पॉलिस्टर तंतूंची रंगाई प्रक्रिया सुलभ व कमी खर्चीक व्हावी यासाठी एका दिशेने चाललेल्या प्रयत्नांना धनायनी रंगाईक्षम तंतूंच्या रूपात यश मिळाले तर दुसऱ्या दिशेने चाललेल्या प्रयत्नातून जलद रंगाईक्षम पॉलिस्टर तंतूंची निर्मिती झाली.
सर्वसाधारणपणे पॉलिस्टर तंतूंच्या रंगाईसाठी विखुरणारे रंग वापरले जातात आणि या रंगाई प्रक्रियेसाठी उच्च तापमान आणि उच्च दाब देणारी यंत्रसामग्री वापरावी लागते. ही यंत्रे खूप महागडी असतात. अनेक वर्षांच्या संशोधनानंतर पॉलिस्टर बहुवारिकाच्या संरचनेत बदल करण्यात शास्त्रज्ञांना यश मिळाले आणि त्यातून जलद रंगाईक्षम पॉलिस्टर तंतूंची निर्मिती झाली. पॉलिस्टरचे जलद रंगाईक्षम असे आखूड आणि अखंड अशा दोन्ही स्वरूपातील तंतू आज भारतीय बाजारपेठेत उपलब्ध आहेत.
या तंतूंची रंगाई सोपी आणि स्वस्त असते. यासाठी उच्च तापमान आणि उच्च दाब देणाऱ्या यंत्रांची गरज नसते. याशिवाय हे रंग चांगल्यापकी पक्के असतात. या प्रकारच्या तंतूंचा उपयोग विणाई व गुंफाई या दोन्ही पद्धतीने बनविलेल्या कापडांमध्ये मोठय़ा प्रमाणावर केला जातो. रंगाईतील सहजपणा शिवाय इतर गुणधर्मामध्ये बदल करण्यासाठी इतर प्रकारचे पॉलिस्टर तंतू विकसित करण्यात आले.
अ) कापूससदृश पॉलिस्टर : हा तंतू कापसासारखा दिसतो. पॉलिस्टर हा मूलत: चमकदार तंतू आहे. या उलट कापूस हा चमकदार नसून काहीसा मंद असतो. पॉलिस्टरचा चमकदारपणा हा डोळे दिपविणारा असतो तर कापसाचा मंदपणा हा डोळ्यास सुखावणारा असतो. पॉलिस्टर तंतूंपासून बनविलेले कपडे सूती कपडय़ांच्यासारखे मंद दिसावेत म्हणून कॉटलूक पॉलिस्टर तंतू विकसित करण्यात आले. या प्रकारच्या पॉलिस्टर तंतूंमध्ये चमक मोठय़ा प्रमाणात कमी करण्यात आली. याच वेळी पॉलिस्टर तंतूंच्या ताकद, लंबन क्षमता, वापरण्यातील व धुलाईतील सुलभता या सकारात्मक गुणधर्मामध्ये फारसा फरक करण्यात आला नाही. त्यामुळे पॉलिस्टरचे गुणधर्म आणि कापसासारखे दिसणे, या दोहोंचा सुरेख संगम कॉटलूक तंतूंमध्ये पाहावयास मिळतो.
या तंतूंचा उपयोग शìटग, शूटिंग, साडय़ा, धोतर यांसारख्या अंगावर घालावयाच्या कपडय़ांसाठी तसेच अभ्रे, पडदे, पलंगपोस यांसारख्या गृहोपयोगी कापडांसाठी केला जातो.
– चं. द. काणे (इचलकरंजी)मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org
संस्थानांची बखर – गुलाबसिंगांनंतरचे काश्मीर
१८३९ साली रणजीत सिंहांच्या मृत्यूनंतर मोडकळीस आलेले लाहोर येथील शीख राज्य आणि ईस्ट इंडिया कंपनी यांच्या फौजांमध्ये १८४५-४६ साली झालेल्या युद्धात कंपनी सरकारचा विजय झाला. लाहोर आणि पश्चिम पंजाब, जम्मूचे डोगरांचे मांडलिक राज्य आणि लडाखपर्यंतचे काश्मीर खोरे या सर्व प्रदेशांवर कंपनी सरकारचा अंमल बसला. यापकी ब्रिटिशांशी निष्ठावंत असलेल्या गुलाबसिंगांच्या जम्मू राज्याला त्यांनी स्वतंत्र राज्याचा दर्जा दिला. युद्धखर्चामुळे आलेल्या आíथक अडचणींवर तोडगा म्हणून कंपनी सरकारने रावी आणि सिंधू नद्यांमधील काश्मीर खोरे राजा गुलाबसिंगांस ७५ लाख रुपयांस विकले आणि त्याला महाराजा हा किताब दिला. त्या वेळी जम्मू-काश्मीर राज्याचे क्षेत्रफळ २,१०,००० चौ. कि.मी. होते. कंपनी सरकारने याच वेळी जम्मू काश्मीर राज्यावर आपला निवासी निरीक्षक नियुक्त करून आपले नियंत्रण काही प्रमाणात राखून ठेवले. १८५२ साली गिलगिट आणि नागर येथे झालेल्या बंडामुळे हे दोन परगणे गुलाबसिंगांस गमवावे लागले. १८५७ साली महाराजा गुलाबसिंगांचा मृत्यू झाला आणि त्याचा मुलगा रणबीरसिंग गादीवर आला. रणबीरने आपले गेलेले परगणे गिलगिट आणि नागरवर परत आपला अंमल बसविला. रणबीरसिंग स्वत: पíशयन, इंग्लिश, स्वीडिश भाषातज्ज्ञ होता. रणबीरसिंगांच्या मृत्यूनंतर गादीवर आलेला त्याचा पुत्र प्रतापसिंग याची कारकीर्द १८८५ ते १९२५ अशी झाली. काश्मीर खोऱ्याला लागूनच अफगाणिस्तान, चीन, तिबेट या देशांच्या सीमा होत्या. काश्मीरच्या गिलगिटपासून थोडय़ाच अंतरावर सोविएत तुर्कमेनिस्तानच्या सीमा होत्या. अशा संवेदनाक्षम बनलेल्या काश्मीर सीमांबद्दल ब्रिटिश राजवट अधिक सावधगिरी बाळगू लागली. महाराजा प्रतापसिंगांचे सोविएत रशियाशी साटेलोटे असल्याचाही ब्रिटिशांना संशय होताच. त्यांनी विशेष प्रशासकीय समिती नेमून त्यात एक ब्रिटिश एजन्ट आणि प्रतापसिंगाचा भाऊ अमरसिंगास नेमले. ब्रिटिशांनी गिलगिटसाठी ‘गिलगिट स्काऊट्स’ ही सेनेची विशेष सुरक्षा तुकडी नियुक्त केली.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com