मध्य इटालीतील पिसा, फ्लोरेन्स, जिनोआ आणि लुक्का ही व्यापारावर अर्थसंपन्न बनलेली शहरे. व्यापारातली स्पर्धा आणि त्यामुळे आलेल्या वैमनस्यातून या शहरांमध्ये अनेक वेळा संघर्ष आणि लढाया होत. १२८४ साली पिसा आणि जिनोआ यांच्यात मेलोरिया येथे झालेल्या लढाईत पिसाचा अत्यंत दारुण पराभव झाला. साधारणत: ११ हजार खलाशी आणि नौदल सनिकांपकी या लढाईत काही मारले गेले आणि काही जिनोआच्या तुरुंगात खितपत पडले. पिसाचे आरमार पूर्णपणे नष्ट झाले. या पराभवाच्या धक्क्यातून पिसा परत सावरले गेलेच नाही. युद्धानंतर पिसात यादवी माजली, आर्चबिशप आणि सरदार यांच्यात संघर्ष सुरू होऊन काऊंट उगोलीनो, त्याची दोन मुले आणि दोन पुतणे शहरात एका मनोऱ्याचे बांधकाम चालू होते त्यात चिणून मारले गेले. आजही हा मनोरा ‘टॉवर ऑफ हंगर’ म्हणून ओळखला जातो. चौदाव्या शतकात पिसामध्ये कधी हुकूमशाही, तर कधी नगरराज्य प्रशासन कार्यान्वित होते. १३३८ साली पिसा विद्यापीठ स्थापन झाले. १३७० मध्ये पिसाचा प्रसिद्ध कलता मनोरा बांधून पूर्ण झाला. पुढे पिसाचा विख्यात शास्त्रज्ञ गॅलिलिओ गॅलीली पिसा विद्यापीठात गणित शिक्षक म्हणून नोकरीस लागला आणि या काळात त्याने गुरुत्वाकर्षणाचे काही प्रयोग करून आपले सिद्धान्त मांडले. पंधराव्या शतकात झालेल्या सत्तांतरांमध्ये पिसा नगरराज्य कधी मिलान राजघराण्याच्या, तर कधी फ्लोरेन्सच्या अमलाखाली आले. पण पुढे पिसाने या दोन्ही सत्तांचे वर्चस्व झुगारून देऊन स्वतंत्र अस्तित्व राखले. अठराव्या शतकाच्या अखेरीस इंग्लंडमध्ये झालेल्या राजकीय उलथापालथीतून आलेल्या दडपणामुळे अनेक साहित्यिक आणि राजकीय नेते इटालीत येऊन राहिले. प्रसिद्ध इंग्रजी साहित्यिक लॉर्ड बायरन, शेले आणि पर्सी पिसात येऊन स्थायिक झाले. १८७० साली इटालीचे एकीकरण होऊन तो एक स्वतंत्र देश निर्माण झाल्यावर पिसा हे नगरराज्य इटालियन प्रजासत्ताकाचा भाग बनले.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

 

कळलावी

कळलावी ही वनस्पती नावाप्रमाणेच गर्भाशयाला कळा आणण्याचे काम करते. बाळंतपणाच्या वेळी वेणा येण्याकरिता व गर्भपातासाठीसुद्धा या वनस्पतीच्या कंदाचा वापर करतात. या वनस्पतीच्या अनेक प्रचलित नावांपकी ‘कळलावी’ हे असून शास्त्रीय नाव आहे ‘ग्लोरिओसा सुपर्बा’. ही औषधी वनस्पती लिलिएसी कुळातील आहे. ग्लोरिअस म्हणजे सुंदर फुले येणारी आणि ती सुंदर दिसते म्हणून सुपर्बा. पावसाळ्यात कोकणात ठिकठिकाणी या वनस्पतीची लाल रंगाची आकर्षक फुले लक्ष वेधून घेत असतात. जवळ जाऊन पाहिल्यास फुलाचा देठ आठ ते दहा सेंटीमीटर लांब असून फुलाचे तोंड खाली, पण पाकळ्या उलटय़ा वरच्या दिशेने वळलेल्या आणि कडा वेडय़ावाकडय़ा असलेल्या सहा पाकळ्या दिसतात. सहा पुंकेसर आणि स्त्रीकेसराचे ३ ते ४ तंतू फुलातून बाहेर आलेले दिसतात. पाकळ्यांची टोकं तांबडी, मधला भाग पिवळा असल्याने अग्निज्वाला असल्याचा भास होतो. अग्निज्वालाप्रमाणे असणाऱ्या या पाकळ्या दुरून समईत ज्योती तेवल्याप्रमाणे दिसतात, म्हणूनच या वनस्पतीला ‘अग्निशिखा’ असंही म्हणतात.

ही वर्षांयु वनस्पती वेली वर्गातील आहे. कळलावी कोकणात, पश्चिम घाटात तसेच मराठवाडा, विदर्भात सर्वत्र आढळते. पाऊस पडला की जमिनीतील कंदातून या वनस्पतीची रुजवण होते. महिनाभरात वेली पसरू लागतात. खोड अशक्त, नाजूक असते व आधारास गुंडाळत जाते. पानांना देठ नसतो. पाने साधी. पानांचा शिराविन्यास समांतर असून खोडावरील मांडणी एका आड एक लांबट शंकूच्या आकाराची, परस्परविरोधी, गुंडाळलेली, टोकदार असतात. पानांची टोके िस्प्रगसारखी विळखे घेऊन पकड घेत घेत वर चढतात. या वनस्पतीस जमिनीखाली कंद येतात व त्यास आगंतुक मुळे असतात. कळलावीची फुले दिसेनाशी झाली म्हणजे, कळलावीचे झाड नक्की कोठे होते, हेही ओळखणे कठीण जाते. कारण पाने व वेलही ताबडतोब वाळतो. कंद सुप्तावस्थेत राहातो व पुढील पावसाळ्यात ते आपला जीवनक्रम पुन्हा सुरू करतात.

कळलावी वनस्पतीचे औषधीदृष्टय़ा उपयुक्त भाग म्हणजे कंद, पाने आणि बी आहेत. पानांच्या रसाने उवा मरतात. बीमध्ये जास्त प्रमाणात कोल्यीसीन हे औषधीद्रव्य सापडते. व्रण, गंडमाळा, सर्पदंश, िवचूदंश यावर कंद उगाळून लेप करतात.

शुभदा वक्टे मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org

 

Story img Loader