डॉ. यश वेलणकर yashwel@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सिग्मंड फ्रॉइड यांना ‘आधुनिक मानसोपचार पद्धतीचे जनक’ म्हणतात. याचे कारण- त्यांनी मानसिक त्रास का होतो याचे सिद्धांत मांडून औषधांचा उपयोग न करता, रुग्णाला बोलते करून बरे करता येते, हे दाखवून दिले. त्यापूर्वी मानसिक त्रास असलेल्या व्यक्तींना मुख्यत: दोन प्रकारच्या चिकित्सा दिल्या जायच्या.

ज्यांचे वागणे खूपच बिघडले असेल, त्यांना वेड लागले आहे असे म्हणून वेगळे ठेवले जायचे. त्या जागांना ‘ल्युनाटिक असायलम’ असे म्हटले जायचे. या मानसिक त्रासाचे कारण भुताने झपाटले आहे, परकीय आत्म्यांनी शरीरात प्रवेश केला आहे असे मानले जायचे. त्या आत्म्यांना हटवण्यासाठी मांत्रिक उपाय आणि मारझोड केली जात असे.

ज्यांचा त्रास फार गंभीर नसे, त्यांना ‘हिप्नोथेरपी’ दिली जात असे. स्वत: फ्रॉइड मेडिकल डॉक्टर म्हणून पदवीधारक होते. काही काळ रुग्णालयात नोकरी केल्यानंतर त्यांनी मानसिक त्रास असलेल्या रुग्णांसाठी खासगी क्लिनिक सुरू केले. त्यामध्ये सुरुवातीला ते हिप्नोथेरपीचाच उपयोग करत होते. या थेरपीमध्ये रुग्णाला एकाग्र व्हायला प्रेरित करून ‘ट्रान्स’ अवस्थेत नेले जाते आणि त्यास सूचना दिल्या जातात. अशा सूचनांमुळे रुग्णाची भीती, अस्वस्थता कमी होत असे. पण खूप कमी रुग्ण खऱ्याखुऱ्या ट्रान्स स्थितीत जातात, असा अनुभव फ्रॉइड यांना येऊ लागला.

मानसिक अस्वस्थता असलेले रुग्ण एकाग्र होऊ शकत नाहीत आणि त्यामुळे त्यांच्यासाठी वेगळी उपचार पद्धती शोधणे गरजेचे आहे, हे लक्षात आल्याने फ्रॉइड वेगवेगळे प्रयोग करू लागले आणि त्यातूनच- ‘रुग्णाला बोलते करून त्याच्या दबलेल्या स्मृतींना जागरूक मनात आणले तर त्याचा त्रास कमी होतो,’ हे त्यांच्या लक्षात आले. असे का होते, याची कारणमीमांसा करताना फ्रॉइड यांनी ‘सुप्त मनाचा सिद्धांत’ मांडला. माणूस त्रासदायक आठवणी आणि भावनांचे दमन करीत असतो. मात्र असे केल्याने त्या विसरल्या गेल्या असे वाटत राहिले, तरी तसे नसते; त्या सुप्त मनात साठत राहतात आणि शारीरिक किंवा मानसिक लक्षणे दाखवू लागतात. तो त्रास कमी करण्यासाठी माणसाला पडणाऱ्या स्वप्नांचे आणि त्याला अधिकाधिक बोलायला लावून, भूतकाळ आठवायला प्रेरित करून त्याचे विश्लेषण करणे म्हणजेच ‘मनोविश्लेषण’ ही पद्धती त्यांनी विकसित केली. तीच पहिली आधुनिक मानसोपचार पद्धती म्हणून ओळखली जाते!