एखाद्या खडकात भूजल अथवा पेट्रोलियम साठण्यासाठी तो खडक केवळ सच्छिद्र असणे पुरेसे नसते. तर त्या खडकातल्या पोकळ्यांमधून पाणी अथवा पेट्रोलियम इकडून तिकडे वहात जाणेही तितकेच गरजेचे असते. एखाद्या जलधारक खडकाच्या ठरावीक दाबाखाली पाणी वाहून नेण्याच्या क्षमतेला त्याची पारगम्यता (परमिअॅबिलिटी) म्हणतात. खडकांमधील छिद्रांचा आकार आणि ती छिद्रे एकमेकांशी जोडलेली असण्याचे प्रमाण यावर त्या खडकाची पारगम्यता अवलंबून असते. छिद्रांचा आकार आणि त्यामधील पोकळ्यांचे आकारमान जितके जास्त असेल, तितकी त्या खडकाची पारगम्यता जास्त असते. सामान्यत: वाळूच्या कणांनी बनलेला वालुकाश्म (सँडस्टोन) जास्त सच्छिद्र आणि पारगम्य असतो. या उलट मृद्खनिजाच्या (क्ले) बारीक कणांनी बनलेल्या शेल या खडकात छिद्रे लहान असतात. त्यामुळे त्याची पारगम्यताही कमी असते. अग्निजन्य (इग्निअस) आणि रूपांतरित (मेटॅमॉर्फिक) खडक स्फटिकीभवन होऊन तयार होत असल्यामुळे त्यांची सच्छिद्रता आणि पारगम्यता खूपच कमी असते.

आंतरराष्ट्रीय मानकांनुसार पारगम्यतेच्या मापनाचे एकक हे मीटर वर्ग असले, तरी व्यवहारात मात्र पारगम्यता डार्सी या एककात मोजली जाते. डार्सी नावाच्या फ्रेंच अभियंत्याने वाळूच्या गाळणीतून जाणाऱ्या पाण्याचा प्रवाह मोजला आणि भूजलवैज्ञानिक नियम मांडला. त्याला पुढे डार्सीचा नियम असे नाव पडले. खडकाची पारगम्यता ही केवळ भूजलविज्ञानातच नव्हे तर खनिज तेल व नैसर्गिक वायू यांच्या उत्पादनात, तसेच ऊर्जा उद्याोगातदेखील अतिशय महत्त्वाची असते.

पारगम्यता वेगवेगळ्या पद्धतीने मोजली जाते. त्यानुसार तिचे काही प्रकार आहेत. परिपूर्ण पारगम्यता म्हणजेच शंभर टक्के संपृक्त अवस्थेत द्रव पदार्थ वाहून नेण्याची खडकाची क्षमता; तर प्रभावी पारगम्यता म्हणजे इतर द्रव्यांच्या तुलनेत तेल किंवा पाणी वाहून नेण्याची खडकाची क्षमता होय, तर अंशिक संपृक्त द्रवाची पारगम्यता व शंभर टक्के संपृक्त द्रवाची पारगम्यता यांच्यातील गुणोत्तर म्हणजे सापेक्ष पारगम्यता होय.

सच्छिद्रता आणि पारगम्यता हे खडकाचे भिन्न गुणधर्म आहेत. शेलसारखा एखादा खडक खूप सच्छिद्र असूनही त्याची पारगम्यता मात्र बरीच कमी असते. तसेच मृद्खनिजांची सच्छिद्रता १५ टक्के इतकी जास्त असूनही त्यांची पारगम्यता अतिशय कमी असते. अशा खडकांमधे पाण्याचा साठा होऊ शकतो, परंतु त्याचे वहन होऊ शकत नाही त्यामुळे तो साठा उपयोगात आणता येत नाही. त्यामुळे एखादा खडक हा जलधारक असूनही त्यातून पाणी मिळवता येत नाही. या कारणामुळे खडकाची वहनक्षमता हा त्याचा कळीचा गुणधर्म ठरतो.

डॉ. योगिता पाटील

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org