‘हे बघ मानसी, मी आहे मुलखाचा आळशी. तेव्हा कळतं ते वळत नाही; हे मला कळतंय तरी वळत नाही. अगदी कळलं ते वळवायचं कसं? हे कळलं तरीही वळत नाही. म्हणजे मला वळवायचंच नाहीये; असं म्हणू नकोस. कारण मी आळशी आहे ना गं!’ मानस मानसीला म्हणाला.
मानसी मानसकडे रोखून बघतच राहिली. ‘मी तुझ्या युक्तिवादात लपलेली पळवाट शोधत्येय. आपण कसे मुलखाचे आळशीच आहोत. रोज व्यायाम केला पाहिजे, वाईट सवयी सोडल्याच पाहिजेत हे कळलेलं वळवता येत नाही. याची पावती आळशीपणावर फाडून स्वत:ची सुटका करून घेतल्याचे समाधान तुझ्या डोळ्यात दिसतंय!
मानसनं दीर्घ श्वास घेऊन म्हटलं, ‘तुम्ही मानसशास्त्रातले लोक येता-जाता सगळ्यांना अॅनलाइज करता. हे बघ, मी आळशी आहे. के लं ना..? मानसला मध्येच तोडत ‘केलं ना कबूल!’ असं म्हणायचंय ना तुला. मानसी म्हणाली.
स्वत:मधल्या दोषाची कबुली दिल्याचं सात्विक समाधान तुझ्या डोळ्यात दिसतंय. कबुली देऊन टाकायची, हो. अगदी प्रामाणिकपणे (म्हणजे तसा आव आणून) कबुली दिली. की आळशीपणा करायला पुन्हा मोकळा झाला. मानस सर्द होऊन मानसीकडे पाहात राहिला. ‘तू अशी बेचक्यात पकडतेस ना मला!’ तो म्हणाला.
मानसी एकदम हसली, हे बघ मानस, तुला खजील करायचा माझा इरादा नाही. पण काही गोष्टी लक्षात आल्या असतीलच तुझ्या! आपल्या प्रतिबिंबापासून तू काही लपवू शकत नाहीस. मानस, माझा मुद्दा निराळाच आहे रे! हे बघ, मला मुळातच ‘आळशी किंवा कसलंच लेबल लावलेलं आवडत नाही. कारण तुझ्या मनातला घोळ ‘तू स्वत:ला ‘आळशी’ हे लेबल लावण्यामुळे होतोय. एकदा एखादं लेबल विशेषकरून नकारात्मक लेबल कोणाला, अगदी स्वत:ला लावलं की कोणाकडेही नीट पाहाता येत नाही.
अशी लेबलं लावण्यात पालक एकदम पटाईत असतात. धांदरट, आळशी, बावळट म्हणून लेबल लावलं की ते अगदी आयुष्यभर टिकतं. गंमत म्हणजे धांदरट, आळशी वागण्याची आपल्याला मुभा मिळते. एनी वे, मी आहेच आळशी! तर आळशासारखंच वागणार!! असं आत्मसमर्थन करू लागतो. जणू काही वी लिव्ह अप टू द लेबल! तेव्हा मानस, स्वत:ला आळशी असं लेबल लावायचं सोडून दे. आपण तुझ्याकडे, म्हणजे तुझ्या कळतं पण वळत नाही या वर्तनाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहू. तुझी अडचण नेमक्या शब्दात मांडू. त्यामुळे स्वत:मध्ये अचूक बदल करता येईल. उदा. माझ्या मनात पराभवामुळे उद्भवणाऱ्या नाराजीवर मात कशी करायची, हे समजलेलं नाही. म्हणजे स्वत:मध्ये बदल करायला एकदोनदा प्रयत्न करून जमलं नाही की मला चटकन निराश वाटतं. अशी निराशा माझ्यापुढचं आवाहन आहे. असं तू म्हण. तू डिप्रेशन चॅलेंज्ड आहेस.
मानस अवाक होऊन पाहात राहिला. ‘मानसी, तू अगदी मोजक्या आणि बिनचूक शब्दात माझा प्रश्न मांडलास. मला तुझं विश्लेषण शंभर टक्के पटलं. आणखी एक मुद्दा, ‘मला निराश होण्यावर काहीतरी उपाय सुचव ना!’
माझ्या डोक्यावर टपली मारून मानसी म्हणाली, ‘बघ आत्मचिंतन केलंस की नवे विचार सुचतील. आता या विचारांविषयी याच कट्टय़ावर बोलू..’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा