विविध रोगांचे विषाणू आणि बुरशी यांच्यामुळे पिकांना धोका असतो, असा समज आहे. परंतु जंगलातील झाडाझुडपांना प्रतिकूल परिस्थितीत मात करण्यास सूक्ष्मजीव साहाय्यभूत ठरतात, असे अमेरिकेतील पेन स्टेटमधील विषाणूतज्ज्ञांना आढळले आहे.
वाढत्या शहरीकरणामुळे मोकळी जागा झपाटय़ाने कमी होत चालली आहे. बदलत्या वातावरणाचादेखील अन्नउत्पादनावर विपरित परिणाम होत आहे. यातून असंतोष माजून यादवी होऊ शकते. हे टाळण्यासाठी पुरेसे अन्न पिकवावे लागणार आहे. दुष्काळासारखी नसíगक आपत्ती वाढत असताना अन्नपुरवठय़ासंबंधी गंभीर प्रश्नचिन्हे निर्माण होत आहेत.
अशा वेळी, शास्त्रज्ञांनी एक दिलासादायक बाब हुडकून काढली आहे. वनस्पती आणि विषाणूंतील सहकार्यामुळे दुष्काळग्रस्त परिस्थितीत तग धरून राहण्यास विविध पिकांना मदत होत असते. या संशोधकांनी चार विविध प्रकारचे विषाणू आणि भात, टोमॅटो, बीट अशा नाना पिकांच्या साहाय्याने केलेल्या प्रयोगात प्रस्तुत बाब स्पष्ट झाली. हे जीवाणू कडक उष्म्यात झाडांना तग धरण्यास साह्य़भूत ठरतात. पिके आणि सूक्ष्मजीव एकत्र असले तर ते कोस्टारिकासारख्या ज्वालामुखीने तापलेल्या जमिनीतसुद्धा ५०अंश सेल्सियसपर्यंत जगू शकतात. त्यांना जर वेगळे केले तर मात्र दोन्ही जीव या उष्ण वातावरणात टिकाव धरू शकत नाहीत. विषाणू वेगळे केलेली पिके मलूल होतात व त्यांना विषाणूंचा पुरवठा करताच ते पुन्हा प्रफुल्लित होतात. याचा अर्थ, उष्ण तापमानाला टिकाव धरण्यासाठी पिकांना विषाणूंची गरज लागते. हे नेमके कसे घडते, हे शोधून काढणे, ही संशोधनाची पुढची पायरी आहे.
आतापावेतो, या संशोधकांनी सात हजार विविध जातींच्या वनस्पतींवर पिकांमध्ये साधारणत: आढळणाऱ्या विषाणूंचा मारा करून सर्वेक्षण केले आहे. मनुष्य आणि प्राण्यांना रोग बाधीत करणारे सूक्ष्मजीव वनस्पतींशी मात्र चांगलेच सूत जमवतात. हे विषाणू एका पिकातून बियांद्वारे दुसऱ्या पिढीत प्रवेश करताना आढळले आहेत.
विशेषत: हे उपकारक जीवाणू, बुरशी, सूक्ष्मजीवाणू वन्य वनस्पती सृष्टीत मोठय़ा प्रमाणात आढळतात. त्यामुळे एकाच ठिकाणच्या दुष्काळग्रस्त प्रदेशात जंगलातील झाडे बहरलेली दिसतात, तर सपाट जमिनीवरील पिके मलूल झालेली आढळतात.
-जोसेफ तुस्कानो , मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org
जे देखे रवी.. – वैद्यकीय विश्व
हल्ली सर्वच क्षेत्रांतील स्पर्धा जबरदस्त आहे. पदव्युत्तर शिक्षण घेईपर्यंत डॉक्टर सत्तावीस वर्षांचा होतो. आणि एवढय़ानेच भागत नाही म्हणून विशेषज्ञ (स्पेशालिस्ट) व्हायला आणखी वेळ खर्च होतो. तिशीचा हा किंवा ही जेव्हा या स्पर्धात्मक जगाला सामोरे जातात तेव्हा स्वत:चे रुग्णालय आणि त्यातली साधनसामग्री विकत घ्यायला एकच नव्हे अनेक कोटी लागतात. तोवर कमप्युटरवाले किंवा मॅनेजमेंटवाले किंवा अकाउण्टण्ट्स बऱ्यापैकी मलिदा कमवत आहेत हे लक्षात येते. मोठय़ा खासगी रुग्णालयात नेमणुका होण्यासाठी जात, धर्म, भाषा किंवा वशिला किंवा मलिदा किंवा बापजाद्यांचे छत्र लागते. नेमणुका झाल्या तरी तुम्ही किती रुग्ण आणता ह्य़ाचा हिशोब दरवर्षी केला जातो. त्यात कुणी कमी पडला तर त्याला कानपिचक्या मिळतात. रुग्णांची संख्या वाढवण्यासाठी कमिशन देता येते. त्याचा हल्लीचा दर पन्नास टक्क्य़ांपर्यंत पोहोचला आहे. याचा अर्थ तेवढेच पैसे मिळवायला त्याला/तिला एकाच्या ऐवजी दोन केसेस् कराव्या लागतात. मग अनावश्यक शस्त्रक्रियांचे प्रमाण वाढू शकते.
अर्थात काम वाढवण्यासाठीचा एक बऱ्यापैकी उपाय म्हणजे माध्यमातून (छापील किंवा दृक्श्राव्य) जनतेसमोर आपली माहिती प्रसारित करणे. एक माझा विद्यार्थी म्हणाला एजंटस्च्या किंवा जनरल प्रॅक्टिशनरच्या ऐवजी मी वर्तमानपत्रांना हाताशी धरले आहे. बातमी आली बात संपली. अर्थात हा प्रकार माहिती पसरवणे या सदरात मोडतो. कुणी काही नवे तंत्र, नवे उपकरण किंवा शस्त्रक्रियेची नवी पद्धत अमलात आणली तर पत्रकार परिषदही घेता येते. त्याही पुढे जाऊन एखादा डॉक्टर बातमीसारखी जाहिरात छापू शकतो त्यात स्वत:चा फोटोही देतात. किंवा सर्वात बेमालूम उपाय म्हणजे संस्थेची जाहिरात केली जाते. आणि आधुनिक तंत्राचा, यंत्राचा किंवा सुविधांचा पाढा वाचला जातो.
काही रुग्णालये आपल्याकडे नट, नटय़ा, उद्योजक, राजकारणी कसे दाखल होतील यासाठी यंत्रणा नेमतात. त्यामुळे वर्तमानपत्रातल्या बातमीतच त्या रुग्णालयाचा उल्लेख होतो. आणि लोकांच्या मनात त्या रुग्णालयाचे नाव चिकटते. अगदी पूर्वी एक सुप्रसिद्ध (!) डॉक्टर सिनेमा चालू असताना अमुकतमुक डॉक्टरची तातडीची गरज आहे अशी पाटी दाखवत असत. ते डॉक्टर म्हणजे ते स्वत:च.
हल्ली तर Web Sites आल्या आहेत. त्या तयार करण्यासाठी पैसे लागतात इथपर्यंत ठीक असते.
परंतु विशेषत: सौंदर्यप्रसाधक शस्त्रक्रिया किंवा उपचारांमध्ये जेव्हा कच्चे बच्चे शिरतात आणि जाहिरात करतात तेव्हा प्लास्टिक सर्जन्स जळफळतात. त्या सौंदर्यप्रसाधक स्पर्धेबद्दल उद्या..
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com
वॉर अँड पीस – बालकांचे आरोग्य-अनारोग्य
जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) आपापल्या परीने विविध देशांतील स्त्रिया व बालकांकरिता, प्रामुख्याने रक्ताचे प्रमाण वाढविण्याकरिता, विविध रंगीबेरंगी आयर्न गोळ्यांचे मोफत वाटप करीत असते. लहानपणी शाळेत प्रवेश घेतलेल्या सात-आठ वर्षांपासूनच्या मुलांचे वय हे वाढीचे असते. या वाढीच्या वयातच रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले तर मुले-मुली सतत आजारी पडतात. मुलींमध्ये भविष्यात मातामृत्यू, बालमृत्यू असे धोके उद्भवण्याची शक्यता असते, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे अनुभवी सांगणे असते. केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने केलेल्या एका पाहणीत ७० टक्के किशोरवयींमध्ये रक्तक्षय असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यासाठी सरकारने वीकली इंम्लिमेंटेशन ऑफ आयर्न फॉलिक अॅसिड सप्लिमेशन- विफ्स वाटप हा कार्यक्रम हाती घेतला आहे. ही गोळी शक्यतो जेवणानंतरच घ्यायची आहे. तीस किलोपेक्षा कमी वजन असणाऱ्यांना या गोळ्या देण्यात येणार नाहीत.
बालपांडूरोग या समस्येकडे आयुर्वेदिय दृष्टिकोन कसा आहे हे समजण्याकरिता आपण आपल्या बालकांचे आहार पदार्थ, वेळ, पुरेशी विश्रांती याचाही मागोवा घ्यावयास हवा. एककाळ शाळेत जाणाऱ्या बालकांचे जीवन शांत होते. धावपळ नव्हती. आतासारखी मार्काकरिता खूप जीवघेणी स्पर्धा नव्हती. प्रत्येक विषयाकरिता गाईड, टय़ूशन क्लासेस नव्हते. झोप पुरेशी मिळे. आताची बालके झोप पुरी व्हायच्या आत उठतात. कशीतरी आंघोळ उरकतात, पेंगतच रिक्षा वा बस पकडून शाळा वा टय़ूशन, क्लासला जातात. साखर झोपेच्या या काळात त्यांचे आरोग्य हरवले जाते. कारण घाईगर्दीने केलेला घरचा नाश्ता वा दुपारचे जेवण अंगी लागत नाही. तुम्ही-आम्ही स्वस्थचित्ताने जर जेवण जेवले तर ते अंगी लागते.
आपल्या बालगोपाळांना वेळेत जेवण, जेवणानंतर आरोग्य काढा, जेवणाअगोदर चंद्रप्रभा, ज्वरांकुश द्या. निश्चयाने बाळांना बळ येईल.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले
आजचे महाराष्ट्रसारस्वत – ३१ ऑक्टोबर
१८७२ > बेने इस्रायली मराठी नाटककार योसेफ दाविद पेणकर यांचा जन्म. ‘मक्काबी वीरांचे शौर्य’, ‘राजपुत्र आबशालोम’, ‘एस्तर राणी’, ‘रोमन राजा टेटस’ ही आख्यानवजा मराठी नाटके त्यांच्या नावावर आहेत.
१९१६ > डॉ. विष्णू गोविंद चिपळूणकर यांचे निधन. ‘मृगयाकुतूहल’,‘हिंदुस्थानातील सर्प’, ‘शरीरशिक्षण’, या पुस्तकांशिवाय, काही नाटकेही डॉ. चिपळूणकरांनी लिहिली होती.
१९२६ > मराठी व संस्कृतचे चिकित्सक अभ्यासक कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर यांचा जन्म. मम्मटाचा ‘काव्यप्रकाश’व अन्य विविध विषयांवरील ग्रंथांच्या संस्कृत संहिता त्यांनी मराठीत आणल्या, ‘मराठी व्याकरणाचा इतिहास’, ‘मराठी व्याकरण : वाद आणि प्रवाद’ असे ग्रंथ लिहिले आणि अनेक ग्रंथांसाठी अभ्यासकीय योगदान दिले. जुलै २०१३मध्ये ते निवर्तल्यावर त्यांच्या काही लिखाणाचे ‘वेचक डॉट ऑर्ग’ हे संकेतस्थळ सुरू झाले आहे.
१९८६ > कथालेखिका व ‘सांजवात’ या समाजदर्शी आत्मचरित्राच्या कर्त्यां आनंदीबाई शिवराम शिर्के यांचे निधन. ‘रूपाली’ ही कादंबरी, ‘भावनांचे खेळ आणि इतर गोष्टी’सह ७ कथासंग्रह, ३ बालकथासंग्रह लिहिलेल्या आनंदीबाईंनी बदलत्या काळातील स्त्रीचे वास्तव दर्शन घडविले .
– संजय वझरेकर