पॉलिस्टर तंतूच्या गुणधर्मातील कमतरता आणि पॉलिस्टर तंतूची विविध उपयोगामध्ये वापरले जाण्याची शक्यता लक्षात घेऊन या तंतूचे अनेक वेगवेगळे प्रकार विकसित केले गेले. पॉलिस्टर तंतूची रंगाई अतिशय कठीण व खर्चीक असते. यामुळे रंगाईची प्रक्रिया सोपी आणि कमी खर्चीक करण्यासाठी या तंतूचे विविध प्रकार बनविले जातात.
पॉलिस्टर तंतूच्या रंगाईतील अडचणींमुळे हा तंतू गडद रंगात आणि रेशमसारख्या आकर्षक रंगात रंगवणे अतिशय कठीण असते. पॉलिस्टर तंतूच्या या मर्यादा दूर करण्यासाठी शास्त्रज्ञ दीर्घकाळ प्रयत्न करत होते. पॉलिस्टर बहुवारिकामध्ये रासायनिक क्रियाक्षम रेणूसमूह नसल्यामुळे इतर तंतूंना रंग देण्यासाठी जे रंग वापरले जातात त्यांचा उपयोग पॉलिस्टर तंतूंना रंग देण्यासाठी करता येत नाही. असे रंग वापरण्यासाठी पॉलिस्टर तंतूमधील बहुवारिकाच्या संरचनेतच बदल करावे लागतील असे शास्त्रज्ञांना दिसून आले. सामान्यपणे तंतूंच्या रंगाई प्रक्रियेत वापरण्यात येणाऱ्या रंगांचे ऋणायनी व धनायनी असे दोन प्रकार असतात. ऋणायनी रंग पॉलिस्टरच्या बाबतीत फारसे उपयोगी ठरणार नाहीत असे शास्त्रज्ञांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी धनायनी रंगांवर लक्ष केंद्रित केले. पॉलिस्टर बहुवारिक हे रासायनिकदृष्टय़ा अक्रियाशील असल्यामुळे रासायनिक क्रिया करून एखादा रासायनिकदृष्टय़ा क्रियाशील रेणूसमूह या बहुवारिकाला जोडणे अशक्य असते. यामुळे बहुवारिकीकरणाच्या द्रावणातच योग्य ते धनायनी क्षार मिसळून बहुवारिकामध्ये रासायनिक प्रक्रिया सुलभ स्थाने निर्माण करण्यात शास्त्रज्ञांनी यश मिळविले. अशा द्रावणापासून तयार केलेल्या पॉलिस्टर तंतूंना धनायनी रंगाईक्षम पॉलिस्टर असे नाव पडले.
या प्रकारचे पॉलिस्टर धनायनी रंग वापरून रंगवणे शक्य होते. यामध्ये बहुवारिक आणि रंजकद्रव्ये यामध्ये रासायनिक बंध निर्माण होतात. यामुळे हे रंग पक्के तर असतातच, पण गडद आणि आकर्षक रंग छटा देणे शक्य होते. या तंतूंची रंगाई प्रक्रिया तुलनेने सोपी आणि कमी खर्चीक असते. त्यामुळे या तंतूना सहज रंगाईक्षम तंतू असेही म्हणतात. या तंतूंची ताकद कमी असते, त्यामुळे यांत्रिक प्रक्रियेदरम्यान काही प्रमाणात काळजी घेणे आवश्यक असते. या प्रकारच्या तंतूंचा वापर साडय़ांसाठी सर्वात जास्त होतो. याशिवाय अंगावर घालावयाच्या सर्व प्रकारच्या वस्त्रांमध्ये या तंतूंचा उपयोग केला जातो.
चं. द. काणे (इचलकरंजी) , मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org
कुतूहल – पॉलिस्टर तंतूंचे रंग
पॉलिस्टर तंतूच्या गुणधर्मातील कमतरता आणि पॉलिस्टर तंतूची विविध उपयोगामध्ये वापरले जाण्याची शक्यता लक्षात घेऊन या तंतूचे अनेक वेगवेगळे प्रकार विकसित केले गेले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 07-05-2015 at 01:01 IST
मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Polyester tantum color