१८४१ साली कार्ल मोझेण्डेर या शास्त्रज्ञाने नवीन मूलद्रव्य सापडल्याचा संशय व्यक्त केला आणि त्याला नाव दिलं ‘डीडायमिअम’! १८६९ साली तर या मूलद्रव्याला  ऊ्र असं चिन्ह देत, मेन्डेलीव्हच्या आवर्तसारणीच्या पहिल्या आवृत्तीत चक्क स्थानही दिलं गेलं. या मूलद्रव्याच्या अस्तित्वाबद्दल संशय होता, खात्री नव्हती; त्यामुळे अनेक वैज्ञानिक त्यावर प्रयोग करून बघत होते. १८७९ साली फ्रेंच रसायनतज्ज्ञ लेकॉक याने ‘डीडायमिअम’पासून ‘सॅमॅरिअम’ हे लॅन्थॅनाइड गटातलं एक मूलद्रव्य वेगळं केलं आणि त्याचं मूलद्रव्य म्हणून अस्तित्वही सिद्ध केलं आणि त्याचबरोबर ‘डीडायमिअम’ हे मूलद्रव्य नसून एक पदार्थ आहे; जो कदाचित दोन किंवा दोनपेक्षा जास्त मूलद्रव्यांचं मिश्रण आहे, हेही वैज्ञानिकांच्या लक्षात आलं.

१८८२ साली, ब्रॉनर या वैज्ञानिकाने, प्राग इथे, अणुभारांविषयी काम करून एक पेपर प्रसिद्ध केला. त्यानुसार ‘डीडायमिअम’ हे काही मूलद्रव्यांचं मिश्रण असल्याचं सिद्ध झालं आणि मग ‘ब्रॉनर’, ही मूलद्रव्यं एकमेकांपासून विलग करण्याच्या कामाला लागला; पण त्यात त्याला यश मिळालं नाही.

अखेरीस १८८५ साली कार्ल वेल्सबॅक या वैज्ञानिकाने, ‘डीडायमिअम’ हे दोन पूर्णपणे नवीनच मूलद्रव्यांचं मिश्रण आहे, असं मत मांडत त्यांना प्रेसोडायमिअम आणि निओडायमिअम अशी नावं बहाल केली. ‘डीडायमिअम’ या पदार्थावर काही रासायनिक अभिक्रिया करून वेल्सबॅक याने, त्याचे नायट्रेट क्षारात रूपांतर केलं. मग वेल्सबॅक याने त्या क्षारांना नायट्रिक आम्लामधून भागश: स्फटिकीभवन करून एकमेकांपासून वेगळं करण्यात यश मिळवलं. तेव्हा त्याला हिरवटसर रंगाचे प्रेसोडायमिअमच्या क्षारांचे स्फटिक मिळाले आणि त्यानंतर गुलाबी रंगाचे निओडायमिअमच्या क्षारांचे स्फटिक आढळले.

खरंतर ‘प्रेसोडायमिअम’चं नावच मुळी त्याच्या हिरव्या रंगाच्या क्षारामुळे आणि त्याच्या सतत ‘निओडायमिअम’च्या सान्निध्यात असण्यामुळे पडलं आहे. ‘प्रॅसिओ’ आणि ‘डीडायमॉस’ या दोन ग्रीक शब्दांचे अर्थ ‘हिरवट’ आणि ‘जुळं’ असे आहेत.

१८८५ साली कार्ल वेल्सबॅकने, प्रेसोडायमिअम आणि निओडायमिअम या दोन जुळ्यांना भागश: स्फटिकीभवन करून वेगळं केलं खरं, पण ते काम अत्यंत जिकिरीचं आणि वेळखाऊ होतं. या स्फटिकीभवन प्रक्रियेत जवळजवळ १०० टप्पे होते आणि प्रत्येक टप्प्याला ४८ तास लागले.

डॉ. मानसी राजाध्यक्ष

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org