माणसाच्या मेंदूत खालून वर जाणाऱ्या लहरी सतत वाहत असतात, त्यामुळेच मनात सतत विचार येत असतात. विचारांच्या प्रवाहात माणूस वाहत असतो. हा प्रवाह थांबवणे आणि अधूनमधून सजग होणे आवश्यक असते. अन्यथा माणसाची रोजची सवयीची कामे विचारांचा प्रवाह चालू असतानाच होत राहतात. हे टाळण्यासाठी आणि सजग होण्यासाठी दिवसभरात जे काही आपण करीत असतो- ते का करीत आहे, असा प्रश्न स्वत:ला विचारायचा. या प्रश्नाकडे आपण लक्ष देतो आणि त्याला उत्तर देतो त्या वेळी मेंदूत वरून खाली वाहणाऱ्या लहरी आपण निर्माण करतो. असे उत्तर आपण देतो तेव्हा त्या कृतीला, कामाला अर्थ देत असतो. असे करीत राहिल्याने मनात आपोआप चालू असलेल्या विचारांच्या प्रवाहातून आपण बाजूला होतोच, पण निर्थक कृतीत वाया जाणारा वेळ वाचू लागतो. याला ‘हेतू, इंटेन्शन, मूल्यविचार’ म्हणता येईल.
ते काम सवयीचे असेल तर पुन्हा विचारांचा प्रवाह सुरू होतो. त्यापासून अलग होण्यासाठी लक्ष देण्याचे कौशल्य वापरायचे. आपले लक्ष पुन:पुन्हा कृतीवर आणायचे. शरीराला होणारे स्पर्श, चव, समोरील दृश्य यांवर लक्ष द्यायचे. ठरवून लक्ष देतो तेव्हा मेंदूत वरून खाली लहरी वाहू लागतात. ‘लक्ष देणे, अटेन्शन’ हे सजगतेच्या सरावातील दुसरे सूत्र आहे. असे लक्ष देत असतानाही मनात अन्य विचार येणार, कारण मेंदूतील खालून वर वाहणाऱ्या लहरी सतत चालू असतात. या विचारांना प्रतिक्रिया न करणे, मन भटकते म्हणून स्वत:वर न चिडणे, निराश न होणे, मनात अन्य विचार आहेत याचा स्वीकार करणे म्हणजेच ‘साक्षीभाव’ हे सजगतेच्या सरावातील तिसरे सूत्र आहे.
हेतू, लक्ष देणे आणि स्वीकार करणे या त्रिसूत्रीचा अवलंब केला, की माणूस अधिकाधिक सजग राहू लागतो. त्यामुळे कामे अधिक चांगली आणि कमी वेळात होतात. त्यामुळे प्रत्येक तासात पाच मिनिटे काहीही न करता स्वत:च्या शरीरात काय होते आहे त्याकडे लक्ष देता येते. याचा हेतू शरीरातील संवेदना जाणणाऱ्या मेंदूतील भागाला सक्रिय करणे हा आहे. असे लक्ष देतानाही मनात विचार येणार. भान येईल त्या वेळी ‘या मिनिटभरात मनात हे हे विचार होते’ अशी नोंद करायची आणि त्या विचारांना ‘हे नकारात्मक’ अशी प्रतिक्रिया करायची नाही.
डॉ. यश वेलणकर yashwel@gmail.com