१७ व्या शतकात निसर्गातील मोजकीच मूलद्रव्य माहीत होती. परंतु नवनव्या शोधांमुळे मूलद्रव्यांची यादी वाढत गेली व एकेका मूलद्रव्याचा स्वतंत्र अभ्यास करणे अवघड झाले. मूलद्रव्यांचा शास्त्रोक्त अभ्यासासाठी मूलद्रव्यांची वर्गवारी करण्याची गरज निर्माण झाली. मूलद्रव्यांच्या गुणधर्मातील साधर्म्य, त्यांची संयुगे होण्याची शक्यता या बाबींसाठी त्याची निकड होतीच.
अनेक शास्त्रज्ञांनी आपापल्या निरीक्षणानुसार सिद्धांत मांडून मूलद्रव्यांची वर्गवारी केली. सुरुवातीच्या काळात मूलद्रव्यांची विभागणी धातू व अधातू अशी केली, परंतु लवकरच असे निदर्शनास आले की काही मूलद्रव्ये दोन्ही वर्गाचे गुणधर्म दाखवतात. १८१५ मध्ये मांडलेल्या प्राऊट्ज गृहीतकानुसार (Hypothesis) हायड्रोजनचा अणू सर्व मूलद्रव्यांचा मूलभूत घटक मानून इतर मूलद्रव्यांची निर्मिती हायड्रोजनपासून झाल्याचे मानणारा, हा युनिटरी सिद्धांत.
१८१५ मध्ये डोबेरायनर यांनी एकसारखे गुणधर्म असलेल्या ३/३ मूलद्रव्यांचे गट तयार केले व त्या त्रिकुटांचे नामकरण केले डोबेरायनरची त्रिके (triad). यातील मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या चढत्या अणुवस्तुमानानुसार केली असता मधल्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमान हे इतर दोन मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानाच्या सरासरी इतके असते. जसे लिथीयम(७)-सोडीयम(२३)-पोटॅशियम(३९) यांचे त्रिकूट याच प्रकारात मोडणारी अन्य दोन त्रिके म्हणजे क्लोरीन-ब्रोमिन-आयोडीन व कॅल्शिअम-बेरीअम-स्ट्राँशिअम. परंतु तेव्हा ज्ञात असलेल्या इतर मूलद्रव्यांबाबत अशी मांडणी करता आली नाही. १८६४ मध्ये न्यूलँड्सची सप्तके (Octave) हा सिद्धांत आला. यानुसार मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या वाढत्या अणुवस्तुमानानुसार केल्यास प्रत्येक सात सोडून आठव्या मूलद्रव्याचे गुणधर्म पहिल्या मूलद्रव्याच्या गुणधर्माशी जुळतात. या मांडणीची तुलना संगीतातल्या सप्तसुरांशी केली. अशी वर्गवारी कॅल्शिअमपर्यंतच्या मूलद्रव्यांची करता येते. तसेच निष्क्रिय वायू मूलद्रव्यांचा शोध लागल्यावर त्यांचा समावेश केल्यामुळे संपूर्ण मांडणी विस्कटली. रासायनिक, रूक्ष मूलद्रव्यांच्या गर्दीत सप्तसुरांची लय शोधणाऱ्या तरल मनाच्या व किचकट शास्त्रात देखील कलेचं सौंदर्य दाखवणाऱ्या दर्दी शास्त्रज्ञाच्या दृष्टीला सलाम!
१८६९ मध्ये लॉदर मेयरचा आण्विक आकारमान (Atomic Volume) सिद्धांत आला. मूलद्रव्यांच्या अणूचे आकारमान व अणूचे वस्तुमान यांचा आलेख मांडला असता असे दिसून आले की समान गुणधर्म असलेली मूलद्रव्ये आलेखावर एकाच वळणावर दिसतात. मूलद्रव्यांचे हे गुणधर्म त्यांच्या आण्विक आकारमानाचे आवर्ती कार्य होय; हाच तो सिद्धांत!
मीनल टिपणीस मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org