एकदा एखाद्या नव्यानं विकसित झालेल्या तंत्रज्ञानाचा एका क्षेत्रात चंचुप्रवेश झाला की इतर क्षेत्रातही प्रवेश मिळवण्यास ते सज्ज होते. डिजिटल तंत्रज्ञानाचीही हीच गत झाली. छायाचित्रणाच्या, फोटोग्राफीच्या क्षेत्रात स्थिरस्थावर झाल्यावर इतर कुठं त्याचा उपयोग होऊ शकतो या दृष्टीनं विचार करायला सुरुवात झाली. त्या काळात टीव्हीचे संच अगडबंब असत. ज्यावर चित्रमालिका दिसते त्या पडद्याची जाडी जरी जास्त नसली तरी त्याच्या पाठी टय़ूबचं धूड असायचं. त्या संचाच्या लांबीरुंदीऐवजी खोलीच जास्ती असायची. त्या संचांची जागा आता सडपातळ संचांनी घेतली आहे. भिंतीवर सहज लटकवता येणारे संच आज बाजारात उपलब्ध आहेत. ही किमया एलसीडी, लिक्विड क्रिस्टल संचांची आहे. यातील पडदा अनेक द्रवरूप स्फटिकांचा, लिक्विड क्रिस्टलचा बनलेला असतो. या स्फटिकांच्या दोन्ही बाजूंना प्रकाशकिरणांचं ध्रुवीकरण करणारे पत्रे असतात. त्यांच्यामध्ये त्या स्फटिकांचं सॅण्डविच तयार केलं जातं. हे पत्रे पॉलिव्हिनायल अल्कोहोल या पदार्थावर आयोडिनचा लेप देऊन तयार केले जातात. प्रकाशलहरींचं कंपन कोणत्याही दिशेनं होत असतं. पण या आयोडिनचा लेप दिलेल्या पॉलिव्हिनायलच्या पत्र्यातून जाताना त्यांची कंपनं एकाच दिशेनं करण्याची विक्रिया होते. अशा प्रकाशाला ध्रुवीकृत, पोलराइज्ड, प्रकाश म्हणतात. विद्युतप्रवाहाद्वारे त्या स्फटिकांची उघडझाप केली की ते त्यातून जाऊ पाहणाऱ्या प्रकाशकिरणाला रोखून तरी धरतात किंवा आरपार जाऊ देतात. रहदारीचं नियंत्रण करणाऱ्या पोलिसांप्रमाणेच हे स्फटिक आपली कामगिरी पार पाडतात. त्या आयोडिनयुक्त पॉलिव्हिनायलमध्ये जी दिशा निर्धारित केलेली असते त्या दिशेत कंपनं असणाऱ्या प्रकाशलहरी शोषल्या जाऊन त्यांना तिथंच रोखलं जातं. पण जर ती कंपनं त्याच्या काटकोनात होत असतील तर त्यांना पुढं जाऊ दिलं जातं. प्रकाशकिरणांची ही उघडझाप दिवा चालू किंवा बंद केल्यासारखी असते. ही पद्धत डिजिटल तंत्रज्ञानाशी सुसंगतच आहे. त्यापायी मग पडद्यावर उमटणारी प्रतिमा अधिक स्वच्छ आणि स्पष्ट होते. प्रेक्षकाच्या डोळ्यांना सुखावते. ही करामत घडवून आणण्यात अर्थात आयोडिन कळीची भूमिका पार पाडतं. आज अशा प्रकारचे आयोडिनयुक्त पडदे स्मार्ट फोनचा पडदा, नवीन डिजिटल घडय़ाळांचा पडदा, लॅपटॉपचा पडदा, अनेक उपकरणांचे महत्त्वाचे घटक आहेत. या उपकरणांशिवाय आज दैनंदिन कामकाज पार पाडणं अशक्य होऊन बसलं आहे. आयोडिन असं अत्र तत्र सर्वत्र आपल्या भवती वावरत आहे.

– डॉ. बाळ फोंडके

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org