पदार्थविज्ञान आणि रसायनशास्त्र यांमध्ये पायाभूत संशोधन केल्यामुळे वॉर्साच्या शास्त्रज्ञ स्लोडोस्का ऊर्फ मेरी क्युरी यांना दोन वेळा नोबेल पारितोषिक देण्यात आले. १८६७ साली, मेरीच्या जन्माच्या वेळी वॉर्सा शहर रशियन आधिपत्याखाली होते. प्रथम शिक्षिकेची नोकरी करणाऱ्या मेरीचा विवाह पेरी क्युरी या वैज्ञानिकाशी झाला. हेन्री बेक्वेरेल या शास्त्रज्ञाला नुकतेच युरेनियम या धातूतून क्ष-किरणांप्रमाणे अज्ञात किरण बाहेर पडताना आढळले. या किरणांना ‘बेक्वेरेल किरण’ असे नाव दिले गेले. मेरी क्युरीला संशोधनात असे दिसून आले की, शुद्ध युरेनियमपेक्षा ‘पिचब्लेंड’ या युरेनियमच्या संयुगातून अधिक प्रमाणात किरणोत्सर्ग होतो. पिचब्लेंड या संयुगातून किरणोत्सर्ग करणारे द्रव्य वेगळे करण्यात मेरीला यश आल्यावर असे लक्षात आले की, शुद्ध युरेनियमपेक्षा या नवीन द्रव्यातून चारशे पट किरणोत्सर्ग होतोय. या मूलभूत द्रव्याला मेरीने पोलंडवरून ‘पोलोनियम’ हे नाव दिले. त्या पुढच्या संशोधनात मेरीला पोलोनियमपेक्षाही अधिक किरणोत्सर्ग करणारे रेडियम हे द्रव्य सापडले. युरेनियमच्या १६०० पटीहून अधिक किरणोत्सर्ग करणाऱ्या रेडियमचे पुढे शरीर विज्ञान क्षेत्राला मोठे योगदान मिळाले आहे. विशेष म्हणजे एवढे मौलिक संशोधन करून मेरी आणि पेरी क्युरी यांची आíथक परिस्थिती त्या काळात जेमतेम असूनही त्यांना सापडलेल्या पोलोनियम आणि रेडियम या धातूंचे पेटंट न घेता त्यावर अधिक संशोधन करणेच त्यांनी महत्त्वाचे मानले. १९०३ साली पदार्थ विज्ञानशास्त्राचे तर १९११ मध्ये रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक मेरी क्युरीला देण्यात आले. मेरीच्या संशोधनाचा पहिला मोठा वापर पहिल्या महायुद्धात करण्यात आला. जखमी सनिकांच्या शरीरात घुसलेले धातूचे तुकडे त्वरित शोधण्यासाठी मेरीने पुरविलेल्या क्ष किरण यंत्रांचा मोठा उपयोग झाला. पॅरिस विद्यापीठ आणि पाश्चर या संस्थांनी मेरीच्या मार्गदर्शनाखाली कॅन्सरवरील संशोधनासाठी ‘रेडियम संशोधन संस्था’ स्थापन केली. या महान महिला शास्त्रज्ञाचा मृत्यू १९३४ मध्ये कॅन्सरने झाला.
– सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com
गुलाबाचे पुनरुत्पादन
गुलाबाची विविध रंगांमधली आकर्षक फुले अनेकांसाठी आकर्षणाचे केंद्रिबदू असतात. फुलाची अशी सुंदर नजाकत निर्माण करणारे सर्व गुलाब हे संकरित असतात. म्हणूनच त्याचे फळ किंवा बी पाहायला मिळत नाही. गुलाबाच्या अनेक जाती मध्य आशियातून जगभर पसरल्या. गुलाबाचे पुनरुत्पादन शाखा, डोळा भरणे आणि फांदीरोपण पद्धतीने होते. दोन गुलाबांच्या पर्णहीन खोडावरील सालीला इंग्रजी टीसारखा छेद घेऊन त्यामध्ये संकरित गुलाबाच्या फांदीवरील परिपक्व डोळा काढून बसवितात. यास प्लॅस्टिकच्या पट्टीने बाजूने बंद केले की, ग्राफटिंगची क्रिया पूर्ण होते.
साधारणपणे दोन आठवडय़ांनी या जागेवर कोवळी पाने फुटतात. ज्या गुलाबाला डोळा बसवला आहे त्याचेच फूल नवीन फांदीवर येते. देशी गुलाबाच्या एका फांदीवर चार-पाच वेगवेगळ्या संकरित गुलाबांचे डोळे बसवून एकाच गुलाबावर वेगवेगळ्या रंगांची फुले येऊ शकतात.
अनेक रोपवाटिकांमध्ये आपणास अशा पद्धतीचे गुलाबाचे पुनरुत्पादन पाहावयास मिळू शकते. गावठी गुलाबाची रोपे शाकीय पद्धतीने तयार करतात. या पद्धतीत पेन्सिलच्या आकाराच्या १५ सेंटिमीटर लांबीच्या फांद्या कापून त्यांचे लहान पिशव्यांमध्ये रोपण केले जाते. या रोपांवर डोळा भरणे होते. जंगली गुलाबास बी येऊ शकते, मात्र ते रुजण्याची क्षमता फारच कमी असते. पिशवीत लावलेल्या देशी गुलाबाच्या खोडावर टोकास उभी खाच घेऊन त्यात संकरित गुलाबाची फांदी चाकूने व्यवस्थित आकार देऊन बसवली जाते. त्यास प्लास्टिक पट्टीने व्यवस्थित बांधले की रोपण व्यवस्थित होते. राजस्थानमधील अजमेर, हळदीघाटी, पुष्कर या ठिकाणी देशी गुलाबाची शास्त्रीय पद्धतीने शेती केली जाते. या गुलाबांचा उपयोग गुलकंदनिर्मिती, गुलाबपाणी करण्यासाठी केला जातो. संकरित गुलाब आपल्या बागेत अथवा गॅलरीत दोन-तीन वर्षे छान शोभा देऊन जातो. मात्र अशा गुलाबाचे शाकीय पद्धतीने पुनरुत्पादन होऊ शकत नाही. गॅलरीत किंवा बागेत छानसा टपोरा आकर्षक गुलाब आणि कलम करण्यासाठी आवश्यक साहित्य असेल तर रोपवाटिकेमध्ये जाऊन गुलाबाचे रोप मिळवा आणि निसर्गामधील अनोख्या सौंदर्यनिर्मितीचा आनंद लुटा.
– डॉ. नागेश टेकाळे
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org