यास्मिन शेख
हे वाक्य वाचा – ‘या सभागृहाचे बांधकाम जरी पूर्ण झाले असले, तरी इतर अनेक अनुषंगिक कामे अजून पूर्ण झालेली नाहीत.’ वरील वाक्यात एक चुकीचा शब्द योजल्यामुळे वाक्य सदोष झाले आहे. तो शब्द आहे- अनुषंगिक. मूळ शब्द आहे- अनुषंग. (संस्कृत, नाम, पुल्लिंगी) अर्थ- निकट, संबंध, संगती. या नामाला ‘इक’ प्रत्यय लागून विशेषण सिद्ध होते- आनुषंगिक. पहिले अक्षर ‘अ’ चा ‘आ’ होतो. आनुषंगिक या विशेषणाचा अर्थ आहे – तत्संबंधी, बरोबर येणारे, आवश्यक, आणखी, गौण. वरील वाक्यात ‘आनुषंगिक’ हे ‘कामे’ या नामाचे विशेषण आहे. सभागृहाचे बांधकाम पूर्ण झाले; पण इतर आनुषंगिक कामे- उदा. सभागृहाचे रंगकाम, सभागृहाची खुर्च्याची मांडणी, पंखे, दिवे, व्यासपीठावरील सामान व त्याची योग्य मांडणी इ. सभागृहातील इतर आवश्यक कामे पूर्ण झाली नाहीत, असा अर्थ अभिप्रेत आहे. मराठीत ‘अनुषंग’ हे नाम स्वतंत्रपणे वापरले जात नाही. फक्त एकच अपवाद- उदा. ‘तू जो विचार सांगितलास, त्या अनुषंगाने मला थोडा वेगळा विचार सांगायचा आहे.’ अनुषंगाने असे ‘ने’ प्रत्ययान्त रूप मराठी भाषेत योजलेले आढळते. ‘लोकसत्ता’च्या १३ सप्टेंबर २०२२ च्या अंकात दोन बातम्यांत ‘अनुषंगाने’ हा योग्य शब्द वापरलेला मी वाचला. शीर्षक- ‘आदिवासी महिलेचा संशयास्पद मृत्यू’ आणि ‘‘ज्ञानव्यापी’च्या सुनावणीचा मार्ग मोकळा.’’
‘आनुषंगिक’ यासारखाच आणखी एक शब्द आहे. आनुवंशिक – अनुवंश. (संस्कृत, नाम, पुिल्लगी) अर्थ- वांशिक, परंपरा, घराण्यातील परंपरा. या शब्दाला ‘इक’ प्रत्यय लागून ‘आनुवंशिक’ हे विशेषण सिद्ध होते. या शब्दातही ‘अ’ चा ‘आ’ होतो. अर्थ- वंशपरंपरागत चालत आलेला. संस्कृतात अशी काही विशेषणे आहेत. अनुभव-आनुभविक, अनुमान- आनुमानिक. मात्र मराठीत वरील दोन विशेषणेच रुढ आहेत. ‘अनु’ पूर्वपदी असलेले अनेक तत्सम शब्द मराठीत आहेत. मात्र या शब्दांना ‘इक’ प्रत्यय लागत नाही. उदा. अनुकंपा, अनुकरण, अनुक्रम, अनुनय, अनुराग, अनुरूप, अनुग्रह, अनुमती, अनुमोदन इ. मात्र ‘अन्’ हा नकारार्थी उपसर्ग अग्रस्थानी असून पुढील शब्दात पहिले अक्षर ‘उ’ असेल, तर ‘अनु’ असे रूप होईल. (उदा. अनुपस्थित, अनुचित, अनुपयुक, अनुदार इ.) पण या शब्दांचा वरील शब्दांच्या यादीत समावेश करता येणार नाही. हे वाचकांच्या लक्षात आले असेलच.