प्राण्यांप्रमाणे वनस्पतीसुद्धा त्यांना खायला येणाऱ्या प्राणी-पक्ष्यांपासून स्वत:चं संरक्षण करण्यासाठी अनेक प्रकारची रसायनं वापरत असतात. काही वनस्पती तर त्यांना खाणाऱ्या कीटकांना वेगळ्या प्रकारेच अद्दल घडवतात. या वनस्पती साधारणपणे कडधान्यांच्या वर्गात मोडतात. कीटकांच्या किंवा प्राण्यांच्या शरीरात प्रथिनं असतात. प्रथिनांमध्ये आरगॅनाइन नावाची अमिनो आम्लं असतात. कीटकांना अद्दल घडवणाऱ्या कडधान्याच्या वर्गातल्या या वनस्पती, प्राण्यांच्या शरीरात आढळणाऱ्या आरगॅनाइनसारखीच रचना असणारं कॅनाव्हॅनाइन नावाचं प्रथिन नसलेलं रसायन तयार करतात. जेव्हा कोणताही कीटक, पक्षी, प्राणी ही वनस्पती खातो तेव्हा प्राण्याच्या शरीरातली प्रथिनं हे रसायन, आरगॅनाइन आहे असं समजून स्वीकारतात, पण कॅनाव्हॅनाइन मुळातच प्रथिन नसल्यामुळे, ते प्राण्याच्या शरीरातल्या प्रथिनांना नष्ट करायला लागतं, परिणामी तो प्राणी मरतो.
काही वनस्पती पेशींमध्ये सायनोजेनिक ग्लायकोसाइड नावाचं रसायन असतं. जेव्हा एखादा पक्षी ही वनस्पती चावतो, तेव्हा त्यातल्या पेशी फुटतात. पेशी फुटल्याबरोबर त्यातल्या सायनोजेनिक ग्लायकोसाइडमधून हायड्रोजन सायनाइड बाहेर पडतं. हायड्रोजन सायनाइड हे विषारी द्रव्य असून ते श्वासोच्छ्वासाच्या क्रियेत अडथळा आणतं आणि पक्ष्याला आपले प्राण गमवावे लागतात. हेच सायनोजेनिक ग्लायकोसाइड सफरचंदाच्या बियांमध्येही असतं, पण त्यांचं मानवी शरीरावर काहीही विपरीत परिणाम होत नाही आणि तसंही आपण सफरचंदाच्या बिया खातच नाही.
टोमॅटोच्या पानांमध्ये आणि देठांमध्ये सोलानीन नावाचं एक विषारी रसायन असतं. तसंच टोमॅटोच्या पानांमध्ये, देठांमध्ये आणि कच्च्या टोमॅटोंमध्ये ‘अल्कोलोइड टोमॅटीन’ हे विषारी रसायन असतं. पण एकतर ते मानवी शरीराला अपाय होण्याइतक्या प्रमाणात नसतं आणि एकदा का टोमॅटो पिकला की ही सारी विषारी रसायनं नष्ट होतात.
अशाच प्रकारची संरक्षक रसायनं द्राक्षं, चेरी यांसारख्या फळांमध्येही असतात. द्राक्षं तर कुत्र्यांसाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतात. तीच गत कांदा आणि लसूण यांची! कांदा आणि लसूण यात असणारी ‘थायोसल्फेट्स’, कुत्रा, मांजर किंवा इतर पाळीव प्राण्यांसाठी जीवघेणी ठरू शकतात.
डॉ. मानसी राजाध्यक्ष (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई – office@mavipamumbai.org

मनमोराचा पिसारा – भक्ती म्हणजे काय?
दरवर्षी मनात न चुकता, चुकचुकणारा प्रश्न उभा राहतो. अलीकडच्या ई माध्यमं आणि सोशल साइटवरून तर मनावर त्या अलोट गर्दीच्या चित्रांचा भडिमार होत असतो. कपाळावर टिळे, हातात टाळ, गळ्यात माळ घेऊन रस्त्यावर मैलोन्मैल चालणारे भाविक वारकरी पाहिले की मन भरून येतं, त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर सात्त्विकतेचे भाव असतात आणि डोळ्यांत इष्ट देवतेशी होणाऱ्या भेटीचा आनंद असतो. अतिव उत्कटता, अपार श्रद्धा मनात बाळगून ही मंडळी पंढरपूरला पोहोचतात. कधी मूर्तीचं तर बऱ्याचदा कळसाचं दर्शन घेऊन परततात आणि इकडे आपलं मन प्रश्नांकित होतं.
मनात वारंवार एकच प्रश्न उमटतो. भक्ती म्हणजे काय? भक्ती म्हणजे कोणता अनुभव? कोणती क्रिया-प्रक्रिया? कोणता विचार?
ठराविक उत्तरं मिळाली. भक्तीनं ओथंबून वाहणारे अश्रू दिसले, प्रसन्न चेहऱ्यावरील आनंद दिसला. ती उत्कटता, समर्पण मनात मोहित करीत होतं. पण त्यानं प्रश्नाचं उत्तर मिळत नव्हतं. भक्ती म्हणजे श्रद्धा का? भक्ती म्हणजे निष्ठा का? भक्ती म्हणजे आपापल्या दैवतावरचा विश्वास का? की भक्ती हा केवळ एक मार्ग, एक रुंद पायवाट? एक प्रतिष्ठित राजरस्ता?
म्हणतात, की संत महात्म्यांनी विठ्ठल भक्तीमधून संसारातल्या अनुदिनी, अनुतापापासून मुक्तीचा पंथ दाखवला. या मार्गावर तुमच्या पुढे, मागे नि बरोबरीनं चालणारे अनेक भक्तगण असतात. त्यांच्या जोडीनं चालावं, पंढरीची वाट धरावी म्हणजे प्रापंचिक दु:ख आणि मनस्ताप सहन करायला धीर येईल. मनाला बळ मिळेल. जाता जाता अभंग म्हण, विठुनामाचा गजर कर. सर्वत्र दुमदुमणाऱ्या त्या नादविश्वात तुझं परमब्रह्म गवसेल. हाच भक्तीमार्ग, हीच भक्ती. भक्ती म्हणजे उत्कट भावना, अपरंपार प्रेम.
माणूस जगतो तो त्या प्रेम-भक्तीच्या ऊर्जेवर. त्या ऊर्जेचा स्रोत म्हणजे पंढरीचा पांडुरंग. विचार करू नकोस, मन नि:शंक कर, एकाग्र हो, म्हणजे मनरूपी कलशात भक्तीरस ओसंडून वाहू लागेल. संशय, नास्तिक विचारानं मन भरून गेलं असेल तर ते रिकामं कर तरच त्यात भक्ती दाटून येईल.
असंही कोणीतरी म्हटलं.
म्हटलं तर काहीतरी कळल्यासारखं वाटलं. क्षणभर मन समाधान पावलं. पण प्रश्नाचं संपूर्ण उत्तर नाही मिळालं.. म्हणून थांबलो.
तोच पहाटे कधीतरी मनात विजेचा लखलखाट झाला. माझ्यापुरतं मला उत्तर मिळालं. तुकोबारायांनी सुचवलं होतं आपुलाच वाद आपुल्याशी.. त्याचा अर्थ उलगडला.
भक्ती म्हणजे संवाद. भक्ती म्हणजे माझ्या मनातल्या सद्भावाशी माझा मी केलेला संवाद. भक्ती म्हणजे स्वत:मधल्या सत्त्वगुणांची ओळख, पारख आणि जोपासना.
भक्ती म्हणजे मनोभावे स्वततल्या ईश्वराची आराधना, सद्गुणांवर अपरंपार प्रेम. माझ्या मनातला चांगुलपणा म्हणजे वैश्विक मंगलमय ऊर्जेचा माझ्या वाटय़ाला आलेला अंश. त्या ‘सत्त्वा’वरील विश्वास.. मला मनोमन वाटलं.
नको चंद्रभागा, नको ती पंढरी
भाव भक्ती उरी जोपासावी
मुक्यानेच गावा, तुक्याचा अभंग
मनी पांडुरंग आठवावा
डॉ.राजेंद्र बर्वे – drrajendrabarve@gmail.com

प्रबोधन पर्व – ‘भावजीवनाच्या पोकळी’तून कला निर्माण होत नाही..
‘‘प्रगतीशील व प्रतिगामी यातला फरक कलेच्या क्षेत्रात कसा ओळखायचा? समाजातील सामाजिक नाती, वर्गीय नाती, ही आपापल्यापरी वेगवेगळ्या नैतिक व भावनात्मक स्वभावविशेषांनी युक्त अशी आहेत. जेव्हा एकंदर समाजाच्या भौतिक सुखाची वाढ प्रचलित सामाजिक नात्यांपायी अडून राहते – मग ही नाती गुलाम व मालक अशी असोत, भूदास व जमीनदार अशी असोत, कामगार व कारखानदार अशी असोत – आणि जेव्हा दलित व पिळली जाणारी जनता या अडचणीतून बाहेर पडायचा मार्ग शोधू लागते, तेव्हा ती नवी मूल्ये, नव्या भावना, नवी सत्ये, नवी वास्तवता निर्माण करते. जुन्या नात्यांना उचलून धरणारे प्रतिगामी ठरतात. बदललेल्या नात्यांचे अगर बदलणाऱ्या नात्यांचे पवाडे गाणारे हे प्रगतीशील-पुरोगामी ठरतात.’’
– कॉ. श्रीपाद अमृत डांगे कलेच्या क्षेत्रातील पुरोगामी-प्रतिगामी हा फरक सांगत कलावंतांच्या स्वातंत्र्याविषयी लिहितात –
‘‘राजकारणाचा व जनतेच्या जीवनाचा आविष्कार कलेच्या द्वारा करायचा म्हणजे तो कलेच्या नियमांना धरूनच व्हायला पाहिजे हे नि:संशय. आविष्कृतीच्या क्षेत्रात कलावंत हा पूर्ण स्वतंत्रच असतो; या बाबतीतले नियम त्याचे त्यानेच बसवायचे असतात, ते त्याचा तोच प्रत्यक्ष लेखनाच्या द्वारे तयार करीत असतो. पण या स्वातंत्र्याचा दुरुपयोग करून त्याने आमच्या राजकारणाचे हाल करता कामा नयेत, आमच्या राजकारणाला ओंगळ स्वरूप द्यायचे, अगर त्याचे होत्याचे नव्हते करायचे अगर ते विकृत स्वरूपात वर्णन करायचे – असले काही करता कामा नये. असे करणे म्हणजे कला नव्हे..
 .. कला ही भावजीवनाच्या पोकळातून सहजगत्या निर्माण होते ही कल्पना आपण टाकून दिली पाहिजे. कलावंत हे अलग अलग असे परमाणु आहेत, ते एकमेकांपासून व सर्वापासून (उर्वरित समाजापासून) अलग असतात, ही कल्पना आपण आपल्या डोक्यातून काढून टाकली पाहिजे.’’

Story img Loader