युरेनसचे गणिताद्वारे काढलेले स्थान आणि प्रत्यक्ष स्थान यातील फरक हा नेपच्यूनच्या शोधास कारणीभूत ठरला. त्यानंतरही युरेनसच्या स्थानाच्या गणितात काही त्रुटी राहतच होती. त्यामुळे नेपच्यूनच्या पलीकडील एखाद्या ग्रहाच्या गुरुत्वाकर्षणाचा, युरेनसच्या कक्षेवर परिणाम होत असल्याची शक्यता दिसून येत होती. नेपच्यूनच्या शोधानंतर दोन वर्षांनीच म्हणजे १८४८ मध्ये फ्रेंच खगोलतज्ज्ञ जॅकस बॅबिनेट याने, तसेच विसाव्या शतकाच्या सुरुवातीला अमेरिकन खगोलतज्ज्ञ पर्सविल लॉवेल व इतरांनी आपआपल्या गणितांद्वारे या ग्रहाचे स्थानही शोधले.
पर्सविल लॉवेल याने फ्लॅगस्टाफ येथील स्वतच्या वेधशाळेतून, या नवव्या ग्रहाचा शोध घेण्यास १९०५ साली सुरुवात केली. १९१६ मध्ये लॉवेलचा मृत्यू होईपर्यंत हा नववा ग्रह काही सापडला नाही. त्यानंतर १९२९ साली या कामासाठी लॉवेल वेधशाळेने क्लाईड टॉम्बॉ या तरुणाची नेमणूक केली. या नवव्या ग्रहाचा शोध म्हणजे टॉम्बॉच्या चिकाटीची कसोटी होती. या शोधासाठी, आकाशाच्या विविध भागांची छायाचित्रे दुर्बणिीद्वारे काही दिवसांच्या अंतराने, पुन्हा घ्यावी लागत. दोन वेळा घेतलेल्या या छायाचित्रांतील हजारो वस्तूंपैकी एखाद्या वस्तूचे स्थान बदलले आहे का, हे ‘ब्लिंक कंपॅरेटर’ नावाच्या साधनाद्वारे तपासावे लागे. अशी वस्तू सापडल्यास, तो एखादा ज्ञात धूमकेतू वा लघुग्रह नसल्याची खात्री करून घ्यावी लागे.
हा अत्यंत खडतर शोध अखेर नऊ महिन्यांनी संपला. २३ जानेवारी आणि २६ जानेवारीला घेतलेल्या छायाचित्रांत, मिथुन तारकासमूहातील एका अज्ञात वस्तूचे स्थान किंचितसे बदललेले टॉम्बॉला आढळले. पूर्ण खात्री होण्यासाठी आणखी काही दिवस निरीक्षणे केली गेली आणि त्यानंतर हा नवव्या ग्रहाचा शोध १३ मार्च १९३० रोजी अधिकृतरीत्या जाहीर केला गेला. अत्यंत अंधूक व अतिशय दूरवर असणाऱ्या या ग्रहाला, सार्थ ठरणारे ‘प्लूटो’ हे पाताळलोकीच्या ग्रीक देवाचे नाव देण्यात आले. पण विशेष म्हणजे पुढील संशोधनात, या नवव्या ग्रहाचे वस्तुमान अपेक्षेपेक्षा खूपच कमी असल्याचे आढळले. प्लूटोचे गणिताद्वारे काढलेले वस्तुमान प्रत्यक्ष वस्तुमानापेक्षा अधिक भरण्याचे कारण ‘नेपच्यूनच्या वस्तुमानातील अनिश्चितता’ हे असल्याचे कालांतराने दाखवून दिले ते व्हॉयेजर यानाने. इ.स. २००६ मध्ये या छोटय़ा आकाराच्या प्लूटोला ‘ग्रह’ या स्थानावरून पदच्युत करून ‘खुजा ग्रह’ या नव्या वर्गात टाकण्यात आले.
प्रदीप नायक
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org