पॉलिअमाइड अर्थात नायलॉन
बहुवारिकाची प्रयोगशाळेतील निर्मिती आणि त्याचे व्यावसायिक उत्पादन या दोन्ही गोष्टी पॉलिअमाइड अर्थात नायलॉनबाबतीत प्रथम घडल्या. त्यामुळे मानवनिर्मित तंतूचे नवीन दालन सुरू झाले. नायलॉनला त्याच्या गुणामुळे जनतेने स्वीकारले, एवढेच नव्हे तर अंगावर घालण्याच्या कपडय़ापासून औद्योगिक क्षेत्रातही त्याचा वापर सुरू झाला. फेब्रुवारी १९३५ मध्ये अ‍ॅडिपिक आम्ल आणि हेक्झ्ॉमिथिलिन-डाय-अमाइन या रसायनापासून प्रयोगशाळेत पॉलिअमाइड हा तंतू प्रथम निर्माण करण्यात आला. हे पॉलिअमाइड, नायलॉन ६-६ या नावाने ओळखले जाते. जर्मन शास्त्रज्ञांनी कॅप्रोलॅक्टमपासून पॉलिअमाइडची निर्मिती साध्य केली. हा तंतू ‘नायलॉन ६’ या नावाने ओळखतात. हे नायलॉनचे दोन प्रकार मोठय़ा प्रमाणावर वापरले जातात. कॅप्रोलॅक्टमचे पॉलिअमाइड करताना त्यामध्ये थोडे पाणी घालतात तसेच सोडिअम हायड्रॉक्साइड किंवा हायड्रॉक्लोरिक आम्ल यांचा वापर उत्प्रेरक म्हणून करतात. हव्या त्या तंतू लांबीचे व तलमतेचे तंतू निर्माण करता येतात. हा सर्वच मानवनिर्मित तंतूचा मोठा फायदा आहे. नायलॉनला सुरकुत्या पडत नाहीत. तसेच तो चमकदार तंतू आहे. नायलॉनवर आम्लाचे हानीकारक परिणाम होतात. थंड व तीव्र नायट्रिक आम्लात व सल्फ्युरिक आम्लात नायलॉनचे विघटन सुरू होते. याउलट आम्लारींचा नायलॉनवर काही परिणाम होत नाही. अ‍ॅसिटोनमध्ये हा तंतू विरघळत नाही तसेच ड्रायक्लििनग किंवा कपडय़ावरील डाग काढण्यासाठी वापरली जाणारी रसायने यांचा नायलॉनवर काही परिणाम होत नाही. ब्लीचिंगची प्रक्रिया नायलॉनला हानीकारक असते, म्हणून ती टाळली जाते. रंगाईसाठी नायलॉन अगदी सुलभ तंतू आहे. आम्लरंग/ व्हॅट रंग किंवा आम्लारी रंग असे सर्व प्रकारचे रंग नायलॉनसाठी वापरता येतात. त्यामुळे फिका, मध्यम, गडद अशा कोणत्याही छटेत नायलॉन रंगवता येते. नायलॉनवर बुरशीचा, किडीचा इ.चा परिणाम होत नाही. नायलॉनची अ‍ॅलर्जी अगदी मोजक्या लोकांना असते; पण इतर सर्वाना त्याचा वापर करता येतो. नायलॉन अगदी मुलायम तंतू, त्यामुळे लहान मुलांपासून सर्वाना त्याचा वापर करता येतो. नायलॉनच्या भौतिक गुणधर्मामुळे नायलॉनचा वापर साडय़ांत केला जातो. तसेच नायलॉन धाग्याबरोबर कृत्रिम किंवा खऱ्या जराचा वापर कापड विणताना सहज करता येतो.
दिलीप हेल्रेकर (मुंबइ)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रबोधन पर्व
व्यक्तीचे स्वातंत्र जपण्यासाठी समाज-नियमन!
‘मानवी व्यक्तीची स्वयंभू प्रतिष्ठा, तिचे स्वातंत्र्य किंवा स्वायत्तता हे खास करून आधुनिक संस्कृतीत उदयाला आलेले मूल्य आहे. प्राचीन ग्रीक किंवा भारतीय नैतिक विचारात ह्य़ा मूल्याचा काही सुगावा लागू शकेल, काही प्रसादचिन्हे आढळू शकतील; पण त्याची स्पष्ट आणि स्थिर ओळख आधुनिक संस्कृतीतच झाली. आधुनिक नैतिक-सामाजिक विचारात ह्या मूल्याचे स्थान केवळ अंतिम नाही तर मूलभूत आहे. ह्य़ाचा अर्थ असा, की व्यक्तीची प्रतिष्ठा आणि इतर मानवी साध्ये-उदा., ज्ञान, कला, सुखसोयी, इ.-ह्य़ांच्यात संघर्ष आला तर व्यक्तीच्या प्रतिष्ठेचे मूल्य अबाधित राहते; त्याच्याशी सुसंगत ठरेल अशा रीतीने इतर साध्यांची साधना करणे योग्य ठरते. मानवी समतेचे तत्त्व हे प्रत्येक मानवी व्यक्तीच्या व्यक्ती म्हणून असलेल्या प्रतिष्ठेवर आधारलेले आहे. न्यायाची आधुनिक संकल्पना समतेच्या तत्त्वावर आधारलेली आहे. सर्व व्यक्तींना सर्वतोपरी समान वागणूक मिळणे न्याय्य आहे, कोणत्याही बाबतीत दोन व्यक्तींना विषम वागणूक द्यायची असल्यास असे करण्याला योग्य आणि पर्याप्त असे कारण असले पाहिजे, नाही तर तो अन्याय आहे, हे न्यायाच्या आधुनिक संकल्पनेमागचे मुख्य सूत्र आहे.’’  मेघश्याम पुंडलीक रेगे ‘हिंदू धार्मिक परंपरा आणि सामाजिक परिवर्तन’ (१९९४) या पुस्तकात व्यक्तिवादाविषयी लिहितात – ‘‘..व्यक्तीच्या खाजगी जीवनात समाजाने कोणत्याही कारणाने हस्तक्षेप करणे गैर असते; जोपर्यंत व्यक्तीच्या आचरणाचे इतरांवर दुष्परिणाम होत नाहीत तोपर्यंत ती आपल्या स्वातंत्र्याचा कसा उपयोग करीत आहे ह्य़ाकडे समाजाने लक्ष देण्याचे कारण नाही इ. अर्थात समाज अनेक व्यक्तींचा मिळून बनलेला असल्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर किंवा अधिकारावर एक बंधन आपोआपच येते. प्रत्येक व्यक्तीने आपल्या स्वातंत्र्याचा वापर इतर सर्वाच्या समान स्वातंत्र्याशी सुसंगत ठरेल अशा रीतीनेच करणे योग्य ठरते. प्रत्येकाचे स्वातंत्र्य इतर सर्वाच्या समान स्वातंत्र्याशी सुसंगत ठरावे ह्यासाठी सर्वाचे सामाजिक नियमन होणे अटळ आहे.’’

मनमोराचा पिसारा
ऑपरेशन डे ब्रेक
‘युद्धस्य कथा रम्या:’ असं मनापासून वाटायचं तेव्हा कधी तरी हा चित्रपट पाहिला. पाहता पाहता, त्यात युद्धातला ‘रम्यपणा’ नाहीसा कधी झाला कळलंच नाही.
चित्रपटातला शेवट पाहताना, आवंढा गिळताना, डोळे मिटले आणि उघडले तेव्हा ‘युद्ध’ नावाच्या भयावह वास्तवाची जाणीव झाली आणि अंग शहारलं. नंतर कधी तरी थॉमस मॅननं लिहिलेलं वाक्य वाचनात आलं- ‘इथे ‘डी’ इज फॉर डेथ अ‍ॅण्ड जी इज फॉर ग्रेव्ह!’ (चूकभूल द्यावी घ्यावी).
कहाणी दोन झेक तरुणांची, प्रत्यक्ष घटनेवर आधारित. मूळ नाव ‘ऑपरेशन अंथ्रापॉइड’. राइनहार्ड हेन्रिश या नाझी एस एस अधिकाऱ्याला बोहेमिआ आणि मोराविआ प्रदेशांचं प्रमुख केल्यानंतरचा १९४२ चा काळ.
हेन्रिश ज्यूंचा कर्दनकाळ. त्याची हत्या करण्याखेरीज गत्यंतर नाही हे ठरविल्यानंतर यॅन क्युबिस (झेक) आणि जोजफ्गॅबिक (स्लोव्हाक) या छत्रीधारी झेक सरजटना दोस्त राष्ट्रांकडून प्रशिक्षण मिळतं. त्यानंतर ते ‘प्राग’मध्ये उतरतात. हेन्रिशच्या नियमित मार्गावरील एका कठीण वळणावर त्याची मर्सीडीझ वेग मंदावते. तिथेच स्टेनगनने त्याच्यावर हल्ला करून हत्या करायची, तिथून पळण्याचा मार्गही निश्चित केलेला असतो. परंतु, आयत्या वेळी स्टेनगर अटकते, बेत फसतो आणि मग पळापळ सुरू होते.
चित्रपटाची कथा यापुढे मांडत नाही, पण शेवट सांगितल्याशिवाय राहवत नाही.
प्रत्येक प्रसंगामधला तणाव, टिमथी बॉटम्स, अँथनी अँड्रय़ूज आणि मार्टिन शॉ यांच्या भावमुद्रा विलक्षण संवेदनशीलतेनं टिपल्या आहेत.
चित्रपट प्रागमध्ये चित्रित केलेला आहे. अँटन डिफ्रिंग या अभिनेत्यानं जर्मन ऑफिसर म्हणून अनेकदा काम केलं आहे. त्याच्या चेहऱ्यावरले स्थिर भाव, उर्मट आत्मविश्वास आणि जणू काही घडलेलेच नाही असा आविर्भाव अधिक भेदक वाटतो. इथे क्रौर्य हिंसकपणे मांडलेलं नाहीये तर त्याचं वावरणं अतिशय नॉर्मल वाटतं. हीच गोष्ट मनाला छेडते, छळते.
चित्रपटाच्या अखेरीस तळघरात सापडलेल्या या तरुण सरजटना मारण्याचे अनेक मार्ग जर्मन सैनिक वापरतात. अखेरीस, तळघरात पाण्याचा प्रवाह सोडला जातो.
क्षणोक्षणी पाण्याची पातळी वाढत जाते. आता मरण केवळ अटळ असल्याच्या जाणिवेनं ती दोघं थरारतात. एका क्षणी पत्त्यांचा डावही मांडतात. पाणी गळय़ापाशी पोहोचल्यानंतर शत्रूपुढे शरणागती पत्करण्यापेक्षा एकमेकांनाच  गोळी घालून संपविण्याचा निर्णय नि:शब्दपणे घेतात. की चेहऱ्यावर अतिसूक्ष्म स्मितरेषा चमकते. दोघे गळाभेट घेतात आणि कॅमेरा तिथून सटकतो.
पिस्तुलाचा एकच आवाज आणि सारं संपल्याची जीवघेणी जाणीव करणारी शांतता पसरते. कॅमेरा पुन्हा तळघरात जातो, तेव्हा पाण्यावर तरंगणारे पत्ते फक्त दिसतात आणि चित्रपट संपतो.
मृत्यूचं तांडव, हॅण्ड ग्रेनेड, बंदुकांचे आवाज यांनी युद्धातली भीषणता जाणवते. इथे मात्र फक्त एकच आवाज आणि न दिसलेला मृत्यू!
आजही मन अस्वस्थ होतं आणि महाभारतामधल्या शोकमग्न पांडव-कौरवांची आठवण येते. सोडवायचे कसे हे प्रश्न? सुटका कशी करून घ्यायची माणसानं माणसावर लादलेल्या अत्याचाराची?
मनमोराचा पिसारा फुलायला फक्त ‘फील गुड’ नाही पुरेसं! विचारमग्नतेतूनच उगवतो एखादा आशेचा किरण..
डोण्ट मिस ‘ऑपरेशन डे ब्रेक’
डॉ.राजेंद्र बर्वे drrajendrabarve@gmail.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Polyamide nylon