वयाच्या या अवस्थेला ‘वादळी भावभावनांचा काळ’ असं म्हणतात. या काळात मेंदूत काही विशेष प्रकारचे बदल होत असतात. हा काळ साधारणत: १३ ते १९ असा मानला जायचा. पण तो आता नऊ ते १९ असा मानला जातो. पौगंडावस्थेचं वय खाली येतं आहे. नऊ ते १२ या वयाला आपण पूर्व-पौगंडावस्था किंवा प्री- टीन काळ म्हणू शकतो.
मुलांच्या मेंदूतला प्री फ्रंटल कॉर्टेक्स हा भाग वयाच्या या टप्प्यावर येईपर्यंत काही प्रमाणात अविकसित होता. त्याला आत्ता वयात येण्याच्या काळात, चालना मिळाली आहे. तो विकसित होण्याची प्रक्रिया चालू झाली आहे. हा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स मेंदूत समोरच्या म्हणजे कपाळाकडच्या भागात असतो.
या कॉर्टेक्समध्ये विविध केंद्रं आहेत. त्या केंद्रांतून विविध पद्धतीची कामं चालतात. योग्य त्या संतुलित शारीरिक हालचाली करण्याच्या आज्ञा मेंदूच्या याच भागातून सुटतात. स्मृतींचं केंद्रदेखील या भागात आहे. तसंच भावभावनांचा उगमही इथेच होतो. भाषाविषयक प्रमुख केंद्रं या भागात असल्यामुळे संवाद साधण्याचं कामही याचंच. एखाद्या विषयाचं विश्लेषण करण्याचं काम इथे चालतं. अशी विविध कामं या भागात तयार झालेल्या न्यूरॉन्सच्या जाळ्यांमार्फत चालतात. अशा पद्धतीने हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे.
‘एखाद्या विषयाची सखोल आखणी, मांडणी करणं हे प्री फ्रंटल कॉर्टेक्सचं काम असतं.’ प्री फ्रंटल कॉर्टेक्स विकसित झाल्यानंतर एखाद्या विषयाची सखोल मांडणी करता येतं. लहान किंवा या आधीच्या वयातल्या मुलांना हे फारसं जमत नाही. ती काहीशी कमी पडतात. कारण हा भाग अजून विकसित व्हायचा असतो. मुलं या वयात पल्लेदार भाषणं करतात, पण ती मुख्यत: पाठ केलेली किंवा पालक-शिक्षकांची मदत घेऊन तयार केलेली असतात. मात्र टीन एजमध्ये हे काम हळूहळू मुलांना स्वत: जमू शकतं.
आपण मोठे झालो आहोत, असं मुलांना वाटत असतं. आपल्याला लोकांनी जबाबदार व्यक्ती म्हणून बघावं अशीही त्यांची मागणी असते. पण ही मागणी घरातून पूर्ण होऊ शकत नाही. कारण त्यांना अजूनही बालिश समजलं जातं. यातून घराघरांमध्ये आई-मुलांमध्ये भांडणं सुरू होतात. यावर उपाय म्हणजे त्यांच्यावर विविध प्रकारची जबाबदारी सोपवणं हे आहे. यातून प्री फ्रंटल कॉर्टेक्सला उद्दीपन मिळेल.
– डॉ. श्रुती पानसे
contact@shrutipanse.com