आंध्र प्रदेशातील राजमहेन्द्री येथे पदवीपर्यंतच्या शिक्षणानंतर राव बनारस हिंदू विद्यापीठातून एम.एस्सी. झाले. तेथील प्रा. ए. सी. जोशी या सुप्रसिद्ध संशोधकाच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी फुलांची अंतर्रचना आणि गर्भशास्त्र या विषयात संशोधन केले. त्यांनी दिल्लीच्या सी.एस.आय.आर.संस्थेच्या वेल्थ ऑफ इंडिया या ग्रंथासाठी दोन वष्रे साहाय्यक संपादक म्हणून काम केले. ती दोन वष्रे वगळता बाकी सर्व कार्यकाळ प्रा. राव यांनी मुंबईच्या रुइया महाविद्यालयात वनस्पती शास्त्राचे प्राध्यापक आणि फुलांच्या अंतर्रचनेचे संशोधक म्हणून व्यतीत केला. रुइया महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाला भारतातील एक महत्त्वाचे संशोधन केंद्र म्हणून ख्याती मिळवून देताना त्यांनी कित्येक विद्यार्थ्यांंना एम. एस्सी आणि पीएच.डी पदव्यांसाठी मार्गदर्शन केले.
याच काळात वर्बनेिसी, बिग्नोनिअसि, अकांथेसी आणि पिदालिअसि या वर्गातील वनस्पती प्रकारातील फुलांच्या अंतर्रचनेवर त्यांचे संशोधन चालू असे. या संशोधनावर आधारित शोधनिबंधामुळे मुंबई विद्यापीठाने १९५६ साली डी.एस्सी. देऊन त्यांना गौरवले. मुंबई विद्यापीठाची वनस्पती शास्त्रातील या प्रकारची ही पहिलीच पदवी होती.
प्रा. राव यांनी संशोधनातील स्वतंत्र विचारसरणीला नेहमी उत्तेजन दिले. अशोकाच्या फुलाच्या रंगीत पाकळ्या या पाकळ्या नसून रंगीत बाह्यदले आहेत आणि फुलांना पाकळ्याच नाहीत हे त्यांनी दाखवून दिले. अपोसाय्नेसी आणि आस्क्लेपिअडेसी या वर्गातील फुलांमधील नक्षीदार तुरे आणि पोलीनिया यांचे फुलांच्या चक्रातील स्थान त्यांना मिळत असलेल्या अन्नवाहिन्यांद्वारे निश्चित केले. त्यांचे विद्यार्थी, त्यांचा आदर्श समोर ठेवून उच्च प्रतीचे संशोधन पुढे चालू ठेवत आहेत. निवृत्तीनंतर प्रा. राव यांनी काही काळ राजमहेंद्री येथील तंबाखू संशोधन केंद्रात मार्गदर्शन केले.
ओल्या खडकावर वाढणारा, जेमतेम दहा सेंटीमीटर उंचीचा बर्मानिया आणि पावसाळ्यात उगवून पावसाळ्याबरोबर आयुष्य संपवणारा मीटरभर उंचीचा टाक्का, या आणि इतर काही वनस्पतीच्या फुलांमधील अन्नवाहिन्यांवरचे त्यांचे संशोधन निवृत्त होईपर्यंत चालूच होते.
वनस्पती शास्त्राचे उत्कृष्ट शिक्षक आणि संशोधन हाच व्यासंग असणारे, कडक शिस्तप्रिय, काहीसे अलिप्त वाटणारे प्रा. राव खासगी आयुष्यात कुटुंबवत्सल, मृदुभाषी आणि मनमिळाऊ वृत्तीचे होते.
– प्रा. राघवेंद्र पै
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
sunitpotnis@rediffmail.com

 

प्रबोधन पर्वात फ्लोरेन्सचे स्थान
इसवी सनाच्या साधारणत: चौदाव्या शतकापासून ते सतराव्या शतकापर्यंत युरोपातील साहित्य, तत्त्वज्ञान, विज्ञान, कला, संस्कृती इत्यादी समाजजीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात नवचतन्य येऊन त्यात आमूलाग्र बदल झाला. या तीन शतकांच्या प्रबोधन पर्वाला किंवा पुनरुत्थान चळवळीला युरोपात रेनेसान्स अथवा रेनायन्सास असे म्हटले जाते. मध्ययुगीन संस्कृतीतून आधुनिक संस्कृतीत परिवर्तन होण्याची ही एक सांस्कृतिक चळवळ होती असे म्हणता येईल. मध्ययुगीन काळाच्या अखेरीस १४ व्या शतकाच्या सुरुवातीस या चळवळीची सुरुवात इटालीत फ्लोरेन्समध्ये सुरू होऊन सर्व युरोपभर पसरली. या काळात कॉन्स्टन्टिनोपल येथील पूर्व रोमन साम्राज्य ढासळल्यावर तिकडचे अनेक ग्रीक विद्वान आपले लॅटिनमधील साहित्य घेऊन इटालीच्या फ्लोरेन्समध्ये पळून आले, स्थायिक झाले. याच काळात दान्ते अलीघिरी (१२६५-१३२१) याने मानव हा केंद्रिबदू समजून जी साहित्यनिर्मिती केली ती प्रबोधन काळाची सुरुवात समजली जाते. दान्ते आणि पेट्रार्च या फ्लोरेन्सच्या दोन साहित्यिकांनी प्रथमच लॅटिनऐवजी इटालियन भाषेत साहित्यनिर्मिती केली. वास्तुविशारद फ्लिपो ब्रुनेल्शी (१३७७-१४४६) याने फ्लोरेन्सच्या सान्ता मारिया ऊर्फ डय़ूमो या जगप्रसिद्ध चर्चचा घुमट बनविला. युरोपियन चर्चवरील हा पहिला घुमट. आजही जगातील मोठय़ा घुमटांपकी दुसऱ्या क्रमांकाचा! प्रबोधन पर्वाच्या तीन शतकांमध्ये फ्लोरेन्ससारख्या लहान शहराच्या परिसरात निर्माण झालेल्या असंख्य चित्रकार, शिल्पकार, वास्तुविशारद, वैज्ञानिकांपकी काही दिग्गजांनी आपल्या कलाकृतींनी तत्कालीन कलाक्षेत्राला नवीन दिशा दिली. त्यापकी लिओनार्दो दा व्हिन्ची (१४५२-१५२०), मायकेल अ‍ॅन्जेलो (१४७५-१५७०), गॅलिलीओ गॅलीली (१५६४-१६४२), ब्रुनेल्ची (१३६७-१४४६), घिबेर्ती (१३७८-१४५५), डोनातिलो इत्यादींनी आपल्या कलाकृती अजरामर करून ठेवल्या. या तीन शतकांत फ्लोरेन्समध्ये ही असाधारण कर्तृत्वाची माणसे तयार होणे आणि त्यांना भरघोस राजाश्रय, प्रोत्साहन देणाऱ्या मेदीची घराण्याचे राज्यकत्रेही तयार होणे हा योगायोगही असाधारणच! केवळ कला, संस्कृती, विज्ञान या क्षेत्रातच नाही तर लॉरेन्झ मेदीची या शासकाने ‘डबल एन्ट्री बुककीपिंग’ ही जमाखर्चाची नवीन पद्धतही या काळातच शोधून काढली!
– सुनीत पोतनीस
office@mavipamumbai.org