अजब जीवसृष्टी असलेल्या अथांग सागरामध्ये समुद्री पतंगासारखे अनोखे जीव आढळतात. त्यांना ‘डक्टायलोटेरीफॉम्र्स’ या गटामध्ये वर्गीकृत केले आहेत. या गटामध्ये दोन कुटुंबे असून यामधील ‘पेगासिडी’ कुटुंबामध्ये समुद्री पतंगाचा समावेश होतो. त्यांची ही ओळख त्यांना त्यांच्या छातीवरील बाजूच्या मोठय़ा पंखांमुळे मिळाली आहे. या मोठय़ा पंखांनी ते पोहण्याबरोबरच समुद्र तळाशी चालूही शकतात. पेगासिडी कुटुंबातील समुद्री पतंगाच्या दोन कुळांमध्ये एकूण सहा प्रजातींचा समावेश होतो. यातील पेगासस कुळामध्ये चार तर युरीपेगासस कुळामध्ये दोन प्रजातींचा समावेश होतो. यामधील पाच प्रजाती उष्णकटीबंधीय तर एक प्रजाती (पेगासस लांसिफर) शीतकटीबंधीय भागामधील खाऱ्या आणि निमखाऱ्या पाण्यात आढळतात. समुद्री पतंग मुख्यत्वे समुद्र तळाशी पोहताना तर कधी कधी चिखलामध्ये रुतून चालताना दिसतात. रेताड किंवा चिखल असलेला समुद्रतळ, क्वचित प्रसंगी समुद्री गवत आणि समुद्री शैवाल यांच्यामध्ये अगदी ९० मीटर खोलीपर्यंत हे जीव आढळतात.
समुद्रघोडय़ांप्रमाणे यांचे पूर्ण शरीर कठीण हाडांनी व्यापलेले असते. ठरावीक कालावधीनंतर समुद्री पतंग परजीवींपासून सुटका करण्यासाठी आपल्या अंगावरील जुनी त्वचा काढून टाकतात आणि त्या ठिकाणी नवीन त्वचा येते. ते समुद्र तळाशी जोडीने फिरताना दिसतात आणि ते आयुष्यभर एकपत्नीत्व राखणारे असावेत असा संशोधकांचा अंदाज आहे. परंतु समुद्रघोडे किंवा नळी माशांप्रमाणे हे मासे आपल्या अंडय़ांची काळजी घेत नाहीत किंवा अंगावर चिकटवतही नाहीत. याउलट ते प्रजनन करून आपली अंडी पाण्यामध्ये मुक्तपणे सोडून देतात. कदाचित यामुळेच त्यांना सिन्ग्नाथिफॉम्र्स या गटामधून वेगळे करून डक्टायलोटेरीफॉम्र्स या गटामध्ये समाविष्ट केले असावे. यांची पिल्ले समुद्राच्या वरील भागात प्रवाहाबरोबर मुक्तपणे वाहताना आढळतात.
भारतात पेगासस आणि युरीपेगासस कुळामधील प्रत्येकी एक प्रजाती आढळते. या दोन्ही प्रजाती भारताच्या पूर्व किनारपट्टीवरील पाक बे आणि मन्नारच्या आखातात आढळतात. आययूसीएनच्या धोका असलेल्या प्राण्यांच्या ‘रेड लिस्ट’मध्ये, सर्व समुद्री पतंग कमी धोका असलेले किंवा त्याबद्दल जास्त माहिती उपलब्ध नसलेले म्हणून समाविष्ट करण्यात आले आहेत. या वैशिष्टय़पूर्ण माशांची संख्या कमी होण्यामागे त्यांचा अधिवास नष्ट होणे आणि मासेमारी जाळय़ांमध्ये पकडले जाणे हीच कारणे आहेत.
– डॉ. सुशांत सनये
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : www.mavipa.org