आपल्या शेतात पाडणारे पावसाचे पाणी शेतकरी कसे अडवू शकतो, याचे काही मार्ग पुढे सुचविलेले आहेत. यांपकी एक किंवा अनेक मार्ग तो अवलंबू शकतो. प्रत्येक शेतात असलेल्या चढ-उतारांमुळे नाले तयार होतात. पाऊस सुरू झाल्यावर या नाल्यातून पाणी वाहावयास सुरुवात होते. या नाल्यांवर मातीचे, दगडाचे किंवा सिमेंटचे बंधारे बांधले तर पाणी अडते. हे अडलेले पाणी जमिनीत जिरू लागते. एकच बंधारा बांधला तर त्यावर पाण्याचा जोर येऊन तो फुटू शकतो. यासाठी अनेक बंधारे थोडय़ा-थोडय़ा अंतरावर बांधले तर पाणी वेगाने मुरायला लागते.
शेतात उतार असला तर पावसाचे पाणी शेतातून वेगाने वाहून जाते. त्यापासून शेतकऱ्याला काही लाभ तर होत नाही. पण शेतकऱ्याने या उताराला आडवी नांगरट केली, तर उतारावरून वाहून जाणाऱ्या पाण्याला अडथळे निर्माण होतात. या प्रकारे पाण्याचा वेग खंडीत झाल्यामुळे जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण वाढीस लागते.
उतारावरून वाहून वाया जाणाऱ्या पाण्याची अडचण सोडविण्याचा दुसराही एक मार्ग आहे. शेताचे वेगवेगळ्या तुकडय़ांत विभाजन केले व प्रत्येक तुकडय़ाभोवती बंधारे बांधले, तर या प्रत्येक तुकडय़ात पाणी अडते. वाहत्या पाण्यामुळे जमिनीचे सपाटीकरणही होते. सपाट जमिनीत पाणी जास्त प्रमाणात मुरते.
शेततळे हा शेतकऱ्यांसाठी पाणी साठविण्याचा राजमार्गच म्हणता येईल. हे शेततळे तयार करण्यासाठी शेतकऱ्याला सरकार किंवा इतर कोणावरही अवलंबून राहाण्याची गरज नाही. स्वबळावर, स्वकष्टाने तो हे शेततळे बनवू शकतो. वर्षांतील फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे हे चार महिने शेतकऱ्याला तुलनात्मकदृष्टय़ा कमी काम राहाते. या चार महिन्यांचा योग्य वापर करून स्वत:च्या मेहनतीने शेततळे खणले तर त्याचा आनंद काही वेगळाच असेल. मी हे शेततळे स्वत: खणले, असे तो अभिमानाने सांगू शकतो. आपल्या शेतात अशा दीर्घकालीन उपाययोजना केल्या पाहिजेत.
पावसाचे पाणी केवळ अडवले आणि साठवले म्हणजे संपले एवढे पुरेसे नाही. या प्रकारे साठविलेल्या पाण्याचा ठिबक सिंचन, तुषार सिंचन यांद्वारे  काटकसरीने वापर करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

जे देखे रवी.. – संप नावाचे अस्त्र
डॉक्टरांसारख्या उदात्त व्यावसायिकांनी संप करणे म्हणजे एक घोर पाप आहे, असे बहुतेक सगळेच म्हणत असणार. संपाचे दुष्परिणामच होतात, हे तितकेसे खरे नाही.
मुंबईतला एकेकाळचा संपाचा राजा दत्ता सामंत माझा मित्र होता. आम्ही ‘एनसीसी’त बरोबर होतो. दत्ता धिप्पाड पेहेलवान होता; पण त्याचे मन गोगलगायीपेक्षा मऊ होते. पुढे त्याने मला वाटते घाटकोपरमध्ये व्यवसाय सुरू केला. आसपासच्या टेकडय़ांमध्ये दगडफोडीचे काम करणारे कामगार याचे रुग्ण. त्यांच्यावर होणाऱ्या जुलमाच्या कथांनी हा आमचा पेहेलवान मित्र इतका व्यथित झाला की याच्या मऊ मनाने पेहेलवानकीच सुरू केली आणि त्यांचे नेतृत्व स्वीकारले. पुढे त्याचे नाव गाजू लागले तेव्हा त्याला मी एकदा भेटलो होतो. त्याला प्रश्न विचारू लागलो तेव्हा तो म्हणाला होता, ‘‘हे गिरणीमालक एखाद्या हिंस्र पशूसारखे वागतात, तेव्हा जशास तसे या न्यायाने आम्हालाही काही भूमिका घ्याव्या लागतात.’’ पुढे दत्ताचा खून झाला तेव्हा त्याच्या त्या गोगलगायीसारख्या मनाची आठवण होऊन मी हळहळलो होता. दत्ताने पशू हा शब्द वापरला ते अजूनही लक्षात आहे. कामगारांसमोर मुख्यत: दोन शत्रू (!) असतात- एक तर नोकरशाही, जिला माझ्या अनुभवाप्रमाणे बुद्धी असते, परंतु मन नसते. आखण्या खूप होतात, पण आखणीप्रमाणे काम होत नाही आणि गडबड होते. कामगारांचा दुसरा शत्रू म्हणजे मालकवर्ग. मालक लोक रोजगार निर्माण करतात; परंतु त्यांचा मूळ उद्देश असतो नफा आणि त्यांनी धूर्त लोक नोकरीला ठेवलेले असतात, जे कामगारांवर नियंत्रण ठेवतात. बुद्धी आणि धूर्त हे शब्द वापरून झाले. आता या पाश्र्वभूमीवर कामगार मूर्ख नसतो, पण ठरतो. पोटापाण्याच्या वणवणीपुढे त्याला विचार करायला सवड होत नाही आणि तो मूर्ख ठरतो, कारण ‘तुझे काम करून देतो’ असे सांगणारे त्याला भेटतात.
पूर्वी साम्यवादी मंडळींमध्ये थोडीफार वैचारिकता होती, आता कामगार संघटना हा धंदा झाला आहे आणि त्याचे चालक हे एक प्रकारचे मालकच झाले आहेत. दत्ता जे म्हणत होता ते खरेच होते. या सगळय़ा घडामोडींत माणसांचे श्वापदीकरण होते, भडके उडतात. मग मन नसलेली नोकरशाही आणि सरकार नावाचे श्वापद शस्त्र उगारते आणि ‘अत्यावश्यक’ या नावाखाली संप बेकायदा ठरवून मोकळे होते.
माणूस शेवटी एक पशूच असतो. पशूला पशू म्हणतात (आणि माणसाला नाही) याचे कारण, पशू फक्त बघतो! संस्कृतमध्ये ‘केवलं पश्यति इति पशू’.. माणूस विचार करायचा थांबला की तो पशूसमानच होतो. काळ काही थांबत नाही.
 ..आणि संप होतात!
– रविन मायदेव थत्ते  rlthatte@gmail.com

वॉर अँड पीस     – अपस्मार – फिट्स येणे
अपस्मार म्हणजे व्यपस्मृति. काही काळ स्मृति नाहीशी होणे. इंग्रजीत एपिलेप्सी, िहदीत मिरगी असे वेगवेगळे शब्द असलेल्या या रोगात एकदम चक्कर येते. काय घडले हे रुग्णाला समजत नाही. अशा रोगावस्थेलाच अपस्मार म्हणावे. झटका कसा आला, केव्हा आला, किती काळ आला या कशाचेच भान रुग्णाला नसते. चक्कर आलेली कळत असेल, स्मृती त्या काळात चांगली असेल तर ती अवस्था रक्तदाब क्षय वा साधी भोवळ या स्वरूपाची असते. त्याचा विचार या लेखात नाही. सामान्यपणे फिटचा झटका आला की कांदा हुंगणे, तडक डॉक्टर बोलावणे, गार्डीनाल, टेग्रेटॉल, मेझाटोल, डिलांन्टीन अशा निरनिराळ्या ब्रँडनेम गोळ्या सुरू होतात. तात्पुरत्या एकदा या गोळ्या दिलेल्या मी समजू शकतो. पण रुग्णहितार्थ रुग्णाच्या मेंदूचा आलेख जरूर काढावा व त्यात दोष असल्यासच वरील स्वरूपाच्या गोळ्या तज्ज्ञांचे सल्ल्याने द्याव्या.
वरील औषधे ही मेंदू झोपविणारी असतात. वर्षांनुवर्षे अशा गोळ्या घेऊन रुग्णाची स्मरणशक्ती कमी होते. त्याचा आत्मविश्वास संपतो. मेंदूच्या आलेखात दोष नसल्यास औषधे पुढीलप्रमाणे काही काळ द्यावीत. सकाळ, संध्याकाळ लघुसूतशेखर व ब्राम्हीवटी प्रत्येकी तीन गोळ्या, रात्री निद्राकर वटी सहा गोळ्या व दोन्ही जेवणानंतर सारस्वतारिष्ट ४ चमचे समभाग पाण्याबरोबर द्यावे. मेंदूमध्ये दोष असल्यास पंचगव्यघृत सकाळ-संध्याकाळ दोन चमचे घ्यावे. अणू तेलाचे २ थेंब नाकात सोडावे. लहान बालकांना तीव्र ताप आल्यास, ताप डोक्यात चढतो व फिटचा झटका येतो. त्याकरिता लहान बालकांचा ताप वाढणार नाही ही काळजी घ्यावी, लघुसूतशेखर १-१ गोळी या प्रमाणात तासातासाने २-३दा द्यावी.
फिट विकाराची कारणे अनेक आहेत. अनुवंशिकता, फाजील चिंता, क्षोभ, खूप विचार, मनावर फाजील ताण, खूप ऊन लागणे, अपुरी झोप इत्यादी. काही स्त्रियांना मासिकपाळी साफ न होण्यामुळे फिट येतात. फिट येणाऱ्या रुग्णांनी तीक्ष्ण, उष्ण, मनस्वी तिखट वा मलावरोध होईल असा आहार न करणे हे मी सांगायला हवे का?
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत – १२ एप्रिल
१८७१ > मुलांसाठीच्या ‘आनंद’ मासिकाचे संस्थापक- संपादक, व्याकरणाचे अभ्यासक,  बालसाहित्यकार, अनुवादक वासुदेव गोविंद आपटे यांचा जन्म. ‘मराठी भाषेचे संप्रदाय व म्हणी’, ‘मराठी शब्दरत्नाकर’ या त्यांच्या पुस्तकांनी भाषाज्ञान सर्वसामान्यांपर्यंत नेले.
१९१० > ‘भाषाभास्कर’ अशी ओळख असलेले पुरुषोत्तम भास्कर भावे यांचा जन्म. पहिला पाऊस, सतरावे वर्ष आदी सव्वादोनशे कथा, ‘अकुलिना’सह १७ कादंबऱ्या, ‘महाराणी पद्मिनी’सह पाच नाटके, १४ लेखसंग्रह, दोन प्रवासवर्णने व ‘प्रथमपुरुषी एकवचनी’ हे आत्मचरित्र अशी त्यांची ७० वर्षांच्या हयातीतील साहित्यसंपदा होती.
१९२० > शैलजा राजे यांचा जन्म. ३९ कथासंग्रह, ५३ कादंबऱ्या व २५ बालकथा- कादंबरिका आणि काही ललित गद्यसंग्रह त्यांनी लिहिले.
१९४९ > चित्रकार तसेच ‘धुरकटलेली’, ‘मॅडम’ या कादंबऱ्या आणि ‘जीए : एक पोट्र्रेट’ हे प्रयोगशील पुस्तक लिहिणारे सुभाष त्र्यंबक अवचट यांचा जन्म. ‘स्टुडिओ’ हे त्यांचे आत्मपर पुस्तक आहे.
१९७७ > रंजक आणि वाचनीय पुस्तकांचे लेखक भानू (भानुदास बळीराम) शिरधनकर यांचे निधन.  गुन्हे/अधोविश्व, शिकारकथा त्यांनी साकारल्या, तसेच ‘बेस्टसेलर्स’चे अनुवाद केले.
– संजय वझरेकर

Story img Loader