आंध्र प्रदेशातील राजमहेन्द्री येथे पदवीपर्यंतच्या शिक्षणानंतर राव बनारस हिंदू विद्यापीठातून एम.एस्सी. झाले. तेथील प्रा. ए. सी. जोशी या सुप्रसिद्ध संशोधकाच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी फुलांची अंतर्रचना आणि गर्भशास्त्र या विषयात संशोधन केले. त्यांनी दिल्लीच्या सी.एस.आय.आर.संस्थेच्या वेल्थ ऑफ इंडिया या ग्रंथासाठी दोन वष्रे साहाय्यक संपादक म्हणून काम केले. ती दोन वष्रे वगळता बाकी सर्व कार्यकाळ प्रा. राव यांनी मुंबईच्या रुइया महाविद्यालयात वनस्पती शास्त्राचे प्राध्यापक आणि फुलांच्या अंतर्रचनेचे संशोधक म्हणून व्यतीत केला. रुइया महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाला भारतातील एक महत्त्वाचे संशोधन केंद्र म्हणून ख्याती मिळवून देताना त्यांनी कित्येक विद्यार्थ्यांंना एम. एस्सी आणि पीएच.डी पदव्यांसाठी मार्गदर्शन केले.
याच काळात वर्बनेिसी, बिग्नोनिअसि, अकांथेसी आणि पिदालिअसि या वर्गातील वनस्पती प्रकारातील फुलांच्या अंतर्रचनेवर त्यांचे संशोधन चालू असे. या संशोधनावर आधारित शोधनिबंधामुळे मुंबई विद्यापीठाने १९५६ साली डी.एस्सी. देऊन त्यांना गौरवले. मुंबई विद्यापीठाची वनस्पती शास्त्रातील या प्रकारची ही पहिलीच पदवी होती.
प्रा. राव यांनी संशोधनातील स्वतंत्र विचारसरणीला नेहमी उत्तेजन दिले. अशोकाच्या फुलाच्या रंगीत पाकळ्या या पाकळ्या नसून रंगीत बाह्यदले आहेत आणि फुलांना पाकळ्याच नाहीत हे त्यांनी दाखवून दिले. अपोसाय्नेसी आणि आस्क्लेपिअडेसी या वर्गातील फुलांमधील नक्षीदार तुरे आणि पोलीनिया यांचे फुलांच्या चक्रातील स्थान त्यांना मिळत असलेल्या अन्नवाहिन्यांद्वारे निश्चित केले. त्यांचे विद्यार्थी, त्यांचा आदर्श समोर ठेवून उच्च प्रतीचे संशोधन पुढे चालू ठेवत आहेत. निवृत्तीनंतर प्रा. राव यांनी काही काळ राजमहेंद्री येथील तंबाखू संशोधन केंद्रात मार्गदर्शन केले.
ओल्या खडकावर वाढणारा, जेमतेम दहा सेंटीमीटर उंचीचा बर्मानिया आणि पावसाळ्यात उगवून पावसाळ्याबरोबर आयुष्य संपवणारा मीटरभर उंचीचा टाक्का, या आणि इतर काही वनस्पतीच्या फुलांमधील अन्नवाहिन्यांवरचे त्यांचे संशोधन निवृत्त होईपर्यंत चालूच होते.
वनस्पती शास्त्राचे उत्कृष्ट शिक्षक आणि संशोधन हाच व्यासंग असणारे, कडक शिस्तप्रिय, काहीसे अलिप्त वाटणारे प्रा. राव खासगी आयुष्यात कुटुंबवत्सल, मृदुभाषी आणि मनमिळाऊ वृत्तीचे होते.
– प्रा. राघवेंद्र पै
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
sunitpotnis@rediffmail.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा