धान्य पारंपरिक पद्धतीने साठविल्यामुळे आपण धान्याचा होणारा विनाश काही प्रमाणात कमी करू शकतो; परंतु घाऊक बाजारात साठवणूक करून, नंतर त्यावर प्रक्रिया करून जेव्हा धान्य ग्राहकापर्यंत पोहोचवावे लागते, तेव्हा किडय़ांचा प्रादुर्भाव होऊन जवळपास २० टक्के धान्य नष्ट होते. यासाठी धान्यावर विकिरण प्रक्रिया करणे हा एक चांगला उपाय आहे.
पॅकबंद अवस्थेतील आटा, रवा, मदा, वेगवेगळी पिठे यांच्यावर विकिरण प्रकिया केलेली असेल, तर त्यात किडय़ांचा अंश राहत नाही. पॅकबंद अवस्थेत धुरी देता येत नाही. मात्र पॅकेजमधून आरपार जाणाऱ्या गॅमा किरणांद्वारे एकंदर ३९ जातींचे किडे, एवढेच नव्हे तर त्यांच्या सर्व जीवनावस्थांचा संपूर्ण नाश करता येतो. यामध्ये धान्यावर ‘कोबाल्ट-६०’ या किरणोत्सारी मूलद्रव्यातून बाहेर पडणाऱ्या गॅमा किरणांचा अत्यल्प प्रमाणात व नियमित स्वरूपात मारा करतात.
सर्वप्रथम ९० वर्षांपूर्वी रशियात किडे मारण्यासाठी विकिरण प्रक्रिया वापरली गेली. आज जवळजवळ ४१ देशांत वेगवेगळे पदार्थ विकिरण प्रक्रिया करून टिकवतात. शंभरच्या वर अन्नपदार्थ त्यांचे किडय़ांपासून संरक्षण करण्यासाठी, र्निजतुकीकरण करण्यासाठी, कोंब येण्याची किंवा पिकण्याची प्रक्रिया लांबणीवर टाकण्यासाठी विकिरित केले जातात.
भारतात अणुयुगाचे पितामह डॉ. भाभा यांनी यावर संशोधन करून विकिरण प्रक्रियेचा वापर प्रथम केला. हापूस आंबे निर्यात करण्यासाठी विकिरण प्रक्रियेचा खूप मोठय़ा प्रमाणावर वापर होतो आहे. आणखी २१ पदार्थाना विकिरण करण्यासाठी भारताने मान्यता दिली आहे. धान्यापकी गव्हाचे पीठ, रवा, मदा या पदार्थाना किडय़ांपासून संरक्षणासाठी विकिरण प्रक्रिया वापरण्यास परवानगी आहे; परंतु व्यापारी तत्त्वावर अजूनही ही प्रक्रिया धान्यासाठी वापरली जात नाही.
एक असा गरसमज आहे की, विकिरणामुळे पदार्थ किरणोत्सारी बनतात; परंतु विकिरणाचा कुठलाही अंश धान्यात राहत नाही. किरणोत्सारी पदार्थ गॅमा किरण प्रसृत करण्यासाठी वापरतात. या किरणोत्सारी पदार्थाचा संपर्क पदार्थाना होत नाही. त्यामुळे पदार्थ किरणोत्सारी होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. म्हणजेच विकिरित पदार्थाचे सेवन आरोग्याला हानिकारक नसते. या पदार्थाच्या चवीत, रंगात, स्वादात, गंधात कुठलाही बदल होत नाही. यातील पोषणमूल्येही तशीच राहतात.
आजचे महाराष्ट्रसारस्वत : २६ मार्च
१९२९ > मुंबई इलाख्याचे गॅझेटियर तयार करण्यात सहभाग असलेले मानववंशशास्त्र व इतिहासाचे अभ्यासक पुरुषोत्तम बाळकृष्ण जोशी यांचे निधन. ते कवी होते, त्यांचे सात संग्रहदेखील प्रकाशित झाले होते.
१९४३ > कादंबरी, निबंध, प्रवासवर्णन, काव्य आदी वाङ्मयप्रकार हाताळून समीक्षा व वैचारिक लेखन करणारे डॉ. यशवंत राजाराम मनोहर यांचा जन्म. ‘ मंडल आयोग: भ्रम आणि सत्य’तर ‘दलित साहित्य: सिद्धान्त आणि स्वरूप’, ‘निबंधकार डॉ. आंबेडकर ही त्यांची महत्त्वाची पुस्तके.
१९४९ > गांधीचरित्र लिहिणाऱ्या अवंतिकाबाई गोखले यांचे निधन. या पुस्तकाला प्रस्तावना लोकमान्य टिळकांची आहे. परिचारिकेचे शिक्षण घेतलेल्या अवंतिकाबाईंनी पुढे महिला आरोग्य व अन्य क्षेत्रात काम करण्यासाठी ‘हिंदू महिला समाजा’ची स्थापना केली होती.
२००८ > विद्रोहासोबत मानवी मूल्यांचा पुरस्कार करणारे पहिले मराठी दलित साहित्यकार बाबूराव बागूल यांचे निधन. ‘जेव्हा मी जात चोरली’, ‘मरण स्वस्त होत आहे’ हे कथासंग्रह, ८ कादंबऱ्या, ‘दलित साहित्य: आजचे क्रांतिविज्ञान’ (नवसमीक्षा) आदी पुस्तकांखेरीज, साहित्य अकादमीने त्यांचे निवडक साहित्य प्रकाशित केले आहे.
संजय वझरेकर
वॉर अँड पीस : दातांचे आरोग्य
भारतीय हवाईदलात मी दिल्ली येथे असताना सरजट जगजितसिंग चड्डा नावाच्या जुन्या सरदारजींचा चार वर्षे घनिष्ट संबंध होता. या गृहस्थाने कधी आयुष्यात मंजन किंवा पेस्ट घेऊन दात घासलेले नव्हते. त्याला कधी गरज पडली नाही. आहार सर्व तऱ्हेचा मांस, मटण, दारू वाटेल ते खातपीत असे. मटण खायचा म्हणजे ते कच्चे, अर्धकच्चे, शिजलेले कसेही असो. दुपारच्या जेवणाच्या वेळी ते नेहमीच म्हणायचे, ‘शेर कभी दांत साफ करते किसने देखा है?’ त्या सरदारजींची दातांची रचनाच जन्मत: उत्तम होती. त्यात अन्न अडकायला फटी नव्हत्या. चुळा भरल्या की काम भागत असे. मध्यंतरी ते पुण्याला काही निमित्ताने मला भेटावयास आले असताना त्यांचे दात आमचे वै. माधवराव शेण्डय़े यांनी पाहून ‘लाखात अशी दंतरचना असते’ असे सांगितले. अशी दंतरचना नसलेल्यांनी काय करावयाचे सर्वाना माहीत असते. पण आपण ते करत नाही. रात्री झोपण्याअगोदर दात साफ करणे, खुळखुळून चुका भरणे एवढे जरी केले तरी दंतवैद्यांपासून आपण लांब राहू शकू.
लहान मुलांचे नवीन येणारे दात ही समस्या होऊ शकते. दाताच्या विकारामध्ये लहान मुलांच्या एक ते तीन वर्षांपर्यंतच्या मुलांच्या दंत समस्यांकडे त्यांच्या आईवडिलांनी लक्ष द्यायला हवे. वयाच्या सात-आठ वर्षांपर्यंत काही बाबतीत बारा वर्षांपर्यंत मुलांच्या शरीराची कमी अधिक वाढ होत असते. लहान बालकांना सहाव्या महिन्यापासून प्रथम एखाद दुसरा व नंतर हळूहळू खालचे, वरचे दात व शेवटी दाढा येत असतात, काही काळाने लहान बालकांचे ‘दुधाचे दात’ पडतात. लहानपणी आली गेली पाहुणे मंडळी, लहान बालकांना कौतुकाने चॉकलेट, गोळ्या बिस्किटे, पेढाबर्फी देत असतात. अशा गुळगुळीत, बुळबुळीत पदार्थामुळे त्यांचे दात किडतात, फटी पडतात. याकरिता नवीन दात चांगले, सरळ न किडलेले येतील ही काळजी घेणे या पालकांची नैतिक जबाबदारी असते. टुथपेस्ट, ब्रशची सवय लावण्यापेक्षा गेरूचे दंतमंजन हाताने करून बालकांचे दंतारोग्य राखावे.
वैद्य प. य. वैद्य खडीवाले
जे देखे रवी.. : तुझे आहे तुजपाशी
मी मेडिकलच्या शेवटच्या वर्षांला असताना एकदा अपघात विभागाच्या बाहेरून जात होतो. तेव्हा एका तरुण बाईला अत्यवस्थ स्थितीत आत जाताना पाहिले आणि कुतूहल म्हणून आत गेलो. ती बाई पांढरीफटक पडलेली होती ते मलाही कळले. पोटावर हात ठेवून ‘दुखते दुखते’ असे म्हणत होती. इतक्यात तिची आई आणि सासू आली आणि हिला दोन महिने गेले आहेत असे म्हणू लागल्या. नवरा एखाद्या अपराध्यासारखा कोपऱ्यात उभा होता. तेवढय़ात आतल्या खोलीतला डॉक्टर बाहेर आला. त्याने एकच मिनिट त्या मुलीला बघितले आणि म्हणाला एउळडढकउ. मला ऑपरेशन थिएटरमध्ये पिटाळण्यात आले. नुकतीच एक शस्त्रक्रिया संपवून एक बायकांचा सर्जन बाहेर येत होता. त्यानेही तिला तपासले आणि तोही तेच म्हणाला. अवघ्या दहा मिनिटांत त्या बाईचे पोट उघडण्यात आले आणि आत रक्ताचे अजून न गोठलेले थारोळे दिसले. मला रक्तपेढीत पिटाळण्यात आले आणि रक्तासाठीची बाटली आणावयास सांगण्यात आले. मी धूम ठोकली आणि बाटली आणली. त्यात रक्त गोठू नये म्हणून एक द्रव्य घातलेले होते. मग त्या सर्जनने बासुंदी डावाने वाढावी तसे पोटातले रक्त त्या बाटलीत भरले आणि ती भरल्यावर तेच रक्त त्या मुलीला देण्यात येऊ लागले. मग तिची स्थिती सुधारत आहे हे बघितल्यावर त्या सर्जनने रक्त ज्या गर्भाशयाच्या नळीतून येत होते तिथे चिमटा लावला आणि रक्तस्राव थांबवला.
या मुलीतला गर्भ गर्भाशयात वाढण्याऐवजी गर्भाशयाच्या नळीमध्ये वाढत होता. नळी त्यामुळे फुटली होती आणि म्हणून हा रक्तस्राव झाला होता. याला इंग्रजीत एउळडढकउ म्हणजे ‘निराळ्या जागी’ असे म्हणतात. या गोष्टीतली सगळ्यात वैशिष्टय़पूर्ण गोष्ट त्या बाईचे रक्त तिलाच दान केल्याबद्दल आहे. हल्ली रक्त देताना याचा अवलंब मोठय़ा प्रमाणात करण्यात येत आहे. जर एखादी शस्त्रक्रिया पंधरा दिवसांनंतर होणार असेल आणि ती करताना जर रक्त लागणार असेल तर रुग्णाचेच रक्त काढून ठेवतात. आठ-दहा दिवसांत तो रुग्ण ही उणीव भरून काढतो. मग शस्त्रक्रियेच्या वेळी त्याला त्याचेच रक्त देतात. सगळ्यात हीच पद्धत सुरक्षित आहे. रक्तगटही तोच असणार आणि दुसऱ्याच्या रक्तातले आजार होण्याचा संभव शून्य असतो. तसेच कितीही मोठी शस्त्रक्रिया असली तरी रक्त जपून वापरावे, असे आता सिद्ध आहे. कर्करोगाच्या रुग्णामध्ये जेवढे जास्त रक्त दिले जाते त्या प्रमाणात कर्करोग परत उलटतो असे दिसते. भरपूर रक्त दिल्याने शरीरातले रक्त पुरवठय़ाचे केंद्र मंदावते, त्यामुळे प्रतिकार करणाऱ्या गुप्तहेर पेशी कमी तयार होतात आणि कर्करोगाचे फावते असे आढळून आले आहे.
रविन मायदेव थत्ते – rlthatte@gmail.com