावली. रावश्री हनवंतसिंह या शेवटच्या अधिकृत राजाने स्वतंत्र भारतात राज्याच्या विलीनीकरण दस्तऐवजांवरसह्य़ा केल्या. १९४९ ते १९५२ या काळात त्याची राजस्थान प्रांताच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली होती.
सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com
कुतूहल: शहापुरी साडी
शहापुरी साडी ही महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादात अडकलेल्या भागात बेळगाव-हुबळी परिसरात उत्पादन केली जात असलेली साडी आहे. कर्नाटकाच्या सीमेला जोडून असलेल्या दक्षिण महाराष्ट्राच्या कोल्हापूर, सांगली जिल्ह्य़ातील स्त्रियांच्या साडय़ांमध्ये ही साडी असलीच पाहिजे, असा एक अलिखित दंडकच आहे. नेहमी वापरली जाणारी ही साडी प्रांतवादाच्या पलीकडे आहे हे निश्चितच चांगले लक्षण आहे. ही साडी ‘जिजामाता साडी’ म्हणूनही ओळखली जाते. म्हणजेच ही महाराष्ट्राशी घट्ट नात्याने जोडलेली साडी आहे.मऊ तलम सूत आणि फिके रंग हे या साडीचे खरे वैशिष्टय़. या साडीचे काठ अरुंद पण चांगले बांधीव असतात. मूळ साडीच्या रंगानुसार पदरावर पट्टे विणलेले असतात. शहापुरी साडी नऊवारीत जास्त खुलून दिसते. व्ही. शातांराम निर्मित ‘पिंजरा’ या चित्रपटात अभिनेत्री संध्याने नेसलेल्या साडय़ा शहापुरी होत्या, फक्त त्या थोडय़ा वेगळ्या पद्धतीने नेसलेल्या होत्या.वस्त्र प्रावरणामध्ये मिश्रतंतूचा वापर करून निर्माण केले जाणारे कापड विविध कामांकरिता वापरले जाते. ते समाजाच्या अंगवळणीही पडले आहे. सध्याचा जमाना रिमिक्सचा आहे. तसेच प्रयोग शहापुरी साडीबाबतीत केले गेले. या प्रयोगात उंची रेशमी सूत घेऊन पाचवारी आणि नऊवारी शहापुरी साडय़ांची निर्मिती केली गेली, परंतु ग्राहकाच्या पसंतीला त्या उतरल्या नाहीत. परिणामी, रेशमी शहापुरी साडय़ांची निर्मिती बंद करावी लागली. अस्सल ते अस्सल आणि नक्कल ते नक्कल यामध्ये निवड करावयाचे स्वातंत्र्य ग्राहकाला आहेच, तो अधिकार ग्राहकाने वापरला. शहापुरी साडीबाबत मिळालेला हा अनुभव इतर सर्व साडय़ांपेक्षा वेगळा होता.या साडीच्या काठात, पदरात जो जराचा वापर केला जात होता, तो पूर्वी खरा जर होता. सोन्या-चांदीचा वापर करून खरा जर तयार केला जायचा, पण सोन्याच्या तसेच चांदीच्या किमती वाढल्यामुळे कृत्रिम जराकडे वळावे लागले. त्याचा वापर सर्वत्र सुरू आहे. बेळगाव शहराच्या नजीक असलेल्या शहापूर या गावी विणली जाणारी ही साडी ‘शहापुरी’ या नावाने परिचित आहे.