इटलीतील पिसा शहराच्या बाबतीत बोलायचे झाल्यास तिथला फक्त कलता मनोरा एवढी एकच गोष्ट चर्चा करण्यासारखी नाही, असे असले तरीही पिसाच्या इतिहासात फार काही विशेष आहे असेही म्हणता येणार नाही. पिसाचा ज्ञात इतिहास अधिकतर इ.स.पूर्व १८० पासून सुरू होतो. त्या वर्षी अर्नो नदीच्या मुखाशेजारची, टायऱ्हेनियन समुद्र किनारपट्टीवरील पिसा ही वस्ती रोमन साम्राज्याची एक वसाहत म्हणून उदयाला आली. रोमनांनी या वसाहतीला नाव दिले ‘पोर्तस पिसानस’. तत्कालीन काही व्यापारी शहरांना समुद्राचे सान्निध्य नसल्यामुळे पिसाच्या बंदरातूनच मालवाहतूक चालत असे. आर्नो नदी आणि सागर किनारा हे दोन्ही पिसा शहराला लागून असल्यामुळे पिसा बंदराचे महत्त्व होते. रोमन सम्राट ऑगस्टस याने पिसा बंदराचे महत्त्व ओळखून संरक्षणासाठी बंदराचा विकास करून शहराभोवती तटबंदी बांधली. अडीच-तीन हजार वर्षांपूर्वी पिसा हे गाव समुद्र किनाऱ्यापासून दोन कि.मी.वर होते; परंतु आर्नो नदीतून वाहत येणारा गाळ आणि रेतीमुळे समुद्र किनाऱ्यावर रेतीचा थर वाढत जाऊन सध्याचे पिसा शहर आणि समुद्र किनाऱ्यात आठ ते दहा कि.मी.चे अंतर झाले. रोमन साम्राज्यात पिसा सामील झाले त्या काळात येथील प्रमुख रहिवासी लिम्युरियन आणि एट्रस्कन वंशांचे होते. वाहते बंदर असल्यामुळे पूर्वीपासूनच पिसाकडे प्रबळ नाविक दल होते. पिसाच्या नौदलाने रोमन सम्राटाने काढलेल्या अनेक सागरी मोहिमांमध्ये मोठी मदत केली आहे. सातव्या शतकात पोप ग्रेगरी प्रथम याने बायझन्टाइन साम्राज्याविरुद्ध काही सागरी मोहिमा काढल्या. या मोहिमांमध्ये पिसाने आपली जहाजे, नौसनिक आणि खलाशी यांचा मोठा सहयोग दिला. पुढे रोमन साम्राज्याच्या पडत्या काळात, पाचव्या शतकात युरोपातील रानटी टोळ्यांनी पिसा आणि टस्कनी परगण्यांत मोठा विध्वंस केला आणि अनेक शहरांची आíथक परिस्थिती, स्थर्य कोलमडले, परंतु पिसाने मात्र आपल्या बंदराच्या जोरावर आपली आíथक परिस्थिती बऱ्यापकी स्थिर ठेवण्यात यश मिळवले.
– सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा