भानू काळे
एखाद्याचा फोन आपण घेतो तेव्हा पहिला शब्द उच्चारतो तो म्हणजे ‘हॅलो’. आपण फोन घेतलेला आहे आणि फोन करणारा आता बोलू शकतो असा संदेश त्यातून जातो. एखाद्याला भेटल्यावर देखील आपण प्रथम ‘हॅलो’ म्हणतो. त्याऐवजी आपल्याकडे काही जण ‘नमस्कार’ म्हणतात; ‘राम राम’ किंवा ‘जय श्रीकृष्ण’ म्हणायची पद्धतही कुठे कुठे आहे
आणि त्यात गैर काहीच नाही. ‘हॅलो’ म्हणण्याऐवजी ‘वंदे मातरम्’ म्हणावे असाही एक प्रस्ताव मध्यंतरी महाराष्ट्रातील एका मंत्र्यांनी आणला होता, त्याला शासनाने मंजुरीही दिली, पण तो प्रत्यक्षात अमलात आल्याचे दिसत नाही. पण हे अपवादस्वरूप वापरले जाणारे पर्याय सोडले तर जगभर सगळीकडे ‘हॅलो’ असेच म्हणायची पद्धत रूढ आहे. ‘हॅलो’ हा शब्द आला कुठून? ज्याने १८७६ साली टेलिफोनचा शोध लावला त्या अॅलेक्झांडर ग्रॅहम बेल याची इच्छा फोन उचलल्यावर ‘अहोय’ म्हणावे अशी होती. कारण ‘अहोय’ (Ahoy) हा, डच ‘होय’ (hoi) वरून आलेला शब्द एखाद्याला भेटल्यानंतर संबोधन म्हणून युरोपात प्रचलित होता. पण त्याचा स्पर्धक थॉमस एडिसन याला ते आवडले नाही. त्याने साधारण त्याच सुमारास अमेरिकेत सेंट्रल टेलिफोन एक्स्चेंजेस उभारायला सुरुवात केली होती व तिथे त्याने कुठलाही आलेला फोन उचलल्यावर ‘अहोय’ऐवजी ‘हॅलो’ (इंग्लिश स्पेलिंग Hullo,, तर अमेरिकन स्पेलिंग Hello’) हा संबोधन म्हणून प्रचलित असलेला प्रतिशब्द वापरायला सुरुवात केली.
टेलिफोन ऑपरेटर म्हणून तिथे काम करणाऱ्या मुलींना ‘हॅलो गर्ल्स’ असेच म्हटले जाऊ लागले. त्या काळात तंत्रविज्ञानात एडिसनचा सर्वाधिक प्रभाव होता व त्यामुळे ‘हॅलो’ हेच रूप अमेरिकेत आणि मग जगभर रूढ झाले. तरुण पिढीत आज प्रचलित असलेले ‘हाय’ हे संबोधन मात्र ‘अहोय’चेच लघुरूप आहे. ‘हॅलो’ या अर्थाने स्पॅनिशमध्ये मूळ लॅटिनमधून आलेला ‘ओला’ (स्पेलिंग hola पण उच्चार ओला) हा शब्दही वापरला जातो. याच नावाची टॅक्सी सव्र्हिसदेखील आज जगभर प्रचलित आहे. अशाच दुसऱ्या टॅक्सी सव्र्हिसचे नाव असलेला ‘उबर’ हा शब्द म्हणजे मात्र मूळ ‘उच्च’ आणि आधुनिक काळात ‘सुपर’ या अर्थाचा जर्मन शब्द आहे.
bhanukale@gmail.com