आपल्या शेतात पाडणारे पावसाचे पाणी शेतकरी कसे अडवू शकतो, याचे काही मार्ग पुढे सुचविलेले आहेत. यांपकी एक किंवा अनेक मार्ग तो अवलंबू शकतो. प्रत्येक शेतात असलेल्या चढ-उतारांमुळे नाले तयार होतात. पाऊस सुरू झाल्यावर या नाल्यातून पाणी वाहावयास सुरुवात होते. या नाल्यांवर मातीचे, दगडाचे किंवा सिमेंटचे बंधारे बांधले तर पाणी अडते. हे अडलेले पाणी जमिनीत जिरू लागते. एकच बंधारा बांधला तर त्यावर पाण्याचा जोर येऊन तो फुटू शकतो. यासाठी अनेक बंधारे थोडय़ा-थोडय़ा अंतरावर बांधले तर पाणी वेगाने मुरायला लागते.
शेतात उतार असला तर पावसाचे पाणी शेतातून वेगाने वाहून जाते. त्यापासून शेतकऱ्याला काही लाभ तर होत नाही. पण शेतकऱ्याने या उताराला आडवी नांगरट केली, तर उतारावरून वाहून जाणाऱ्या पाण्याला अडथळे निर्माण होतात. या प्रकारे पाण्याचा वेग खंडीत झाल्यामुळे जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण वाढीस लागते.
उतारावरून वाहून वाया जाणाऱ्या पाण्याची अडचण सोडविण्याचा दुसराही एक मार्ग आहे. शेताचे वेगवेगळ्या तुकडय़ांत विभाजन केले व प्रत्येक तुकडय़ाभोवती बंधारे बांधले, तर या प्रत्येक तुकडय़ात पाणी अडते. वाहत्या पाण्यामुळे जमिनीचे सपाटीकरणही होते. सपाट जमिनीत पाणी जास्त प्रमाणात मुरते.
शेततळे हा शेतकऱ्यांसाठी पाणी साठविण्याचा राजमार्गच म्हणता येईल. हे शेततळे तयार करण्यासाठी शेतकऱ्याला सरकार किंवा इतर कोणावरही अवलंबून राहाण्याची गरज नाही. स्वबळावर, स्वकष्टाने तो हे शेततळे बनवू शकतो. वर्षांतील फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे हे चार महिने शेतकऱ्याला तुलनात्मकदृष्टय़ा कमी काम राहाते. या चार महिन्यांचा योग्य वापर करून स्वत:च्या मेहनतीने शेततळे खणले तर त्याचा आनंद काही वेगळाच असेल. मी हे शेततळे स्वत: खणले, असे तो अभिमानाने सांगू शकतो. आपल्या शेतात अशा दीर्घकालीन उपाययोजना केल्या पाहिजेत.
पावसाचे पाणी केवळ अडवले आणि साठवले म्हणजे संपले एवढे पुरेसे नाही. या प्रकारे साठविलेल्या पाण्याचा ठिबक सिंचन, तुषार सिंचन यांद्वारे काटकसरीने वापर करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा