प्राचीन काळापासून आशिया खंडामध्ये परसबागेतील कुक्कुटपालन हा व्यवसाय चालत आलेला आहे. अनुकूलतेनुसार या व्यवसायात बदल होत गेले. सध्या या व्यवसायात विविध प्रकारच्या कोंबडय़ांच्या जाती व वाण वापरले जातात. परसातील कुक्कुटपालन हा व्यवसाय लहान शेतकरी, अल्पभूधारक व सामान्य लोकांसाठी उपयुक्त असा व्यवसाय आहे. सध्या ग्रामीण भागामध्ये आहारातील प्रथिनांची कमतरता आहे. ती भरून काढण्यासाठी कोंबडय़ांच्या अंडय़ांचा व मांसाचा वापर उपयुक्त ठरतो.
परसातील कुक्कुटपालन व्यवसायासाठी कोंबडय़ांच्या कोणत्या जाती व वाण वापरावा, हा शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न असतो. परसातील कुक्कुटपालनासाठी कोंबडय़ांचा वाण निवडताना त्या कोंबडय़ा स्थानिक वातावरणामध्ये एकरूप होणे गरजेचे असते, जेणे करून त्यांची नसíगक उत्पादन क्षमता टिकून राहील.
भारतीय वातावरणाचा विचार करता, केंद्रीय संशोधन विभागाने विविध प्रकारच्या कोंबडय़ांच्या जाती विकसित केल्या आहेत. या कोंबडय़ा प्रतिकूल वातावरणात साध्या घरटय़ात व सहज उपलब्ध अशा खाद्यामध्ये चांगल्या प्रकारे वाढतात. या कोंबडय़ांमध्ये दोन परस्पर अंडी उत्पादन साखळीतील अंतर कमी असते. या कोंबडय़ांच्या मांस आणि अंडय़ाची चव, गंध, अन्नद्रव्य घटक देशी कोंबडय़ांसारखेच असतात. यांच्या मांसामध्ये स्निग्ध पदार्थाचे प्रमाण कमी असते. रोग प्रतिकारक क्षमता जास्त असल्याने या कोंबडय़ा विविध रोगांना बळी पडत नाहीत.
ऊर्जा आणि प्रथिनांच्या तुलनेत खाद्य रूपांतराचे प्रमाण त्यांच्यात चांगले असते. तांदळाचा चुरा, तांदळाचे तुकडे असे सहज उपलब्ध असलेले खाद्य घटक यांच्या खाद्यामध्ये वापरले जाऊ शकतात. आठ आठवडय़ांमध्ये पक्ष्याचे वजन १२५० ग्रॅम असते, तर खाद्याचे मांसात रूपांतर करण्याचे प्रमाण २.२ असते. या पक्ष्याचे अंडे (५५-६३ ग्रॅम) देशी कोंबडय़ांच्या अंडय़ापेक्षा जास्त वजनाचे असते. या कोंबडय़ा परसातील कुक्कुटपालनासाठी उपयुक्त असून, देशी कोंबडय़ांसोबत त्यांचे संकरण करणे सहज शक्य होते.
जे देखे रवी..- पाणी आणि कप-बशा
त्या काळात टिळक रुग्णालयाच्या आवाराची जमीन चांदण्या जशा चमकतात तशी पांढऱ्या प्लास्टिकच्या कपांच्या गालिचाने मढलेली असे. याचे कारण आवारात चहाचे दुकान होते आणि हे प्लास्टिकचे रिकामे कप भले मोठे डॉक्टरही इतस्तत: फेकत असत. मी कँटीन आणि चहाच्या दुकानात गेलो आणि त्यांना म्हणालो ‘मी तुम्हाला एक हजार चिनी मातीचे कप देतो. ते वापरा. चहा द्या, दोन रुपये डिपॉझिट घ्या. परत दिले की पैसे परत घ्या.’
ते म्हणाले, ‘आमच्याकडे हिशेब ठेवायला माणूस नाही.’ मी म्हणालो ‘मी माणूस देतो.’ ते म्हणाले, ‘विचार करू.’
थोडय़ा दिवसांनी विचारले तर म्हणाले हे ‘कप विसळणार कोण?’ मी म्हणालो, ‘माणूस देतो.’ मग म्हणाले, ‘विचार करतो.’ नंतर म्हणाले, ‘इथे नळ नाही.’ तर म्हणालो, ‘पाण्याचे पिंप देतो.’ तेव्हा म्हणाले, ‘विचार करतो.’
मग एक दिवस मला शासनाचे बोलावणे आले. तेव्हा तिथे एक पांढऱ्याशुभ्र कडक इस्त्रीचे कपडे घातलेले धेंड म्हणजे व्यक्तिमत्त्व बसले होते. मला म्हणाले, ‘कप-बशीवाले तुम्हीच का?’ मी म्हणालो, ‘हो.’ तेव्हा ते म्हणाले, ‘तुम्ही हे समाजकार्य थांबवा. त्याऐवजी तुम्ही रुग्णांना जेवण द्या.’ ‘मी म्हटले, अहो पण जेवण तर त्यांना मिळतेच,’ तेव्हा ते व्यक्तिमत्त्व म्हणाले, ‘मग फळवाटप करीत जा.’
तेवढय़ात शासनाच्या वतीने एक कायदेशीर फुसकुली सोडण्यात आली. ‘अहो डॉक्टर, बंदी प्लास्टिक पेल्यांवर आहे. स्टायरोफोमवर नाही.’ मी म्हणालो, ‘तेही खरेच.’ पाण्याचे तेच झाले. संडास आणि मुताऱ्यांमध्ये पैसे खर्च करून शुद्ध केलेले महानगरपालिकेचे पाणी वाया जाऊ नये, म्हणून मी चार-पाच लाखांची देणगी आणली. विहीर खणली, त्याला पाणी लागले. त्यातून नळाने हे पाणी अनेक मुताऱ्यांमध्ये संततधार पडावी त्याप्रमाणे व्यवस्था केली. हा कार्यक्रम चालू असताना प्रशासनाचा अभियांत्रिकी विभाग एकाच वेळी गुदमरतही होता आणि जळफळतही होता. या सगळ्यांच्या नातेवाईकांच्या शस्त्रक्रिया मी केल्या होत्या, मग मला बोलणार तरी कसे? कार्यक्रम सुरू झाला आणि विहिरीच्या पंपाचे फ्यूज उडू लागले. नळ चोरीला गेले. विहिरीचा कॉन्ट्रॅक्टर एकदा म्हणाला, ‘एका कर्मचाऱ्याने त्याच्याकडे पाच तोळे सोने मागितले’ चार-पाच महिन्यांतच त्या कार्यक्रमाचा फज्जा उडाला आणि सर्व पूर्ववत झाले.
तेव्हा एक सुरक्षारक्षक मला म्हणाला, ‘साहेब या (!) लोकांची लायकी नाही.’
मी म्हणालो, ‘तेही खरेच.’
आणि त्याला मी विचारले, ‘हे लोक म्हणजे कोण? आणि काय रे, तुझ्या पुढय़ातून नळ कसे चोरीला गेले?’
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com
वॉर अँड पीस -शिबे: निरुपद्रवी त्वचाविकार
एखाद्या अवयवाच्या बाह्य़ भागात जे आपणास दिसते, घाबरवते तो खरा विकार नसतो. आपल्या शरीरातील कफ व पित्त या दोन प्रमुख दोषांच्या अनुक्रमे स्निग्ध, चिकट, घन, तीक्ष्ण, दरुगधी, प्रसरणशील, द्रव गुणांच्यात विकृती झाली की त्वचाविकार उद्भवतात. इसब, गजकर्ण, नायटा, केसातील कोंडा, तीळ, मस, चामखीळ, लांछन, खवडे असे छोटे-छोटे क्षुद्र त्वचाविकार म्हणून गणले जातात. यांचा शरीराला फार त्रास न होता, रुग्ण मंडळी उगाचच मनाला त्रास करून घेतात.
शिबे किंवा सिध्म हा असाच एक निरूपद्रवी क्षुलल्क विकार आहे; हे पालकांनी जाणून असावे. शिबे म्हणजे कोडाचे डाग नव्हे ते निश्चयाने थोडय़ाच काळात बरे होतात; हा दिलासा मुला-मुलींना पालकांनी द्यावयाच हवा. सिध्मकुष्ठ हे कफवातप्रधान असून ते बाहेरून रुक्ष व आतून स्निग्ध असते. त्याचा स्पर्श स्निग्ध श्लक्ष्ण असतो. काही वेळा याचा स्पर्श खरखरीतही असतो. कडा दंतुर असतात. झाडले असता त्याचा कोंडा निघतो. वर्ण तांबूस पांढरा असतो. या कुष्ठामध्ये वेदना, कंडू, दाह, पूय लसिका ही लक्षणे कमी असतात. हे कुष्ठ फारसे फुटत नाही व त्यात फारसे कृमी पडत नाहीत. या कुष्ठाचे स्वरूप दुध्याभोपळ्याच्या फुलाप्रमाणे असते. हे कुष्ठ लवकर वाढते व विशेष करून शरीराच्या वरच्या भागात उमटते.
शिबे जास्त करून छातीवर, खांद्यावर व मानेवर असते. त्याकरिता बाह्य़ोपचार म्हणून दशांगलेप, चंदनखोडगंध, उपळसरी मुळीचा लेप असे सोपे उपाय करून पाहावे. हे गंध किंवा लेप पातळ स्वरूपात पुन:पुन्हा आपल्या सोयीनुसार लावावे. सकाळी उपळसरी व रात्रौ त्रिफळाचूर्ण घ्यावे. एवढय़ाने बरे न वाटल्यास चंद्रप्रभा, प्रवाळ, कामदुधा अशी औषधे घ्यावी. केसात कोंडा असल्यास बावची, आवळकाठी, नागरमोथायुक्त केश्यचूर्णाने आठवडय़ातून दोन वेळा केस धुवावे. कोडविकाराप्रमाणेच पथ्यपाणी- आंबट, खारट, शिळे अन्न, केळी, काजू हे पदार्थ टाळावे. चिंता सोडावी.- वैद्य प. य. वैद्य खडीवाले
आजचे महाराष्ट्रसारस्वत – ४ सप्टेंबर
१८३७ > व्याकरणकार व कवी रेव्हरंड गणपत रघुनाथ नवलकर यांचा जन्म. ‘नवीन मराठी व्याकरण’ व ‘नवीन मराठी बालव्याकरण’ तसेच ‘वाक्यवियोग आणि वाक्यसंयोग शास्त्र’ ही पुस्तके लिहिली. संत तुकारामांच्या जीवनकार्याचा वेध घेणाऱ्या नवलकरांनी ‘श्रीख्रिस्तविजय’ ही पोथीवजा दीर्घ पद्यरचना केली होती.
१९०४ > ‘प्राचीन महाराष्ट्राचा धार्मिक इतिहास’ तसेच ‘आद्य महाराष्ट्र आणि सातवाहनकाळ’ हे महत्त्वाचे इतिहासग्रंथ लिहिणारे रघुनाथ महारुद्र भुसारी यांचा जन्म. निजामी अमलाखाली वाढलेले प्रा. भुसारी हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठात मराठीचे अध्यापन करीत. ‘साहित्य आणि संशोधन’ हा ग्रंथ लिहिला, तसेच दुर्मीळ ग्रंथांच्या प्रतींचे संपादन केले होते.
१९३२ > ‘गाथा मुहूर्तमेढीची’, ‘गाथा शोधांची’, ‘अनोखा उंबरठा’, ‘संधिप्रकाश’, ‘संस्कार’ या विज्ञानविषयक लेखसंग्रहांचे लेखक, शिक्षणतज्ज्ञ विनायक गोपाळ कुलकर्णी यांचा जन्म. ‘लोकसत्ता’त अनेक सदरे त्यांनी लिहिली होती.
१९३७ > लेखक, पत्रकार, समीक्षक शंकर रामलाल सारडा यांचा जन्म. ‘काही पुस्तके काही लेखक’, ‘गुलमोहर’, ‘ग्रंथचैतन्य’, ‘स्त्रीवादी कादंबऱ्या’ ही त्यांची काही पुस्तके .
– संजय वझरेकर