खडकांमधल्या खनिजांच्या कणांमध्ये ज्या मोकळ्या जागा असतात, त्यांच्यामुळे खडकांमध्ये सच्छिद्रता निर्माण होते. सच्छिद्रता हा खडकाचा मूलभूत गुणधर्म असून खडकांमध्ये भूजलाचे आणि पेट्रोलियमचे साठे निर्माण होण्यात या सच्छिद्रतेची महत्त्वाची भूमिका असते. खडकाच्या एकूण आकारमानाशी खडकातल्या सर्व पोकळ्यांचे एकत्रित आकारमान किती, या प्रमाणात खडकाची सच्छिद्रता ठरते. अग्निजन्य आणि रूपांतरित खडकांपेक्षा अवसादी खडकांत सच्छिद्रता थोडी अधिक असते. खडकाच्या प्रकारानुसार आणि खडक निर्माण होतानाच्या परिस्थितीनुसार ती बदलत असते. सच्छिद्रतेमुळेच खडकांमध्ये भूजल किंवा पेट्रोलियम साठू शकते. ज्या खडकात पाणी साठते, त्याला जलधारक खडक, तर ज्या खडकात पेट्रोलियम साठते त्याला पेट्रोलियमधारक खडक म्हणतात.
खडकांतील खनिजांच्या कणांचा आकार जितका मोठा, तितकी खनिजांच्या मधली पोकळ जागाही मोठी म्हणून त्या खडकाची सच्छिद्रता जास्त. बारीक वाळूने बनलेल्या अवसादी खडकाची सच्छिद्रता ही मध्यमकणी आणि भरडकणी वाळूने बनलेल्या खडकाच्या सच्छिद्रतेपेक्षा कमी असते. एखाद्या खडकाची पाणी साठवण्याची क्षमता किती, हेही त्या खडकातल्या सच्छिद्रतेमुळे समजते. खडकांची जलधारकता वाढण्याचा आणखीही एक मार्ग असतो. खडकांमध्ये उभ्या आणि क्षितिजसमांतर भेगा असतात. त्यांना भूवैज्ञानिक परिभाषेत ‘संधी’ (जॉइंट्स) म्हणतात. त्यांच्यामुळेही खडकाची सच्छिद्रता वाढते. भूगर्भातही पेट्रोलियमचे साठे प्रामुख्याने अवसादी खडकात आढळतात. नैसर्गिक घडणीमुळे त्यांच्यातली सच्छिद्रता जास्त असते. वालुकाश्माची (सॅण्डस्टोन) सच्छिद्रता १० ते ४० टक्के इतकी असते. सच्छिद्रतेचे मापन करताना ‘एकूण सच्छिद्रता’ आणि ‘प्रभावी सच्छिद्रता’ असे दोन प्रकारे करतात.
जर खडकात पाणी अथवा पेट्रोलियम साठायचे असेल तर सर्व पोकळ्या एकमेकांशी जोडलेल्या असायला हव्यात. पण खडकातल्या काही पोकळ्या अन्य कुठल्याही पोकळीशी जोडलेल्या नसतात. अशा पोकळ्यात पाणी किंवा पेट्रोलियम पोचूच शकत नाही. त्यामुळे एकूण सच्छिद्रता मोजताना त्यात खडकातल्या सर्व पोकळ्यांचा अंतर्भाव होतो. पोकळ्या एकमेकांशी जोडल्या गेलेल्या आहेत की नाहीत, याचा विचार केला जात नाही. मात्र प्रभावी सच्छिद्रता मोजताना ज्या पोकळ्या एकमेकांशी जोडल्या गेलेल्या आहेत अशाच पोकळ्यांचे मापन केले जाते. सच्छिद्रता ही खडकातल्या खनिजांच्या कणांच्या आकारमानावर आणि गोलाईवर अवलंबून असते. एकसारख्या आकारमानाचे कण एकत्र आलेले असतील, आणि झिजून गोलाकार झाले असतील तेवढी त्यांची सच्छिद्रता जास्त असते. याउलट जर आकाराने लहान मोठे कण, तेही जास्त खडबडीत असतील तितकी त्या खडकाची सच्छिद्रता कमी असते.
डॉ. योगिता पाटील
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org