खोलीत मिट्ट काळोख केला, की काही वेळात डोक्यावर चांदण्या चमकत असल्याचं दिसतं, ग्रह गोलांसारख्या काही चमकणाऱ्या आकृत्या दिसायला लागतात. खोलीतले दिवे सुरू असताना, उजेडामध्ये हे असलं काही दिसत नव्हतं; पण खोलीत अंधार केल्यावर मात्र असं दृश्य नजरेला पडतं, की आपण जणू रात्रीचं स्वच्छ आकाश न्याहाळत आहोत.
थोडा बारकाईने विचार केला तर लक्षात येतं की, आकाशात चमकणाऱ्या चांदण्या अंधाऱ्या खोलीत चमकणाऱ्या चांदण्यांप्रमाणे मंद हिरव्या रंगात चमकत नाहीत.
काही दशकांपूर्वी अंधारात चमकणाऱ्या काटय़ांची आणि आकडय़ांची घडय़ाळं सर्रास वापरात होती. अंधारामध्ये हिरव्या रंगांत चमकणारे या घडय़ाळांमधले आकडे आणि काटे पाहून अंधारात वेळ समजणं सोपं जायचं.
अंधारात चमकणाऱ्या चांदण्या किंवा घडय़ाळाचे काटे चमकण्यामागे ‘स्फुरदीप्ती’ म्हणजेच ‘फॉस्फोरेसन्स’ हा गुणधर्म कारणीभूत असतो. हा गुणधर्म दाखवणाऱ्या रासायनिक पदार्थावर जेव्हा प्रकाश पडतो तेव्हा अंधारात तो पदार्थ चमकायला लागतो, म्हणजेच त्या पदार्थामधून दृश्य प्रकाश बाहेर पडतो.
घडय़ाळाच्या काटे आणि आकडे अशा स्फुरदीप्ती गुणधर्म असणाऱ्या झिंक सल्फाइड या रासायनिक पदार्थाचा समावेश असलेल्या रंगाने रंगवलेले असल्याने ते अंधारात चमकतात. स्फुरदीप्ती गुणधर्म दाखवणारे पदार्थ अंधारात चमकण्यासाठी अशा पदार्थावर आधी प्रकाश पडणं आवश्यक असतं. शास्त्रीय भाषेत सांगायचं तर या पदार्थाना ऊर्जेचा पुरवठा करावा लागतो. जर ऊर्जेचा पुरवठा झाला नाही तर हे चमकणं बंद होतं. म्हणूनच घडय़ाळाचे काटे रंगवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रंगांत रेडिअम हे मूलद्रव्य मिसळलं जायचं. रेडिअम हे किरणोत्सारी असल्याने किरणोत्सर्गातून बाहेर पडणारी ऊर्जा झिंक सल्फाइडला मिळून ते अंधारात चमकायचं.
रेडिअमचा शोध मेरी क्युरी व पिअरी क्युरी या दाम्पत्याने १८९८ साली लावला आणि १९१७ सालापासून हे मूलद्रव्य घडय़ाळाचे काटे आणि आकडे रंगवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रंगांत उपयोगात आणायला सुरुवात झाली. रेडिअमचा अर्धायुष्य काल तब्बल सोळाशे र्वष असल्याने ते जास्त काळ टिकण्यात काहीच अडचण नव्हती.
– हेमंत लागवणकर
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org