‘निओडायमिअम’..हे लॅन्थॅनाइड गटातलं ‘प्रेसोडायमिअम’च्या नंतरचं, पण जणू काही प्रेसोडायमिअमचं जुळं भावंडंच असलेलं मूलद्रव्य! ग्रीक भाषेत निऑस म्हणजे नवीन आणि डीडायमॉस म्हणजे जुळं! कार्ल वेल्सबॅक या शास्त्रज्ञाने १८८५ साली, डीडायमिअम या मिश्रणातून अगदी एकसारखे गुणधर्म असणारी, दोन जुळी म्हणावीत अशी मूलद्रव्यं, एकमेकांपासून वेगळी केली होती; त्यातलं हे ‘प्रेसोडायमिअम’च्या पाठोपाठ येणारं ‘धाकटं’ जुळं!

अणुक्रमांक ६० असलेल्या ‘निओडायमिअम’चा अणुभार साधारणपणे १४४.२४  एएमयू (म्हणजे अ‍ॅटॉमिक मास युनिट) एवढा असतो. लॅन्थॅनाइड गटातल्या पट्कन अभिक्रिया करणाऱ्या काही मूलद्रव्यांपैकी हे एक! हवेतल्या ऑक्सिजनशी संपर्क येताच लगेच ऑक्सिडाइज (ऑक्साइड तयार करणाऱ्या) होणाऱ्या मूलद्रव्याला, याच कारणास्तव तेलामध्ये किंवा सीलबंद घट्ट प्लास्टिकच्या डब्यात घालून ठेवावं लागतं.

‘निओडायमिअम’ची दोन अपरूपं, सात स्थिर नैसर्गिक समस्थानिकं आणि चौदा किरणोत्सारी समस्थानिकं आढळतात. ‘निओडायमिअम’ धातू हा शुद्ध स्वरूपात असताना चंदेरी राखाडी रंगाचा असला तरी त्याचे क्षार किंवा त्याची विविध संयुगं मात्र खूप सुंदर रंगाची असतात. उदाहरणार्थ ‘निओडायमिअम’, सर्व हॅलोजनशी लगेच अभिक्रिया करतं आणि वेगवेगळ्या रंगांचे क्षार तयार करतं. त्यापैकी निओडायमिअम फ्ल्युओराइड आणि क्लोराइड छान लव्हेंडर रंगाची, निओडायमिअम ब्रोमाइड अगदी फिक्कट सुरेख गुलाबी-जांभळ्या रंगाचं तर निओडायमिअम आयोडाइड हिरव्या रंगाचं असतं. याच गुणधर्मामुळे, बऱ्याच प्रकारच्या काचांना रंग देण्यासाठी निओडायमिअमच्या क्षारांचा उपयोग होतो. अगदी फिक्या जांभळ्या रंगापासून ते गडद लाल रंग ते छान, देखण्या राखाडी रंगापर्यंत सर्व रंगांच्या काचा तयार करण्यासाठी निओडायमिअम अगदी आवर्जून वापरलं जातं. अशा काचांचा उपयोग खगोलशास्त्रीय उपकरणांपासून ते वेल्डिंग करताना वापरल्या जाणाऱ्या सुरक्षाकाचेपर्यंत अनेक गोष्टींमध्ये केला जातो. याशिवाय टेलिव्हिजन, फ्लूरोसंट दिवे, ऊर्जा बचत करणारे दिवे अशा अनेक वस्तूंमध्येही निओडायमिअम महत्त्वाचं ठरतं.

ब्राझील, चायना, अमेरिका, भारत आणि श्रीलंका या देशांमध्ये मोठय़ा प्रमाणात साठे असलेल्या निओडायमिअमचा एक अत्यंत महत्त्वाचा उपयोग ‘चुंबक’ क्षेत्रात आहे.

डॉ. मानसी राजाध्यक्ष

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org