धान्य पारंपरिक पद्धतीने साठविल्यामुळे आपण धान्याचा होणारा विनाश काही प्रमाणात कमी करू शकतो; परंतु घाऊक बाजारात साठवणूक करून, नंतर त्यावर प्रक्रिया करून जेव्हा धान्य ग्राहकापर्यंत पोहोचवावे लागते, तेव्हा किडय़ांचा प्रादुर्भाव होऊन जवळपास २० टक्के धान्य नष्ट होते. यासाठी धान्यावर विकिरण प्रक्रिया करणे हा एक चांगला उपाय आहे.
पॅकबंद अवस्थेतील आटा, रवा, मदा, वेगवेगळी पिठे यांच्यावर विकिरण प्रकिया केलेली असेल, तर त्यात किडय़ांचा अंश राहत नाही. पॅकबंद अवस्थेत धुरी देता येत नाही. मात्र पॅकेजमधून आरपार जाणाऱ्या गॅमा किरणांद्वारे एकंदर ३९ जातींचे किडे, एवढेच नव्हे तर त्यांच्या सर्व जीवनावस्थांचा संपूर्ण नाश करता येतो. यामध्ये धान्यावर ‘कोबाल्ट-६०’ या किरणोत्सारी मूलद्रव्यातून बाहेर पडणाऱ्या गॅमा किरणांचा अत्यल्प प्रमाणात व नियमित स्वरूपात मारा करतात.
सर्वप्रथम ९० वर्षांपूर्वी रशियात किडे मारण्यासाठी विकिरण प्रक्रिया वापरली गेली. आज जवळजवळ ४१ देशांत वेगवेगळे पदार्थ विकिरण प्रक्रिया करून टिकवतात. शंभरच्या वर अन्नपदार्थ त्यांचे किडय़ांपासून संरक्षण करण्यासाठी, र्निजतुकीकरण करण्यासाठी, कोंब येण्याची किंवा पिकण्याची प्रक्रिया लांबणीवर टाकण्यासाठी विकिरित केले जातात.
भारतात अणुयुगाचे पितामह डॉ. भाभा यांनी यावर संशोधन करून विकिरण प्रक्रियेचा वापर प्रथम केला. हापूस आंबे निर्यात करण्यासाठी विकिरण प्रक्रियेचा खूप मोठय़ा प्रमाणावर वापर होतो आहे. आणखी २१ पदार्थाना विकिरण करण्यासाठी भारताने मान्यता दिली आहे. धान्यापकी गव्हाचे पीठ, रवा, मदा या पदार्थाना किडय़ांपासून संरक्षणासाठी विकिरण प्रक्रिया वापरण्यास परवानगी आहे; परंतु व्यापारी तत्त्वावर अजूनही ही प्रक्रिया धान्यासाठी वापरली जात नाही.
एक असा गरसमज आहे की, विकिरणामुळे पदार्थ किरणोत्सारी बनतात; परंतु विकिरणाचा कुठलाही अंश धान्यात राहत नाही. किरणोत्सारी पदार्थ गॅमा किरण प्रसृत करण्यासाठी वापरतात. या किरणोत्सारी पदार्थाचा संपर्क पदार्थाना होत नाही. त्यामुळे पदार्थ किरणोत्सारी होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. म्हणजेच विकिरित पदार्थाचे सेवन आरोग्याला हानिकारक नसते. या पदार्थाच्या चवीत, रंगात, स्वादात, गंधात कुठलाही बदल होत नाही. यातील पोषणमूल्येही तशीच राहतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा