संस्थानांची बखर : जोधपूर राज्य प्रशासन
रावश्री जोधाजी याने आपल्या मारवाड राज्याच्या राजधानीसाठी नवीन शहर वसवून त्याचे नाव जोधपूर असे केले. राज्यक्षेत्र वाढल्यावर कारभार नीट चालावा म्हणून जोधाने राज्याचे भाग पाडून त्यांचे प्रशासन आपल्या भावांवर सोपविले. आपल्या राजधानीच्या ठिकाणी जोधाजीने प्रसिद्ध किल्ला मेहरानगढ १४५९ मध्ये बांधला. ब्रिटिश लोक मेहरानगढला मॅजेस्टिक फोर्ट म्हणत. बादशाह अकबराने हा किल्ला घेण्यासाठी त्याला १७ दिवस वेढा घातला होता. जोधपूरचा राजा चंद्रसेनाने वेढा फोडण्याचे बरेच प्रयत्न केले, परंतु अखेरीस १५६५ साली किल्ला घेण्यात अकबर यशस्वी झाला. चंद्रसेन पळून बिकानेरच्या आश्रयाला गेला. १५८३ साली मोगलांनी जोधपूर राजघराण्यातला उदयसिंहजी याला १०००ची मनसबदारी देऊन गादीवर बसविले.अकबराच्या काळापासून पुढे बहुतेक सर्व मोगल बादशहांशी जोधपूर राजांचे संबंध सलोख्याचे झाले. उदयसिंहापासून पुढच्या सर्व राजांनी मोगलांची १००० पासून ५०००ची मनसबदारी आणि अनेकांनी मोगलांशी नातेसंबंधही जोडले. रावश्री बख्तसिंहजीने प्रथम मोगलांकडे मनसबदारी केली, परंतु पुढे भावाकडून गादी घेण्यासाठी त्याने मराठय़ांचे साह्य़ घेऊन त्याचा मोबदला म्हणून अजमेर मराठय़ांना दिले. बख्तसिंहानंतर रावश्री मानसिंहाने १८१८ साली ब्रिटिशांशी संरक्षण करार करून जोधपूर ब्रिटिश-अंकित संस्थान बनले.जोधपूर संस्थानाच्या कारभारात लक्ष घालून चोख प्रशासन देणारा रावश्री जसवंतसिंह द्वितीय याची कारकीर्द इ.स. १८७३ ते १८९५ अशी झाली. त्याने राज्यात रेल्वे, तारघर सुरू करून कालवे पाटबंधारे बांधून पाणीपुरवठय़ात सुधारणा केली. रावश्री सुमेरसिंहाने ब्रिटिश सन्यात पहिल्या महायुद्धात फ्रान्समध्ये महत्त्वाची कामगिरी बजावली. रावश्री हनवंतसिंह या शेवटच्या अधिकृत राजाने स्वतंत्र भारतात राज्याच्या विलीनीकरण दस्तऐवजांवरसह्य़ा केल्या. १९४९ ते १९५२ या काळात त्याची राजस्थान प्रांताच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा