भारतीय शेतीबद्दल असे म्हटले जाते की, सर्वसाधारणपणे पाच हंगामांपकी एक हंगाम चांगला असतो, एक हंगाम बरा असतो, तर तीन हंगाम कष्टदायक असतात. हे हंगाम कष्टदायक असण्यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे, या हंगामात असणारी पाण्याची अनुपलब्धता. बियांसाठी, खतांसाठी आणि कीटकनाशकांसाठी शेतकऱ्याची जेवढी दगदग होते, तेवढी दगदग तो पाणी साठवण्यासाठी करत नाही. शेतीसाठी पाणी किती महत्त्वाची संपत्ती आहे, हे त्याला आज खरं तर नक्कीच पटलेलं आहे, पण तरी प्रत्यक्ष शेती करताना त्याच्या कृतीतूनही हे दिसायला हवं. शेतात दरवर्षीच पाऊस पडतो, मग ते पाणी जाते कुठे? गेल्या १०० वर्षांत पाऊस पडलाच नाही असे कोणतेही वर्ष नाही. पाऊस पडतोच, कधी थोडा तर कधी जास्त. फक्त या पावसाच्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन होत नाही.
ज्या प्रदेशात सरासरी ७५० मिमी पाऊस पडतो, त्या प्रदेशात प्रत्येक एकरात ३० लाख लिटर पाणी उपलब्ध होते. इतके पाणी शेतीवर पडत असेल, तर त्या शेतीला कोरडवाहू म्हणण्यात अर्थ नाही. हे पाणी शेतकऱ्याने आपल्या शेतातच अडवून जिरवले, तर या पाण्याच्या आधारे त्याला वर्षांतून दोन पिके सहज काढता यायला हवीत. यामुळे शेती हा शाश्वत व्यवसाय होईल. पण अशा प्रकारे पाणी न साठवल्यामुळे शेतकऱ्याला समाधानकारक पीक उत्पादनासाठी एकाच चांगल्या हंगामावर अवलंबून राहावे लागते. बरं त्याही हंगामात पाऊस नक्की पडेल याची शाश्वती नसते. परिणामी शेतकरी कर्जबाजारी होतो. त्याचा ताण सहन झाला नाही तर आत्महत्या करून मोकळा होतो.
मायबाप सरकार शेतकऱ्याचे सगळे प्रश्न सोडवेल, हा एक भ्रमच म्हणावा लागेल. पण भोवतालच्या एकंदर राजकीय परिस्थितीमुळे शेतकऱ्याचा हा भ्रम जोपासला जातो. शेतकरी एका आशेवर लटकत राहातो आणि परावलंबी बनत जातो. स्वत:साठी आपणच काही मार्ग शोधला, स्वावलंबी बनलो तर आपल्या समस्या सुटू शकतील, हे त्याच्या मनावर िबबणे फार महत्त्वाचे आहे.
– डॉ. दत्ता देशकर (पुणे)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा