प्राण्यांची पिल्ले, वनस्पतींची फळे, बिया, जनक प्राण्यांबरोबर, वनस्पतींबरोबर आयुष्यभर एकत्र राहणे हिताचे नसते. नवे जीव जनकांबरोबर राहिल्यास जीवांच्या दाटीमुळे, अन्नघटक कमी पडून तीव्र स्पर्धेमुळे कुपोषण होईल. दोन-चार पिढय़ांनंतर ते मरतील. बहुतेक जातींचे प्राणी स्थलांतर करू शकतात. प्रजा विखरून जीवनावश्यक घटकांसाठीची स्पर्धा सौम्य होते. वनस्पतींबाबत हे कठीण असते. त्या मातीत मुळे खुपसून स्थिरावलेल्या असतात. दूर जाणाऱ्या प्रजेला चांगले वातावरण मिळेलच अशी खात्री नसते, पण शक्यता असते. जनकांपासून दूर न गेल्यास घोळक्याने मरण्याची शक्यता म्हणून तुलनेने कमी धोक्याचा, फायदेशीर मार्ग म्हणजे प्रजेने पूर्वपिढय़ांपासून दूर जाणे.
वनस्पतींची फळे-बिया यांचा प्रसार हवा, वारा, कीटक, केसाळ सस्तन प्राणी, पक्षी, माणसांकडूनही होतो. नद्या, समुद्रमार्गेही होतो. ताडाची, नारळाची गोलसर फळे उतारावरून घरंगळतात. त्यांच्या जलरोधी आवरणातील तंतूंमधील पोकळय़ांतील हवा फळांना तरंगत ठेवते. ताडकुलातील झाडे किनाऱ्यालगत असतील तर समुद्रप्रवाहाबरोबर त्यांची फळे शेकडो-हजारो किलोमीटर लांब जाऊ शकतात. एका खंडातून दुसऱ्या खंडापर्यंतही जाऊ शकतात. चिंचोक्यांसारख्या चपटय़ा वा वाटाण्यासारख्या गोल, कडक कवचाच्या बिया, नद्यांत वाढणाऱ्या सीबीन्सच्या शेंगांत असतात. शेंगा फुटून बिया तरंगत, वाहत समुद्रप्रवाहांतून हजारो मैल दूर जातात.
रायझोफोरासारखी खारफुटीची झाडे, खाडय़ांतील दलदलीत वाढतात. त्यांच्या बिया, फळे जनक झाडापासून अलग न होताच अंकुरतात. छोटी रोपे झाडावरच पानांनी डवरतात. पाण्यात वाहून जातात. भरतीच्या पाण्यातून दूर जाऊन रुजतात. अनेकदा अशा रोपटय़ांची मुळे, पाने एकमेकात गुंफून तराफे तयार होतात. त्यात माती, पालापाचोळा अडकून बेटे निर्माण होतात. फळे, बिया, लहानमोठे प्राणी यांच्यासह अशी बेटे जातात समुद्रसफरीवर! स्थलांतर करणारे पक्षी-प्राणी वाटेत अशा बेटांवर विश्रांतीसाठी बसतात. त्यांच्या विष्ठेतील बिया तरंगत्या बेटांवरून दूरवर जातात.
तपकिरी रंगाचे केल्पसारखे शेवाळ ३०० फुटांपर्यंत लांब रिबनसारखे वाढते. त्यांच्या शरीरात हवेने भरलेले, लंबगोल तरंगक असतात. शरीर खंडित झाले तर शरीरखंड समुद्रातून लांब जाऊन वाढू शकतात. भरती-ओहोटीमुळे पाण्यात खळबळ निर्माण होते ती झोस्टेरा या समुद्री गवताला पिळते, तोडते. ते तुकडे दूर जाऊन वाढतात. अंदमान, तमिळनाडूतील डूगॉन्ग-समुद्रगायी, कासवे समुद्रगवत खातात. त्यांच्या शेणातूनही अशा बियांचा प्रसार होतो.
– नारायण वाडदेकर
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : www.mavipa.org