आधुनिक पद्धतीची दर्जेदार घरे ही काळाची मागणी आहे. नवीन घराला काही वर्षांनी आतून व बाहेरून भेगा पडल्या की घरात राहणाऱ्यांना मोठा धक्का बसतो. या भेगा व त्यातून होणारी गळती कमी करण्यासाठी भिंतींची डागडुजी करणे तर गरजेचे असतेच, पण ही प्रक्रिया खर्चीक व खूप क्लिष्ट असते. भेगा भरण्याव्यतिरिक्त, जलरोधक प्रक्रिया (वॉटर प्रूफिंग) आणि रंगकामही करावे लागते. हे उपाय दर दोन-तीन वर्षांनी करावे लागतात, त्यामुळे सुरुवातीपासूनच सूक्ष्म भेगांचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. तसे केल्यास दुरुस्तीसाठी करावा लागणारा मोठा खर्च टाळता येईल. या कामासाठी जिवाणूंचीच मदत घेता येते. काँक्रीट/ सिमेंटमधील सूक्ष्म भेगा भरून काढण्यासाठी जिवाणूंचा वापर करता येऊ शकतो, हे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ जाणतात.
१८७७ मध्ये ‘आधुनिक जिवाणूशास्त्राचे जनक’ मानल्या जाणाऱ्या जर्मनीच्या डॉ. फर्डिनंड कोहने यांनी असे सांगितले होते की, काही ‘बॅसिलस’ (दंडाकार जिवाणू) यासाठी वापरले जाऊ शकतात. डोळय़ांना सहज न दिसणाऱ्या काँक्रीटमधील भेगांमध्ये पोहोचण्यासाठी हे जिवाणू उत्कृष्ट माध्यम आहेत. भिंतींमध्ये मुरणाऱ्या पाण्याला रोखणे आणि भेगांवरील उपायांसाठी युरियाचे अपघटन करणाऱ्या आणि कॅल्शिअम काबरेनेटचे निक्षेपण करणाऱ्या जिवाणूंचा वापर केला जातो. कॅल्शिअम काबरेनेटच्या अशा निक्षेपणामुळे भेगांमधील उपलब्ध सर्व जागा व्यापली जाऊन सूक्ष्म भेगा आणि छिद्र भरली जातात. तसेच संलग्न आणि विसंलग्न बलांमुळे काँक्रीटमधील भेगांच्या आतील पृष्ठभागाशी ते निक्षेपण विलीन होते आणि काँक्रीटच्या भिंतीतून पाणी झिरपणे कमी होते.
पृष्ठभागाचे क्षेत्रफळ व आकारमान याचे गुणोत्तर इतर सूक्ष्मजीवांच्या तुलनेने जिवाणूंना सर्वात जास्त ज्ञात असते. बॅसिलस पॅश्च्युरी, बॅसिलस स्फेरिकस, बॅसिलस अल्कलीनिट्रिलिक्स, यक्रोकॉकस प्रजाती आणि स्पोरोसॅरसीना पॅश्च्युरी अशा काही जिवाणूंमध्ये ही विलक्षण क्षमता आहे.
हे व्यावसायिक पातळीवर नेण्यात आव्हाने आहेत. ज्या मात्रेत जिवाणू लागतील त्या प्रमाणात त्यांच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या पोषकद्रव्याचे मूल्य जास्त आहे. त्यामुळे आर्थिकदृष्टय़ा हे खूप मोठे आव्हान आहे. डागडुजीसाठी आवश्यक कालावधीपर्यंत हे जिवाणू टिकवून ठेवण्यासाठी व काँक्रीटमधील भेगांमध्ये भरल्या जाणाऱ्या मिश्रणातील आद्र्रता नियंत्रणासाठी स्वस्त तंत्रज्ञान पर्याय विकसित करण्याची गरज आहे. या आव्हानांवर मात केली तरच, स्थापत्यतज्ज्ञांचे या विशेष जिवाणूंचा वापर करून दीर्घकाळ टिकणारी व भेगमुक्त घरे बांधण्याचे स्वप्न साकार होईल आणि बॅसिलस सिमेंट, स्पोरोसारसीना/ मायक्रोकॉकस काँक्रीट मिक्स इत्यादी उत्पादने बाजारात येतील यात शंका नाही.
– डॉ. गिरीश ब. महाजन
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : www.mavipa.org