मुला-मुलींचं सुरुवातीच्या काळातलं शिक्षण ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. प्रत्येक मुलाला/मुलीला बालवाडी शिक्षण मिळायला हवं. मोकळी जागा, प्रेमळ, प्रशिक्षित मार्गदर्शक, भरपूर खेळ, खेळायला मित्रमैत्रिणी, सुरक्षिततेची उबदार जाणीव एवढय़ा गोष्टी असल्या, की मुलं आनंदी होतात. आनंदी वातावरणात बुद्धिमत्तेला पोषक असे अनुभव त्यांना मिळायला हवेत.
मुलांना लहानपणापासून- म्हणजे बालवाडीपासून चांगलं शिक्षण मिळणं गरजेचं का आहे, हे सांगणारी ही गोष्ट.. शंभर वर्षांपूर्वी एका माणसानं ऑस्ट्रियन सम्राज्ञी एलिझाबेथ हिचा खून केला. या घटनेशी संबंधित चर्चा चालू होती. त्या वेळी व्यवसायानं डॉक्टर असलेल्या मारिया मॉण्टेसरी सहकाऱ्यांना उद्देशून म्हणाल्या की, ‘‘हा खून खरं म्हणजे तुम्हीच केला.’’ या वाक्याचा अर्थ कुणालाच कळेना. तेव्हा त्या म्हणाल्या की, ‘‘समाजातल्या सुशिक्षित वर्गाचं लहान मुलांकडे दुर्लक्ष झालं आहे, त्यांच्या शिक्षणाकडे, मानसिकतेकडे कोणी गांभीर्यानं बघत नाही. त्यामुळे ज्या वयात त्यांना योग्य संस्कार मिळायला हवेत, ते मिळाले नाहीत. यातूनच ही मुलं मोठी होऊन गुन्हेगारी मार्गाला लागली. त्यांच्यातल्याच एकानं हा खून केला. त्यामुळे ही जबाबदारी समाजातल्या सुशिक्षित वर्गावरच येऊन पडते.’’
डॉ. मॉण्टेसरी यांना आज आपण शिक्षणतज्ज्ञ म्हणून ओळखतो. पण त्या डॉक्टर होत्या; या घटनेनंतर त्यांनी आपलं लक्ष लहान मुलांच्या शिक्षणाकडे वळवलं.
एका वस्तीत त्यांनी बालवाडी सुरू केली, तीच जगातली पहिली बालवाडी! मुलांवर संपूर्णपणे विश्वास ठेवणं हेच या बालवाडीचं वैशिष्टय़. ‘बालवाडीशास्त्र’ इथून सुरू झालं असं म्हणायला हरकत नाही. मूल मोठं होत जातं, तसतसं त्याच्याकडे, त्याच्या बोलण्याकडे, त्याच्या मतांकडे, त्याच्या मागण्यांकडे, प्रगतीकडे लक्ष पुरवलं जातं. लहान मुलाला काही विशेष म्हणणं नसतं, मतं नसतात असा एक समज आहे. सतत कसला तरी हट्ट करणं हा त्यांचा छंद आहे असं वाटतं. मात्र, या वयातल्या मुलांचे विचार ऐकण्यासारखे असतात, त्यांच्या कल्पना काही वेगळ्याच असतात. त्या ऐकून घेतल्या पाहिजेत.
आपली लहानगी मुलं ज्या बालवाडय़ांमध्ये जातात, तिथं असं वातावरण मिळतं का, इकडे लक्ष द्या. ते मिळायला हवं.
contact@shrutipanse.com