आजच्या गुजरात राज्यातील चौथ्या क्रमांकाचे शहर राजकोट, हे ब्रिटिशराजच्या काळात महत्त्वाचे संस्थान होते. जामनगरचे राजे सताजी जडेजा यांचा नातू विभोजी याने १६२० साली हे राज्य स्थापन केले. या प्रदेशात पूर्वी प्रथम महमूद गझनवीचे आणि नंतर महमूद बेगडा याचे राज्य होते. जामनगरच्या फौजेचे मोगलांशी १५९० साली युद्ध झाले, त्यात विभोजीचे वडील मारले जाऊन विभोजीला कैद करून दिल्लीस नेण्यात आले. कैदेतून सुटका झाल्यावर विभोजी हा बादशाह शाहजहानच्या फौजेत भरती झाला. मोगल सन्यात उत्तम कामगिरी केल्यामुळे विभोजीला कलवाड, अरडोई वगरे बारा गावे इनाम मिळाली. विभोजीने आपला सहकारी राजू सांधी याच्या मदतीने या इनाम प्रदेशात नवे राज्य स्थापन केले, पण त्याच वेळी राजूचा मृत्यू झाला व त्याच्या नावाने विभोजीने आपल्या राज्याची राजधानी राजकोट वसविली. विभोजी यांची कारकीर्द सन १६२० ते १६३५ अशी झाली.
पुढे विभोजी यांचा मुलगा मेहरामनजी (प्रथम)ला मोगलांनी गुजरातची सुभेदारी देऊन काही प्रदेशाची जहागिरी दिली. १७२० साली जुनागढचा नवाब मासूम खानने आक्रमण करून राजकोट घेतले व त्याचे नाव बदलून ‘मासुमाबाद’ केले. मासूम खानाने मजबूत आणि प्रचंड मोठा किल्ला बांधून बारा वष्रे राज्य केल्यावर ठाकूरजी रणमाळजी जडेजाने १७३२ साली त्या राज्यावर परत अंमल बसवून राज्याचे व राजधानीचे नाव पूर्ववत ‘राजकोट’ असे केले. १७४६ साली गादीवर आलेल्या लाखाजी रणमाळजीच्या कारकीर्दीत जडेजा घराण्यातल्या लोकांमध्ये सतत संघर्ष होत राहिला व अखेरीस ठाकूर रणमाळजी (द्वितीय)ने १८०७ साली कंपनी सरकारशी ‘संरक्षण करार’ करून त्यांची तनाती फौज राखली.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा