वननिर्मितीबरोबरच भूगर्भामधील जलसाठय़ास जतन करण्याचे मौल्यवान कार्य माती करत असते. भूगर्भातील मोठे खडक, पाषाणापासून दगड, धोंडे, गोटे, वाळू, रेती या टप्प्यांमधून पाऊस, वारा, सूर्यप्रकाश, कडाक्याची थंडी या अजैविक घटकांच्या परिणामामुळे होणाऱ्या विदरण क्रियेमधून मातीनिर्मिती होते. ही हजारो वर्षांची नैसर्गिक प्रक्रिया आहे. आपण मूठभर माती हातात घेतो तेव्हा त्या मुठीमध्ये शेकडो वर्षे बंद झालेली असतात, या मातीने कितीतरी वादळे, कडक उन्हाळे, मुसळधार पाऊस, गोठवणारी थंडी, पाहिलेली असते तेव्हाच तर तिला हे मूर्त स्वरूप प्राप्त झालेले असते.
मातीत असणाऱ्या मूलद्रव्यांनुसार, खनिजांनुसार मातीचा रंग असतो.
जेव्हा मातीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढू लागतो तेव्हा तिला काळसर रंग येऊ लागतो. अर्थात हा रंग सेंद्रिय कर्ब, वनस्पतींचे अवशेष, मृत प्राणी, कीटक त्याचप्रमाणे जिवाणूंमुळे येतो. अशी काळी माती नेहमीच जास्त धान्य उत्पादन देते.
ज्या मातीत लोहाचे प्रमाण जास्त असते त्या मातीचा रंग लालसर तांबूस असतो. ही मातीसुद्धा शेतीला चांगली असते.
माती ही कोणत्याही प्रकारची असली तरी ती ‘अॅग्रिगेट’ (aggregate) म्हणजे अनेक लहान कण एका मोठय़ा कणाभोवती वर्तुळाकार रचनेने बंदिस्त होऊन लहान-मोठय़ा समूहाने तयार झालेली असते. मातीचे हे वर्तुळाकार गणित आपणास सूक्ष्मदर्शकाखालीच दिसू शकते. सर्वात मोठा मातीचा कण मध्यभागी आणि त्याभोवती अनेक छोटे कण घट्ट चिकटलेले असतात. या कणांमध्ये असलेल्या जागेत पाणी असते तसेच सर्व कणांच्या भोवती विविध उपयोगी जिवाणूंचे आवरण असते.
वनस्पतीची श्वेतमुळे याच कणांच्या समूहामधील मूलद्रव्यांनी समृद्ध असलेले पाणी शोषून घेतात, यासाठी मातीची आद्र्रता ३५ ते ४० टक्के असावी लागते. पाणी जास्त अथवा कमी झाले की कणांचा समूह फुटतो आणि पिके कोमेजून जातात. आवश्यकतेपेक्षा जास्त रासायनिक खते जमिनीत घातली असता उपयोगी जिवाणूंचा नाश होतो आणि कणांचे हे समूह तुटतात. अशी जमीन हलकी होते आणि वादळ वाऱ्यात सहज उडून जाते अथवा मुसळधार पावसात वाहून जाते. अशा जमिनीत लहान वाळूच्या कणांचे प्रमाण आपोआप वाढते यालाच आपण शेत जमिनीचे वाळवंटीकरण म्हणतो.
वाळवंटीकरण थांबवण्यासाठी मातीमध्ये सेंद्रिय आणि रासायनिक खतांचे योग्य प्रमाण असावे लागते तरच वनस्पतींची मुळे मातीला घट्ट धरून ठेवतात. माती आणि मुळांचे गणित बिघडले की मुसळधार पावसात शेतकऱ्यांची पिके वाहून जातात त्याचबरोबर मोठमोठे वृक्षसुद्धा कोसळतात.
– डॉ. नागेश टेकाळे
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org संकेतस्थळ : www.mavipa.org