प्राण्यांप्रमाणे वनस्पतीसुद्धा त्यांना खायला येणाऱ्या प्राणी-पक्ष्यांपासून स्वत:चं संरक्षण करण्यासाठी अनेक प्रकारची रसायनं वापरत असतात. काही वनस्पती तर त्यांना खाणाऱ्या कीटकांना वेगळ्या प्रकारेच अद्दल घडवतात. या वनस्पती साधारणपणे कडधान्यांच्या वर्गात मोडतात. कीटकांच्या किंवा प्राण्यांच्या शरीरात प्रथिनं असतात. प्रथिनांमध्ये आरगॅनाइन नावाची अमिनो आम्लं असतात. कीटकांना अद्दल घडवणाऱ्या कडधान्याच्या वर्गातल्या या वनस्पती, प्राण्यांच्या शरीरात आढळणाऱ्या आरगॅनाइनसारखीच रचना असणारं कॅनाव्हॅनाइन नावाचं प्रथिन नसलेलं रसायन तयार करतात. जेव्हा कोणताही कीटक, पक्षी, प्राणी ही वनस्पती खातो तेव्हा प्राण्याच्या शरीरातली प्रथिनं हे रसायन, आरगॅनाइन आहे असं समजून स्वीकारतात, पण कॅनाव्हॅनाइन मुळातच प्रथिन नसल्यामुळे, ते प्राण्याच्या शरीरातल्या प्रथिनांना नष्ट करायला लागतं, परिणामी तो प्राणी मरतो.
काही वनस्पती पेशींमध्ये सायनोजेनिक ग्लायकोसाइड नावाचं रसायन असतं. जेव्हा एखादा पक्षी ही वनस्पती चावतो, तेव्हा त्यातल्या पेशी फुटतात. पेशी फुटल्याबरोबर त्यातल्या सायनोजेनिक ग्लायकोसाइडमधून हायड्रोजन सायनाइड बाहेर पडतं. हायड्रोजन सायनाइड हे विषारी द्रव्य असून ते श्वासोच्छ्वासाच्या क्रियेत अडथळा आणतं आणि पक्ष्याला आपले प्राण गमवावे लागतात. हेच सायनोजेनिक ग्लायकोसाइड सफरचंदाच्या बियांमध्येही असतं, पण त्यांचं मानवी शरीरावर काहीही विपरीत परिणाम होत नाही आणि तसंही आपण सफरचंदाच्या बिया खातच नाही.
टोमॅटोच्या पानांमध्ये आणि देठांमध्ये सोलानीन नावाचं एक विषारी रसायन असतं. तसंच टोमॅटोच्या पानांमध्ये, देठांमध्ये आणि कच्च्या टोमॅटोंमध्ये ‘अल्कोलोइड टोमॅटीन’ हे विषारी रसायन असतं. पण एकतर ते मानवी शरीराला अपाय होण्याइतक्या प्रमाणात नसतं आणि एकदा का टोमॅटो पिकला की ही सारी विषारी रसायनं नष्ट होतात.
अशाच प्रकारची संरक्षक रसायनं द्राक्षं, चेरी यांसारख्या फळांमध्येही असतात. द्राक्षं तर कुत्र्यांसाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतात. तीच गत कांदा आणि लसूण यांची! कांदा आणि लसूण यात असणारी ‘थायोसल्फेट्स’, कुत्रा, मांजर किंवा इतर पाळीव प्राण्यांसाठी जीवघेणी ठरू शकतात.
डॉ. मानसी राजाध्यक्ष (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई – office@mavipamumbai.org
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा