पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या प्रदक्षिणेला ३६५ दिवस ६ तास ९ मिनिटांचा अवधी लागतो. पृथ्वीवरून पाहताना, याच कालावधीत सूर्य हा ताऱ्यांच्या पाश्र्वभूमीवर पश्चिमेकडून पूर्वेकडे सरकत पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण करून त्याच नक्षत्रातील त्याच ताऱ्यांजवळ येऊन पोचलेला दिसतो. या कालावधीला नाक्षत्रवर्ष म्हटले जाते. सूर्य जेव्हा आपल्या भ्रमणादरम्यान दर सहा महिन्यांनी, वसंत संपात आणि शरद संपात या नावे ओळखल्या जाणाऱ्या काल्पनिक बिंदूंशी येतो, तेव्हा अनुक्रमे उन्हाळ्याला आणि हिवाळ्याला सुरुवात होते. ग्रीक खगोलतज्ज्ञ हिप्पार्कसच्या शोधानुसार हे संपात बिंदू हळूहळू पश्चिमेकडे सरकत आहेत. त्यामुळे नाक्षत्रवर्ष पूर्ण होण्याच्या कालावधीच्या सुमारे वीस मिनिटे अगोदरच सूर्य त्या त्या संपात बिंदूशी पोचतो आणि ऋतुबदलास सुरुवात होते. ऋतुचक्राच्या या, ३६५ दिवस ५ तास ४९ मिनिटांच्या कालावधीला सांपातिक वर्ष म्हणतात. ठरावीक दिवसांत ठरावीक ऋतू असण्यासाठी, व्यावहारिक वर्ष हे सांपातिक वर्षांशी निगडित ठेवले जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

रोमन कॅलेंडर हे पूर्वी चांद्रमासांवर आधारलेले असल्याने ते ३५४ दिवसांचे होते. त्यामुळे ऋतूंशी सांगड घालण्यासाठी अधूनमधून त्यात अतिरिक्त महिन्याचा समावेश करावा लागे. यात पद्धतशीरपणा आणण्यासाठी इ.स.पूर्व ४५मध्ये रोमन सम्राट ज्युलियस सीझर याने सॉसिजेनेस या खगोलतज्ज्ञाच्या सांगण्यावरून चारने भाग जाणाऱ्या वर्षांचा (म्हणजे दर चौथ्या वर्षांचा) कालावधी ३६६ दिवसांचा धरावा, असा नियम केला. या सरासरी ३६५ दिवस ६ तासांच्या वर्षांला ‘ज्युलियन वर्ष’ म्हटले जाऊ  लागले. मात्र सांपातिक वर्ष हे ज्युलियन वर्षांपेक्षा ११ मिनिटांनी लहान असल्याने ऋतुचक्राची सुरुवात ही, १३० वर्षांत एक दिवस लवकर होऊ  लागली. यामुळे होणारा फरक सोळाव्या शतकाच्या अखेरीस ११ दिवसांइतका मोठा होऊन ईस्टरचे गणित चुकू लागले.

हा फरक कमी करण्यासाठी, १५८२ साली रोमच्या पोप ग्रेगरीने अ‍ॅलॉयसियस लिलियस याच्या सल्लय़ानुसार चारशेने भाग जाणारी वर्षे ही ३६६ दिवसांची नव्हे तर ३६५ दिवसांचीच धरावी असा निर्णय घेतला. या निर्णयामुळे व्यावहारिक वर्षांचा कालावधी आणि सांपातिक वर्ष, यांतील फरक अध्र्या मिनिटाहून कमी म्हणजे सुमारे तीन हजार वर्षांत फक्त एक दिवस इतका कमी झाला. सांपातिक वर्षांला अगदी जवळ असणाऱ्या याच ‘ग्रेगोरियन कॅलेंडर’चा वापर आज जागतिक स्तरावर होतो आहे.

– डॉ. राजीव चिटणीस

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org