समुद्र वैज्ञानिक होण्यासाठी केवळ समुद्राची आवड असणे, अपुरे आहे. त्यासाठी स्नातकोत्तर शिक्षण घेणे आवश्यक आहे. शास्त्र शाखेतून बारावी उत्तीर्ण झाल्यावर वनस्पती किंवा  प्राणीशास्त्र, तसेच लाइफ सायन्सच्या अभ्यासानंतर, एमएस्सीला मरिन सायन्स हा विषय घेता येतो. दोन वर्ष मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ फिशरीज एज्युकेशन यांसारख्या अभिमत विद्यापीठातून उत्तीर्ण झाल्यावर संशोधकाच्या भूमिकेतून प्रशिक्षण घेता येते. विद्यावाचस्पती पदवीसाठी भरीव संशोधन करावे लागते. या प्रवासात समुद्रविज्ञानाच्या ज्ञानाचा आवाका वाढत जातो. शासनाच्या काही संस्थांतून वैज्ञानिक म्हणून, विद्यापीठात प्राध्यापक पदावर, मत्स्यालयात अथवा एनजीओमध्ये कार्यरत होता येते. पाणबुडयाचे प्रशिक्षण घेतल्यास तलस्थ सजीवांचा उत्तम अभ्यास करता येतो. आंतरराष्ट्रीय शोध मोहिमेत काम करताना परदेशी भाषा येत असल्यास इतरांशी संपर्क साधणे सोपे होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> कुतूहल : समुद्रविज्ञान विषयातील करिअर संधी

सागरजलाच्या, वाळूच्या भौतिक व रासायनिक चाचण्या, समुद्रसान्निध्य पाहणी करणे, नमुने गोळा करणे आणि त्यांचे पृथक्करण  प्रयोगशाळेत करणे, मासे, प्लवक आदी जैवविविधतेचे निरीक्षण करणे, त्यासाठी शोध मोहिमांमध्ये भाग घेणे, अशा प्रकारचे काम समुद्र वैज्ञानिकांना करावे लागते.

अशा अभ्यासाच्या वेळी भरती-ओहोटीच्या वेळेनुसार किनाऱ्यावर किंवा ‘ऑनबोर्ड’ जावे लागते. खोल समुद्रात जाण्यासाठी आपले आरोग्य, मनोबल आणि विषयासाठी झोकून देऊन काम करण्याची क्षमता पाहिजे. अनेक दिवस भरसमुद्रात, बोटीवर राहावे लागते.  तणावग्रस्त परिस्थितीतदेखील सकारात्मक राहून कार्यरत असणे आवश्यक आहे. जलप्रवासाच्या वेळी बोट लागणे, अशा बाबींवर मात करावी लागते. यासाठी उत्तम मानसिक व शारीरिक पात्रता असली पाहिजे. बोटीवर संघ भावनेने कार्य करणे, प्रयोगशाळेत तासंतास प्रयोगांसाठी उभे राहाणे, विविध यंत्रे हाताळणे, विदा मिळाल्यावर त्याचे सांख्यिकी विश्लेषण करणे इत्यादी कामे अभिप्रेत आहेत.

भारतीय किनारे खूपच प्रदूषित असतात. मानवी विष्ठा तुडवत जावे लागते. निर्जन भागांत समाजकंटकांचा धोका असतो. अशाही परिसरांत नेटाने जाऊन शोधकार्य सुरू ठेवावे लागते. शोधाअंती निष्कर्ष कार्यालयात सादर केले जातात. दुर्गम परिसर, विषम हवामान, खडतर शोधकार्य यामुळे पूर्वी या क्षेत्रात स्त्रियांचे प्रमाण कमी होते. परंतु आता अनेक तरुण स्त्रिया सागर वैज्ञानिक होत आहेत. काही जण केवळ स्वत:च्या प्रगाढ समुद्रप्रेमामुळे ‘नॅचरलिस्ट’ म्हणून नावलौकिक मिळवतात.

– डॉ. श्वेता चिटणीस

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org संकेतस्थळ :

www.mavipa.org