भारतीय संस्कृतीमधील विविध सण आणि उत्सव हे निसर्गाबरोबरच कृषी संवर्धनाशी जोडलेले आहेत. विशेष म्हणजे यामागे निसर्ग आणि विज्ञान यांचा मिलाफ असतो.
निसर्गाबद्दल वाटणाऱ्या कृतज्ञतेपोटी नवान्न पौर्णिमा साजरी करण्याची प्रथा आहे. या दिवशी घराघरांत नवीन धान्य आलेले असते. त्यात भात, नाचणी, वरीसारख्या धान्यांचा समावेश असतो. आहारात आणण्यापूर्वी त्यांची एकत्रितपणे केली जाणारी पूजा म्हणजेच नवान्न पौर्णिमा.
यास शरद पौर्णिमा, कोजागरी पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी घराच्या मुख्य दरवाजावर आपल्या शेतात पिकलेल्या विविध धान्यांच्या लोंब्या, कणसे, गोंडे यांचे तोरण शेतकरी लावतात. यामागचा वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे या सर्व धान्यांचे बियाणे आमच्याकडे उपलब्ध आहे.
देवाणघेवाण पद्धतीमधून पूर्वी या बियाणांचे आदानप्रदान होऊन त्यांचे संरक्षण आणि संवर्धन होत असे. दसरा हा सण जरी विजयादशमी म्हणून ओळखला जात असला तरी, तो ‘बीजोत्सव’ आहे.
नवरात्रीच्या घटस्थापनेत मोठय़ा पानाचा चौकोनी द्रोण तयार करून त्यामध्ये शेतामधील चार कोपऱ्यांची मूठभर माती गोळा करून भरली जाते. द्रोणाच्या चार बाजू म्हणजे शेताचे बांध. द्रोणात मध्यभागी पाणी असलेला घट असतो. घरामधील स्त्री मागील हंगामामधील मडक्यात साठवलेले विविध बियाणे या द्रोणाच्या मातीत टाकते. घटाच्या सूक्ष्म छिद्रांमधून पाणी झिरपून त्या सर्व बियाणांची उगवण क्षमता दसऱ्याच्या दिवशी तपासली जाते आणि उत्कृष्ट तेच बियाणे शेतात पेरले जाते. पारंपरिक बियाणांची उगवण शक्ती आणि घटामधील पाणी त्या बियाणांची पाण्याची गरज दर्शविते, हेच ते विज्ञान.
संक्रांतीच्या सणाला प्रत्येक स्त्री पाच महिलांना पाच लहान मातीच्या सुगडांमध्ये पाच बियाणांचे एकत्रित वाण देत असे. या पद्धतीने प्रत्येक स्त्रीला २५ प्रकारची बियाणी मिळत. हे बियाणे संवर्धन आणि संरक्षणाचे विज्ञानच होते.
नंदुरबार जिल्ह्यात आजही अस्तंब्याच्या डोंगरावर दिवाळीच्या काळात लाखो स्थानिक आदिवासी तेथील देवांच्या दर्शनास घरच्या पारंपरिक बियाणांचा नैवेद्य दाखवितात आणि प्रसाद म्हणून तेथे ठेवलेल्या बियाणांची शेतात पेरणी करतात. याच भागात देवमोगरा या देवाची पूजा होते, त्या वेळी आदिवासी देवमोगरा जातीच्या ज्वारीची कणसे देवीला अर्पण करतात आणि तेथील पुजारी त्याचे प्रसाद म्हणून वाटप करतात. पारंपरिक पौष्टिक वाणाचा हा विज्ञान प्रसारच आहे. सर अल्बर्ट हॉवर्ड हे ब्रिटनमधील शेती संशोधक प्रत्येक भारतीय शेतकऱ्यास शास्त्रज्ञ म्हणतात, ते याचमुळे.
– नागेश टेकाळे
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : www.mavipa.org