भारतीय शेतीबद्दल असे म्हटले जाते की, सर्वसाधारणपणे पाच हंगामांपकी एक हंगाम चांगला असतो, एक हंगाम बरा असतो, तर तीन हंगाम कष्टदायक असतात. हे हंगाम कष्टदायक असण्यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे, या हंगामात असणारी पाण्याची अनुपलब्धता. बियांसाठी, खतांसाठी आणि कीटकनाशकांसाठी शेतकऱ्याची जेवढी दगदग होते, तेवढी दगदग तो पाणी साठवण्यासाठी करत नाही. शेतीसाठी पाणी किती महत्त्वाची संपत्ती आहे, हे त्याला आज खरं तर नक्कीच पटलेलं आहे, पण तरी प्रत्यक्ष शेती करताना त्याच्या कृतीतूनही हे दिसायला हवं. शेतात दरवर्षीच पाऊस पडतो, मग ते पाणी जाते कुठे? गेल्या १०० वर्षांत पाऊस पडलाच नाही असे कोणतेही वर्ष नाही. पाऊस पडतोच, कधी थोडा तर कधी जास्त. फक्त या पावसाच्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन होत नाही.
 ज्या प्रदेशात सरासरी ७५० मिमी पाऊस पडतो, त्या प्रदेशात प्रत्येक एकरात ३० लाख लिटर पाणी उपलब्ध होते. इतके पाणी शेतीवर पडत असेल, तर त्या शेतीला कोरडवाहू म्हणण्यात अर्थ नाही. हे पाणी शेतकऱ्याने आपल्या शेतातच अडवून जिरवले, तर या पाण्याच्या आधारे त्याला वर्षांतून दोन पिके सहज काढता यायला हवीत. यामुळे शेती हा शाश्वत व्यवसाय होईल. पण अशा प्रकारे पाणी न साठवल्यामुळे शेतकऱ्याला समाधानकारक पीक उत्पादनासाठी एकाच चांगल्या हंगामावर अवलंबून राहावे लागते. बरं त्याही हंगामात पाऊस नक्की पडेल याची शाश्वती नसते. परिणामी शेतकरी कर्जबाजारी होतो. त्याचा ताण सहन झाला नाही तर आत्महत्या करून मोकळा होतो.
मायबाप सरकार शेतकऱ्याचे सगळे प्रश्न सोडवेल, हा एक भ्रमच म्हणावा लागेल. पण भोवतालच्या एकंदर राजकीय परिस्थितीमुळे शेतकऱ्याचा हा भ्रम जोपासला जातो. शेतकरी एका आशेवर लटकत राहातो आणि परावलंबी बनत जातो. स्वत:साठी आपणच काही मार्ग शोधला, स्वावलंबी बनलो तर आपल्या समस्या सुटू शकतील, हे त्याच्या मनावर िबबणे फार महत्त्वाचे आहे.  
– डॉ. दत्ता देशकर (पुणे)    
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  
office@mavipamumbai.org

जे देखे रवी..: संप
त्या काळच्या सायन हॉस्पिटलमध्ये निवासी डॉक्टरांची कामात बुडलेली डोकी भडकली. कारण परिचारिका (ठ४१२ी२) आणि निवासी डॉक्टर मंडळी यांना मिळणाऱ्या सुविधांमधल्या प्रचंड तफावतीमुळे. प्रथेप्रमाणे सगळ्या परिचारिका सकाळी रांगेने न्याहारी घेऊन बाहेर पडतात आणि दुपारी रांगेने जेवायला अर्धा तास सुट्टी घेतात. त्यांचे काम तीन वाजता संपते. जेवण, चहापाणी, खोल्या, सभागृह इत्यादी गोष्टींनी त्यांचे वसतिगृह परिपूर्ण असते. त्या काळात टिळक रुग्णालयात परिचारिका तसेच निवासी अधिकारी यांच्यासाठीची व्यवस्था विस्कळीत होती. धारावीला जो रस्ता जातो, तेथे होती. परंतु परिचारिकांची संघटना होती; त्यांनी जोर लावून, ‘स्त्रियांसाठी सुरक्षित वसतिगृह बांधून द्या,’ असा हट्ट धरला आणि ते वसतिगृह तयार झाले, परंतु निवासी डॉक्टर्स ज्यांची काहीच संघटना नव्हती त्यांना रस्त्यापलीकडल्या विस्कळीत बरॅकींमध्येच जणू वाऱ्यावर सोडल्याची अप्रत्यक्ष क्रिया घडली. तेव्हा खरे तर निवासी डॉक्टरांमधल्या मुलींनीच प्रथम ठिणगी पाडली. त्या काळात या भागात धारावीतल्या कुंभारवाडय़ातला धूर रात्री एवढा माजत असे की पुढचे काही दिसत नसे. रात्री मुलींना जर रुग्णालयात बोलवायचे असेल तर एक सुरक्षा रक्षक पाठवावा लागे. हल्लीचा धारावीचा रेल्वेवरचा पूल तेव्हा नव्हता आणि त्याऐवजी माटुंग्याला पलीकडे एक फाटक होते. त्या फाटकापलीकडचा सगळा मुलूख वरदा नावाच्या एका गुंडाच्या अधिपत्याखाली होता. म्हणून त्याला फाटक वरदा असे नाव पडले. दिल्लीत झालेल्या एका निर्घृण खुनाचे आरोपी रंगा आणि बिल्ला इथलेच. सायन हॉस्पिटल झपाटय़ाने गजबजू लागले होते. निवासी डॉक्टर वाढत होते, पण जेवणाची खरोखरच मारामार होती. परिचारिकांच्या विस्तीर्ण इमारतीत आम्हाला एक कक्ष द्या एवढीच मागणी होती, पण नोकरशाहीने डोळे मिटले, कान झाकले आणि या नोकरशाहीत ज्येष्ठ डॉक्टरच होते. प्रकरण तापू लागले आणि एखादी घटना जशी माणसाला शोधत येते तसेच या घटनेने माझ्यातल्या ऊर्जेला गाठले. प्रथम मला पाठिंबा दिला मुलींनी. तेव्हा मी गुरगुरू लागलो. मग मुले जमल्यावर मी तावातावाने बोलू लागलो. नायर रुग्णालयात आधी डच्चू मिळाला आहे हे विसरलो आणि वैद्यकीय नोकरशहांपुढे ‘आम्ही संप करणार आहोत’ अशी गर्जना करून मोकळा झालो.
भारतातल्या निवासी डॉक्टरांचा हा पहिला संप. होतो न होतो तोवर नोकरशाही नमली. निवासी डॉक्टर्सना त्या नव्या इमारतीत एक कक्ष मिळाला. आणि तो माहोल जसा तयार झाला तसा निवळलाही. काही वर्षांनंतर भारतातल्या डॉक्टरांच्या पहिल्या नोंदणीकृत युनियनचा मी सचिव होणार होतो आणि आठ वर्षांनी शिकागो शहरात अमेरिकेतल्या डॉक्टरांच्या पहिल्या संपाचे थोडेफार नेतृत्व मी करणार होतो हे तेव्हा स्वप्नातही नव्हते.
रविन मायदेव थत्ते  
rlthatte@gmail.com

वॉर अँड पीस :    फुफ्फुसाचे विकार :  भाग ३
अनुभविक उपचार – १) दीर्घश्वसन, प्राणायाम, भस्त्रिका हे उपचार तज्ज्ञांकडून समजून घ्यावेत. नियमितपणे करावेत. छातीचा घेर वर्षांत वाढतो. २) सूर्यनमस्कार व जोर काढणे हा व्यायाम नित्य करावा. शक्य असल्यास रोज पोहावयास जावे. भरपूर पोहोण्यामुळे आयुष्यात फुफ्फुसाचा विकार होणार नाही, असा स्टॅमिना येतो. ३) छातीचा घेर वाढण्याकरिता सुवर्णमाक्षिकादि वटी व शृंगभस्म प्र. ३ गोळ्या सकाळ, सायंकाळ घ्याव्या. सोबत शतावरी कल्प ३ चमचे दुधाबरोबर घ्यावा. ४) थोडय़ा श्रमाने धाप लागत असल्यास, फुफ्फुसात दुखत असल्यास, आत्मविश्वास कमी झाल्यास ब्राह्मी वटी, सुवर्णमाक्षिकादि, शृंग भस्म प्र. ३ गोळ्या दोन वेळा घ्याव्या. हृदयाच्या स्नायूंचा संबंध असणे, फुफ्फुसात हृदयाच्या ठराविक जागी दुखत असल्यास भोजनोत्तर राजकषाय किंवा अर्जुनारिष्ट घ्यावे. कृश व्यक्ती, मांस कमी, वितभर छाती; पोषण कमी अशा अवस्थेत अश्वगंधापाक दोन वेळ घ्यावा. सर्दी, पडसे, खोकला, दमा अशा फुफ्फुससंबंधित तक्रारी असल्यास लक्ष्मीनारायण, दमा गोळी, ज्वरांकुश, लवंगादि गुग्गुळ, अभ्रकमिश्रण प्र. ३ गोळ्या दोन वेळा; खोकला काढा किंवा नागरादि कषाय बरोबर घ्याव्यात. एलादिवटी रोज एक एक करून ६/८ चघळाव्या. फुफ्फुसात व्रण असल्यास लाक्षादि घृत, लाभादि गुग्गुळ, अभ्रकमिश्रणवटी, अस्सल वंशलोचन चूर्ण, चौसष्ट पिंपळी चूर्ण एकत्र वा स्वतंत्रपणे मधाबरोबर घ्यावे. बालकांच्या फुफ्फुसाच्या तक्रारीत कुक्कुटाण्डत्व्क भस्म २ वालभर, २ वेळा घ्यावे. कॅल्शियमची कमतरता असल्यास सांबरशिंग उगाळून द्यावे. ज्वरांकुश दोन गोळ्या ३ वेळा द्याव्या. वृद्ध व कृश व्यक्तींना धूम्रपानामुळे फुफ्फुस क्षीण झालेल्यांनी फुफ्फुसाच्या दोन्ही बाजूंना सूज, पाणी होणे, दुखणे, शोष पडणे, प्लुरसी विकार बळावणे अशा अवस्थेत एलादिवटी एकदोन  चघळाव्यात. मधुमेह नसल्यास वासापाक ३ चमचे ४ वेळा घ्यावा. जेवणानंतर भृंगराजासव, कृश व्यक्तींनी खजुराचे सरबत किंवा २ खजूर चमचा भर तुपाबरोबर खावेत.
वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत : ११ एप्रिल
१८२७ > ‘गुलामगिरी’, ‘शेतकऱ्यांचा असूड’ अशा भेदक लिखाणातून आणि कृतींतून सामाजिक क्रांतीचा पुरस्कार करणारे आधुनिक महाराष्ट्रातील कृतिशील विचारवंत, सत्यशोधक समाजाचे संस्थापक महात्मा जोतिराव गोविंदराव फुले यांचा जन्म. थॉमस पेनच्या विचारांचा प्रभाव असणाऱ्या जोतिबांनी आपल्या लेखनातून चातुर्वण्र्य, त्यातून उद्भवलेला जातिभेद आणि या भेदाचा सर्वाधिक फायदा उपटू पाहणारा तत्कालीन ब्राह्मणवर्ग यांच्यावर कोरडे ओढून सामाजिक बदलांची वाट खुली केली. ‘शेतकऱ्याचा असूड’ या पुस्तकातून त्यांनी केलेली शेतकऱ्याच्या दारिद्रय़ाची मीमांसा आजच्या कार्यकर्त्यांनाही अभ्यासाची दिशा दाखविणारी आहे. ‘सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक’ या पुस्तकातून फुले यांनी धर्मकल्पनांना फेकून न देता मानवी नैतिक धारणांशी धर्माचा संबंध पुन्हा स्थापन केला. याखेरीज ‘चमत्कारिक गोष्टी’, ‘बालबोध गोष्टी’, ‘यात्रेकऱ्यांचा वृत्तांत’, ‘सत्सार’ इत्यादी पुस्तके, अनेक ‘अखंड’ (अभंगवजा रचना) तसेच ‘शिवाजीचा पोवाडा’ही फुले यांची साहित्यसंपदा होय.
१९३५ > कवी वसंत सावंत यांचा जन्म. पाच काव्यसंग्रह व ‘प्रवासवर्णन: एक वाङ्मय प्रकार’ हा प्रबंध त्यांनी लिहिला आहे.
– संजय वझरेकर

Story img Loader