पॉलिस्टर तंतूच्या गुणधर्मातील कमतरता आणि पॉलिस्टर तंतूची विविध उपयोगामध्ये वापरले जाण्याची शक्यता लक्षात घेऊन या तंतूचे अनेक वेगवेगळे प्रकार विकसित केले गेले. पॉलिस्टर तंतूची रंगाई अतिशय कठीण व खर्चीक असते. यामुळे रंगाईची प्रक्रिया सोपी आणि कमी खर्चीक करण्यासाठी या तंतूचे विविध प्रकार बनविले जातात.
पॉलिस्टर तंतूच्या रंगाईतील अडचणींमुळे हा तंतू गडद रंगात आणि रेशमसारख्या आकर्षक रंगात रंगवणे अतिशय कठीण असते. पॉलिस्टर तंतूच्या या मर्यादा दूर करण्यासाठी शास्त्रज्ञ  दीर्घकाळ प्रयत्न करत होते. पॉलिस्टर बहुवारिकामध्ये रासायनिक क्रियाक्षम रेणूसमूह नसल्यामुळे इतर तंतूंना रंग देण्यासाठी जे रंग वापरले जातात त्यांचा उपयोग पॉलिस्टर तंतूंना रंग देण्यासाठी करता येत नाही. असे रंग वापरण्यासाठी पॉलिस्टर तंतूमधील बहुवारिकाच्या संरचनेतच बदल करावे लागतील असे शास्त्रज्ञांना दिसून आले. सामान्यपणे तंतूंच्या रंगाई प्रक्रियेत वापरण्यात येणाऱ्या रंगांचे ऋणायनी व धनायनी असे दोन प्रकार असतात. ऋणायनी रंग पॉलिस्टरच्या बाबतीत फारसे उपयोगी ठरणार नाहीत असे शास्त्रज्ञांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी धनायनी रंगांवर लक्ष केंद्रित केले. पॉलिस्टर बहुवारिक हे रासायनिकदृष्टय़ा अक्रियाशील असल्यामुळे रासायनिक क्रिया करून एखादा रासायनिकदृष्टय़ा क्रियाशील रेणूसमूह या बहुवारिकाला जोडणे अशक्य असते. यामुळे बहुवारिकीकरणाच्या द्रावणातच योग्य ते धनायनी क्षार मिसळून बहुवारिकामध्ये रासायनिक प्रक्रिया सुलभ स्थाने निर्माण करण्यात शास्त्रज्ञांनी यश मिळविले. अशा द्रावणापासून तयार केलेल्या पॉलिस्टर तंतूंना धनायनी रंगाईक्षम पॉलिस्टर असे नाव पडले.
या प्रकारचे पॉलिस्टर धनायनी रंग वापरून रंगवणे शक्य होते. यामध्ये बहुवारिक आणि रंजकद्रव्ये यामध्ये रासायनिक बंध निर्माण होतात. यामुळे हे रंग पक्के तर असतातच, पण गडद आणि आकर्षक रंग छटा देणे शक्य होते. या तंतूंची रंगाई प्रक्रिया तुलनेने सोपी आणि कमी खर्चीक असते. त्यामुळे या तंतूना सहज रंगाईक्षम तंतू असेही म्हणतात. या तंतूंची ताकद कमी असते, त्यामुळे यांत्रिक प्रक्रियेदरम्यान काही प्रमाणात काळजी घेणे आवश्यक असते. या प्रकारच्या तंतूंचा वापर साडय़ांसाठी सर्वात जास्त होतो. याशिवाय अंगावर घालावयाच्या सर्व प्रकारच्या वस्त्रांमध्ये या तंतूंचा उपयोग केला जातो.
चं. द. काणे  (इचलकरंजी) , मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

संस्थानांची बखर – जम्मू-काश्मीर राज्य स्थापना
जम्मू आणि काश्मीर हे इ.स. १८४६ ते १९४७ असे शतकभर ब्रिटिश साम्राज्यात एक महत्त्वाचे संस्थान होते. महाराजा रणजीत सिंहांनी काश्मीर घेण्यापूर्वी, पश्तून दुराणी साम्राज्यातील एक भाग म्हणून काश्मीर अनेक शतके अस्तित्वात होते.
शीख साम्राज्यात काश्मीर खोरे सामील झाल्यावर जम्मूचे डोगरा शासक रणजीत सिंहांचे खंडणीदार झाले. इ.स.१८२२ मध्ये जम्मूचे राजे किशोरसिंग यांच्या मृत्यूनंतर त्यांचा पुत्र गुलाबसिंग याला महाराजा रणजीत सिंहांनी जम्मूचा वारस म्हणून मान्यता दिली. किशोरसिंग यांच्या मृत्यूपूर्वी दहा वष्रे गुलाबसिंगाने रणजीत सिंहांच्या सन्यात नोकरी पत्करली.
शीख सन्यात असताना गुलाबसिंगने आपल्या युद्धकौशल्याने मुलतान आणि रियासीच्या मोहिमा फत्ते करून दाखविल्या. त्यामुळे खूश होऊन रणजीत सिंहांनी किशोरसिंगाच्या मृत्यूनंतर गुलाबसिंगास जम्मू राज्याचे वारस म्हणून मान्यता दिली.
 गुलाबसिंगाने राज्यविस्तार करताना प्रथम किश्तवाड हा परगाणा घेतला, त्यामुळे लडाखला जाणाऱ्या दोन्ही रस्त्यांचे नियंत्रण त्यांच्याकडे आले. त्यानंतर गुलाबसिंगचा झुंजार सेनानी जोरावरसिंग याने दोन मोहिमा काढून लडाखवर जम्मूच्या राजाचा अंमल बसविला. १८४५ साली शीख साम्राज्य आणि ब्रिटिशांमध्ये युद्ध सुरू झाले. त्यात गुलाबसिंगांनी सुरुवातीला भाग घेतला नाही; परंतु पुढे त्यांनी दोन्ही पक्षांत मध्यस्थ आणि सल्लागाराची भूमिका निभावल्यामुळे सर हेन्री लॉरेन्स या लॉर्ड हार्डिग्जच्या सल्लागाराचा गुलाबसिंगावर पूर्ण विश्वास बसला.
शिखांच्या पराजयानंतर अमृतसर येथे झालेल्या तहान्वये लाहोरचे शीख साम्राज्य कंपनी सरकारने आपल्या राज्यात सामील केले. अँग्लो शीख युद्धात झालेला प्रचंड खर्च भरून काढण्यासाठी हेन्री लॉरेन्सच्या सल्ल्याने कंपनी सरकारने मुस्लीम बहुसंख्य असलेले रावी आणि सिंधू नद्यांमधील काश्मीर खोरे जम्मूचा डोगरा राजा गुलाबसिंगास पंचाहत्तर  लाख रुपयांस विकले.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com

Story img Loader